जळगाव - राज्यात अतिवृष्टी किंवा नैसर्गिक
आपत्तीमध्ये मनुष्य किंवा जनावरे दगावली असल्यास पंचनामे करून थेट मदत देण्याचे स्थायी आदेश महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी काढले आहेत.खडसे म्हणाले, नुकसानीचे पंचनामे झाल्यावर घोषणा होईपर्यंत शासकीय मदत मिळत नव्हती. मात्र, यापुढे अतिवृष्टी किंवा नैसर्गिक आपत्तीत जीवित हानी झाली असल्यास पंचनामा होताच तातडीने मदत वितरित करण्याचे स्थायी आदेश दिले आहेत. पंचनामे झाल्यावर आठवडाभराच्या आत संबंधित मृत व्यक्तींच्या वारसांना मदत दिली जाईल.
याबाबतचा लेखी आदेश सोमवारी जारी केला जाईल. अतिवृष्टीग्रस्त शेतक-यांना ३३.५ टक्के वीज बिल माफ करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
अवैध सावकारी कर्जही फेडणार
राज्यातील नोंदणीकृत सावकारांनी राज्यातील शेतक-यांना ३६३ कोटी रुपये कर्ज दिले आहे. या सावकारांची कर्जे सरकार भरणार आहे. या व्यतिरिक्त जर शेतक-यांनी विनापरवाना सावकाराकडून कर्ज घेतले असल्यास व त्याचा सबळ पुरावा सादर केला तर ते कर्जही फेडण्याची सरकारची तयारी आहे. मात्र, संबंधितावर बेकायदा सावकारीअंतर्गत गुन्हेदेखील दाखल करण्यात येतील, असे खडसे म्हणाले.
अशी असेल मदत
> १८ ते ७० वर्षे वयाच्या मृतांच्या वारसांना १ लाखाऐवजी १ लाख ५० हजार रुपये.
> १८ वर्षांच्या आतील मृतांच्या वारसांना ५० हजार रुपये.
> गाय किंवा म्हैस
(दुभती जनावरे) दगावल्यास १६ हजार ५०० रुपये
> बैल किंवा घोडा दगावल्यास १५ हजार रुपये.
> गाढव, वासरू, म्हशीचे पारडू दगावल्यास १० हजार रुपये.
> शेळी, मेंढी दगावल्यास
१ हजार ६५० रुपये.
मराठवाड्यात कापसाच्या वाती : औरंगाबाद, जालना, बीड, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात अवकाळी पावसाने वेचणीला आलेल्या कापसाच्या वाती झाल्या, काढून ठेवलेला मका भिजला, तर आंब्याचा मोहरही झडून गेला.