आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Disease News In Marathi, Infectious Disease Issue At Jalgaon, Divya Marathi

गोवरमुळे चिमुरडे हैराण, दीड महिन्यापासून रुग्णसंख्येत वाढ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- वातावरणात सतत होणार्‍या बदलामुळे व्हायरल इन्फेक्शनचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे किरकोळ आजारांचे प्रमाण वाढलेले असतानाच गेल्या दीड महिन्यापासून लहान मुलांमध्ये गोवरचे प्रमाणही वाढले आहे. आता तीन महिन्यांच्या बाळालाही गोवर झाल्याने या आजाराची तीव्रता लक्षात येते. अंगावर येणार्‍या लाल पुरळांमुळे चिमुरडे हैराण झाले आहेत.

सर्वसाधारणपणे नोव्हेंबर ते मार्चदरम्यान गोवरचे प्रमाण असते. यंदा मात्र काही वर्षांच्या तुलनेत गोवरचे प्रमाण वाढल्याचे लहान मुलांच्या दवाखान्यांतील निरीक्षणातून पाहायला मिळत आहे. जगात गोवरमुळे होणार्‍या एकूण मृत्युदरापैकी 27 टक्के एवढे प्रमाण भारतात असल्याची आकडेवारी आहे. याबाबत जागतिक आरोग्य संघटना व युनिसेफने सन 2007पासून सर्वेक्षण कार्यक्रम हाती घेतला आहे; परंतु शासकीय पातळीवर मात्र याबाबत उदासीनता असल्याचे दिसून येते. जळगावातील दवाखान्यांमध्ये येणारे रुग्ण हेशहरासह ग्रामीण भागातील असल्याचे दिसते. त्यात चार ते सहा महिने व 10 ते 15 वर्षांच्या मुलांचे प्रमाण अधिक आहे.

तीन महिन्यांच्या बालकांनाही त्रास
गोवरचा आजार हा शक्यतो तीन वर्षांआतील बालकांना होतो. आईकडून मिळालेल्या रोगप्रतिकारक शक्तीमुळे सहा महिन्यांपर्यंत बाळाला आजार होत नाही; परंतु आता या रोगप्रतिकारक शक्तीचा प्रभावदेखील कमी झाला की काय? असा संशय व्यक्त होऊ लागला असून, तीन महिन्यांच्या बाळामध्येही गोवरची लक्षणे पाहायला मिळू लागली आहेत. त्यासाठी ज्या ठिकाणी असे रुग्ण आहेत त्या गाव व परिसरात सर्वेक्षणाची गरज व्यक्त होत आहे.

‘अ’ जीवनसत्त्वाचा वापर आवश्यक
गोवर झालेल्या मुलांवर डॉक्टरांच्या सल्लय़ाने त्वरित उपचार करणे गरजेचे असते. अशा रुग्णांमध्ये ‘अ’ जीवनसत्त्व वाढवण्याच्या दृष्टीने प्रय} व्हायला हवेत. त्यासाठी आहारात दूध व दुधाचे पदार्थ, हिरवा भाजीपाला, मासे, अंड्यातील पिवळा भाग, गाजर, टोमॅटो, पपई, आंबा, बटाट्यांचे प्रमाण वाढवावे. तसेच लहान मुलांना आईचे दूध आवश्यक आहे.

काय असतात लक्षणे?
व्हायरल इन्फेक्शनमुळे हा आजार होतो. या आजारात अंगावर लाल पुरळ येते. बहुतांश प्रमाणात चेहरा, मान, छाती, पोट, हात-पायांवर ही पुरळ असते. त्याचप्रमाणे तीन ते चार दिवस नाकातून पाणी येणे, डोळे लाल होणे, खोकला येणे, मध्यम किंवा तीव्र स्वरूपाचा ताप येणे, क्वचित डोळे खराब होऊन अंधत्व येणे, न्यूमोनिया व कुपोषणामुळे प्रसंगी मृत्यूही ओढवू शकतो.

काय काळजी घ्यावी?
गोवर रुग्णाच्या संपर्कात कमी जावे. पुरळ येण्याआधी चार दिवस व नंतरचे चार दिवस रुग्णाकडून संपर्कातील व्यक्तींमध्ये या आजाराचा प्रसार होतो. शिंकणे व खोकलण्यातून 90 टक्के संक्रमण होऊ शकते. त्यासाठी अशा रुग्णांनी जास्तीत जास्त आराम करणे व लहान मुलांना वेळेवर लसीकरण करवून घेणे गरजेचे असते.

रुग्णांचे प्रमाण वाढले
गेल्या दीड-दोन महिन्यांपासून लहान मुलांना गोवर होण्याचे प्रमाण वाढले आहे. या आजारात अंगावर पुरळ येते. त्यामुळे मुले चिडचिड करतात. अशा रुग्णांना ‘अ’ जीवनसत्त्व मिळणे गरजेचे असते. विशेष म्हणजे, यंदा तीन महिन्यांच्या बाळामध्येही गोवरची लक्षणे पाहायला मिळाली आहेत. हा साथीचा आजार असल्याने काळजी घेणे गरजेचे असते. डॉ.हेमंत पाटील, बालरोगतज्ज्ञ

सर्वेक्षणाचे आदेश दिले
गोवरचे रुग्ण हॉस्पिटलमध्ये येत असल्याची माहिती मिळाली आहे. यासंदर्भात वैद्यकीय अधिकार्‍यांच्या बैठकीत सूचना करून सर्वेक्षणाचे आदेश दिले आहेत. तसेच शंभर टक्के लसीकरणावर भर दिला जातो. डॉ.शिवाजी पवार, आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद