आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Disabled Child News In Marathi, Mahindra Lohar, Divya Marathi, Jalgaon

अंथरुणावर पडलेल्या महेंद्रला व्हायचेय वेबडिझायनर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - बारा वर्षांपासून अंथरुणाला खिळलेल्या महेंद्र लोहारने अपूर्ण राहिलेले शिक्षण पूर्ण करण्याच्या उद्देशाने यंदा कला शाखेतून बारावीची परीक्षा दिली. शरीराने खचलो पण मनाने खचलेलो नाही, अशा शब्दात आई-वडिलांना धीर देत महेंद्रने भविष्यात वेबडिझायनर होण्याचे स्वप्न उराशी बाळगले आहे.


2001-02 मध्ये नूतन महाविद्यालयात अकरावीत विज्ञान शाखेत शिकणार्‍या महेंद्र लोहार या विद्यार्थ्याला संधिवात झाला. अनेक वष्रे वैद्यकीय उपचार केल्यानंतरही शरीराने साथ दिली नाही. शेवटी 12 वर्षांपासून महेंद्र अंथरुणास खिळून आहे. त्याला शरीराची हालचालही निट करता येत नाही. मात्र, तरीही प्रत्येक क्षणी तो जीवनाशी संघर्ष करीत आहे. एवढे असताना एखाद्या धडधाकड विद्यार्थ्याला मागे टाकेल एवढी इच्छाशक्ती त्याच्यात आहे. त्याच बळावर त्याने अपूर्ण राहिलेले शिक्षण पूर्ण करण्याचा ध्यास घेतला असूून यावर्षी नूतन महाविद्यालयात त्याने बारावीची परीक्षा दिली. बुधवारी त्याचा शेवटचा पेपर झाला. महाविद्यालय आवारात अँम्ब्युलन्समध्ये रायटरच्या मदतीने पेपर सोडवले. 2002 मध्ये शिक्षण घेत असताना महेंद्रला डॉक्टर किंवा इंजिनियर व्हायचे होते. पण शरीराने साथ सोडल्यामुळे त्याला हे स्वप्न अपूर्ण राहिले. तरीही त्याने जिद्द न सोडता संगणकाच्या माध्यमातून ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला.


नोट्स् केल्या स्कॅनिंग
अंथरुणावरून उठतादेखील येत नसल्याने महेंद्रने बेडच्या वरील बाजूस कॉम्प्युटर बसवला आहे. बारावीची पाठय़पुस्तके आणि नवनीतची पाने स्कॅन करून ती स्क्रीनवर झूम करून अभ्यासले. यासाठी आई-वडिलांनी पाने स्कॅन करण्यासाठी मदत केली. संगणकावर वेबडिझायनिंगची कामेही तो याच पद्धतीने करतो.

सायबर लॉ करणार
बारावीनंतर वेबडिझायनिंग करण्याचे स्वप्न महेंद्रने बाळगले आहे. स्वत:चा व्यवसाय उभारून ‘सायबर लॉ’मध्ये प्रभुत्व मिळवण्याचा त्याचा मानस आहे. सध्या वेबडिझायनिंगमधून तो स्वत: रोजगारही मिळवतो आहे, ही खूप मोठी गोष्ट आहे. इतर विद्यार्थ्यांसाठी तो निश्चितच आदर्श ठरला आहे.


आई-वडिलांचे नाव उज्ज्वल करणार
12 वर्षांपासून अंथरुणावर असलेल्या महेंद्रची सेवा करणारे वडील काशिनाथ लोहार व आई कुसुम लोहार यांचे नाव निश्चितच उज्‍जवल करेल, एवढी तीव्र इच्छा महेंद्रची आहे. नूतन महाविद्यालयातील नेमीचंद जैन, प्राचार्य आर.बी. सुर्वसे, के.टी. पाटील, जी.आर. पाटील, सुनील गरुड यांनी मदत केली. तर जनता बॅँकेने अँम्ब्युलन्स उपलब्ध करून दिली.