आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा बँकेतील वाद पोलिसात नेण्याची तयारी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- जिल्हा बॅँकेत सुरू असलेले टोकाचे राजकारण पुन्हा पोलिस ठाण्यापर्यंत जाण्याची शक्यता आहे. भरतीप्रकरणी डॉ.सतीश पाटील यांनी कोणतेही पुरावे नसताना आरोप केले आहेत. त्यामुळे त्यांच्याविरोधात फौजदारी दाखल करण्याचा इशारा जिल्हा बँकेचे अध्यक्ष चिमणराव पाटील यांनी दिला आहे. तर संचालकांनी केलेल्या ठरावात बदल केल्याप्रकरणी अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक यांच्याविरोधात पोलिसात जाण्याची तयारी राष्ट्रवादीच्या संचालकांनी दर्शविली आहे. कर्मचारी भरती प्रकरण केवळ निमित्त ठरलेले जिल्हा बँकेचे राजकारण पुन्हा त्याच वळणावर गेले आहे.

संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये जे.टी.महाजन सूतगिरणी विक्री होईपर्यंत भाड्याने देण्याचा ठराव करणार्‍या विरोधी संचालकांनी दोन दिवसानंतर गिरणी भाड्याने देण्यास विरोध केल्यामुळे सूतगिरणी बंद पडली आहे. दरम्यान, नोकरभरतीप्रकरणी माझ्यावर वैयक्तिक आरोप करणारे डॉ.सतीश पाटील आणि डॉ.सतीश देवकर यांच्यावर गुन्हा दाखल करणार असे जिल्हा बँकेचे अध्यक्ष पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

नोकरभरतीमध्ये डॉ.सतीश पाटील यांनी माझ्यावर पैसे घेतल्याचा वैयक्तिक आरोप केला आहे. वास्तविक त्यांना शक्य नसलेली भरती मी करीत असल्याने त्यांचे मानसिक संतुलन बिघडले असल्याचा आरोप चिमणराव पाटील यांनी केला. गावात उपस्थित राहूनही राष्ट्रवादीचे संचालक बैठकीला उपस्थित राहिले नाहीत. हिंमत असेल तर उपस्थित राहून विरोध केला पाहिजे. 35 जागांच्या भरतीचा ठराव सर्वांनी केला आहे.

अध्यक्षांनी उपसले जुने हत्यार

डॉ.सतीश पाटील यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळातील गैरव्यवहाराची चौकशी करावी याबाबत चिमणराव पाटील यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता. त्यांच्या पाठपुराव्याने बँकेतील अनेक प्रकरणाची चौकशी होऊन विशेष लेखापरीक्षकांनी अहवाल सहकार विभागाला सादर केला आहे. पाठपुरावा करणार्‍या चिमणराव पाटलांनी अध्यक्षपद मिळाल्यानंतर या प्रकरणाकडे दुर्लक्ष केले होते. भरतीप्रक्रियेवरून डॉ. पाटील यांनी आरोप करताच त्यांच्या बंदोबस्तासाठी चिमणराव पाटील यांनी पुन्हा जुने हत्यार उपसले आहे.


पोलिसांकडे अहवाल

तत्कालीन अध्यक्ष डॉ.सतीश पाटील यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून विशेष लेखापरीक्षकांनी अहवाल सादर केला आहे. गेल्या आठ महिन्यांपूर्वी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिस अधीक्षकांकडे अहवाल दिला आहे. या अहवालात गंभीर ताशेरे ओढण्यात आले आहेत. पोलिस अधीक्षकांवर गुन्हा दाखल करू नये म्हणून दवाब आणला जात आहे. परंतु गुन्हा दाखलसाठी पाठपुरावा करणार असे चिमणराव पाटील यांनी सांगितले.