आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Disaster Management News In Marathi, Divya Marathi

बॉम्बस्फोट, घातपाताविषयी पोलिसांनी केली जनजागृती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - जिल्हा पोलिस दलाच्या बॉम्ब शोधक व नाशक पथकातर्फे युवा जनजागरण अभियानांतर्गत जी.एच.रायसोनी अभियांत्रिकी आणि व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालयात बॉम्बस्फोटाविषयी टिप्स देण्यात आल्या. देशातील दहशतवाद, घातपात, बॉम्बस्फोटविषयी माहिती व ते टाळण्यासाठी नागरिकांनी घ्यावयाची काळजी, पोलिस दलाच्या बॉम्बशोधक पथक आणि त्याकरिता वापरण्यात येणारी विविध उपकरणे, यांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.

या वेळी प्राचार्य डॉ. प्रभाकर भट, पोलिस हेड कॉन्स्टेबल अरुण पाटील, बाळू पाटील, पोलिस कान्ॅस्टेबल शरद पाटील, पोलिस नाईक राजेंद्र जंगले, सलीम शेख, महाविद्यालयाचे मानव संसाधन समन्वयक गणेश पाटील उपस्थित होते. सार्वजनिक ठिकाणी, गर्दीच्या जागी व प्रवासात वावरताना काळजी घेतली पाहिजे. कोणत्याही आमिषाला बळी न पडता सदैव सतर्क राहायला हवे. काही संशयास्पद आढळल्यास संरक्षणाच्या दृष्टिकोनातून त्वरित पोलिस दलास माहिती द्या. अफवांवर विश्वास ठेवू नका. तुम्ही सुज्ञ विद्यार्थी आहात. विद्यार्थ्यांच्या माध्यमातून समाजातील सर्वस्तरांपर्यंत माहिती पोहोचविणे शक्य होते, असे मत शरद पाटील यांनी व्यक्त केले.

अरुण पाटील यांनी 9 कर्मचारी, 2 प्रशिक्षित श्वानांचा समावेश असल्याचे सांगितले. तसेच दहशतवादी कारवाई, घातपात हे व्यापारी संकुल, मॉल, रेल्वे स्टेशन, यात्रेच्या ठिकाणी व गर्दीच्या ठिकाणी होण्याची शक्यता असते. तेथे जीविताचे व मालमत्तेचे रक्षण करणे, प्राणहानी टाळणे, महत्त्वाच्या व्यक्तींची सुरक्षा करणे हे मुख्य कार्य पथकाची असल्याचे त्यांनी सांगितले. जनसंपर्क अधिकारी स्वामी पाटील यांनी आभार मानले.

बेवारस, संशयित खेळणी, सायकल, दुचाकी वाहन, पिशवी, सुटकेस, गाठोडे, टिफिन बॉक्स, आकर्षक दिसणार्‍या वस्तू, इलेक्ट्रॉनिक्स सॉकेट या वस्तू दिसल्यास त्यांना स्पश्र न करता सुरक्षित अंतरावर राहावे. प्रत्यक्ष अनोळखी व्यक्तींनी दिलेल्या भेटवस्तू, बॉक्स सील बंद पाकीट, बुके, पुष्पगुच्छ, बाटली, मोबाइल सारख्या वस्तू स्वीकारू नये. संशयित बॉम्ब सदृश वस्तूंना हात लावणे, उघडणे, हलविणे आग लावून नष्ट करणे, असे कोणतेही कृत्य करू नये, याविषयी टिप्स देण्यात आल्या.