आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वसुलीस पात्र नगरसेवक निवडून आले तरी अपात्रच - एकनाथ्‍ा खडसे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - घरकुल व वाघूर घोटाळ्यात महापालिका प्रशासनाने वसुलीच्या नोटीस बजावलेल्या नगरसेवकांनी निवडणुकीत विजय मिळवला तरी ते पुढे अपात्र ठरतील ही काळ्या दगडावरील रेघ असल्याची भविष्यवाणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषदेत केली. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खडसेंनी गुरुवारी येथे पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, खान्देश विकास आघाडी असो की आणखी कोणती आघाडी, त्यांनी जो भ्रष्टाचार केला त्याला कागदपत्रांचे पुरावे आहेत. तरीही खान्देश विकास आघाडीने राजकीय दबाव आणून आणि न्यायालयात धाव घेऊन भ्रष्टाचार दडपण्याचा प्रयत्न केला आहे.

रमेश जैन यांचा भ्रष्टाचाराला पाठिंबा
पालिकेच्या योजनांसंदर्भात विशेष लेखापरीक्षण झाले. त्यानुसार भ्रष्टाचाराचे गुन्हे दाखल आहेत. 35 वर्षांत जळगावकरांनी महापालिकेतील सत्ताधार्‍यांना साथच दिली आहे; परंतु सत्ताधार्‍यांनी त्यांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली नाही. त्यामुळे आता हे सत्ताधारी पुन्हा काय विकासाचे मॉॅडेल देणार? असा प्रश्न खडसेंनी उपस्थित केला. घरकुल, वाघूर घोटाळ्यात पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. यात स्वत:ला ‘सह्या’जीराव म्हणणार्‍यांनाच खान्देश विकास आघाडीने पुन्हा उमेदवारी दिली. 90 टक्के नगरसेवक भ्रष्ट असल्याचे रमेश जैन यांनीच म्हटले होते. त्यांनाच पुन्हा त्यांनी तिकीट दिले. यावरून रमेश जैन हे भ्रष्टाचाराला पाठिंबा देत आहेत, हेच स्पष्ट होते. गैरव्यवहारातून पैसा कमावणे व पैशांतून सत्ता मिळवण्याचे हे चक्र असल्याचा आरोप त्यांनी केला.

अटलांटाप्रकरणी माहिती मागवली
35 वर्षांत शहरातील उद्योग बाहेर गेले असून याला स्थानिक सत्ताधार्‍यांचे धोरण जबाबदार आहे. मनपा व एमआयडीसी अशा दोघांकडून कराची वसुली होते; परंतु सुविधा कोणीही देत नाही. त्यामुळे उद्योग क्षेत्रात असलेले जळगावचे नाव मागे पडले आहे. घरकुल, वाघूर, जिल्हा बॅँकेसंदर्भातील गुन्हे दाखल असून अँटलांटाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या रस्त्यांसंदर्भात सरकारने माहिती मागवली आहे. त्यातही गुन्हा दाखल होऊ शकतो. भ्रष्टाचार असल्याने सरकार महापालिकेला मदत द्यायला तयार नाही, असेही खडसे म्हणाले.

स्वप्न दाखवण्यात रस नाही
मनपावरील 350 कोटींचे कर्ज फे डणे सत्ताधार्‍यांना अवघड आहे. सतरा मजली इमारत तसेच शहरातील दुकानेही गहाण आहेत. हुडकोकडून दुकानांचा जाहीर लिलाव करण्याची अंतिम नोटीस लवकरच दिली जाण्याची शक्यता आहे. मालमत्ता विकून कर्ज फे डण्याची वेळ महापालिकेवर आली आहे. सत्तेवर कोणीही आले तरी 350 कोटींचे कर्ज त्यात दुकानांचा लिलाव थांबवणे गरजेचे असून ते मोठे आव्हान आहे. त्यामुळे मतदारांनी सद्सद्विवेक बुद्धीने मतदान करावे, असे आवाहनही त्यांनी केले. पालिकेची आर्थिक परिस्थिती पाहता आता जळगावकरांना केवळ स्वप्न दाखवण्यात रस नाही. कारण ते पूर्ण होणे शक्य नाही. मात्र, भाजपची सत्ता आली तर किमान नागरी सुविधा देण्याचा प्रयत्न आम्ही करू, असेही त्यांनी सांगितले.

चौधरी, रायसोनींशी चर्चा
कारागृह भेटीनंतर विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी शासकीय दौरा असल्याचे सांगून तुरुंगातील कोणाशीही वैयक्तीक चर्चा केली नसल्याचे म्हटले होते. परंतु पत्रकार परिषदेत त्यांनी संतोष चौधरी व प्रदीप रायसोनी यांच्याशी चर्चा केल्याचे सांगून राजकीय क्षेत्रातील धुरिणांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. या भेटीत काय चर्चा झाली? हे मात्र निवडणुकीनंतर सांगणार असल्याचे म्हणत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न खडसे यांनी या वेळी केला.


हे आहेत उमेदवार
खान्देश विकास आघाडी : दत्तात्रय देवराम कोळी, रेखा चत्रभुज सोनवणे, अजय राम जाधव, विजय रामदास वाणी, पुष्पा प्रकाश पाटील, सदाशिव गणपत ढेकळे, सुभद्रा सुरेश नाईक, चंद्रकांत बळीराम सोनवणे
मनसे : विजय कोल्हे, सिंधू कोल्हे


ही बाब न्यायप्रविष्ट आहे
निवडून आल्यानंतरही नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई होईल असे म्हटले जात असले तरी ही कारवाई कोण करेल. घरकुलप्रकरणी काम सुरू आहे. त्यामुळे ही बाब न्यायप्रविष्ट आहे. न्यायालय जेव्हा जबाबदारी निश्चित करेल तेव्हाच थकबाकी होऊ शकते असे मला वाटते. वसुलीच्या नोटीससंदर्भातील कारवाईला स्थगिती मिळाली आहे. न्यायालय जो निर्णय देईल तो मान्य असेल. गुलाबराव देवकर, माजी पालकमंत्री


खडसेंनी आता भविष्यच बघावे
नगरसेवक अपात्र ठरतील असे भविष्य एकनाथ खडसे वर्तवत असतील तर त्यांनी राज्याच्या विरोधी पक्षनेतेपदापेक्षा भविष्य सांगण्याचे काम सुरू करावे. माझा यापूर्वीही भ्रष्टाचाराला कधी पाठिंबा नव्हता व कधीच राहणार नाही. या निवडणुकीत कित्येक नवीन चेहर्‍यांना संधी दिली असून तरुण उमेदवार दिले आहेत. खडसे नेमके काय बोलले हे माहीत नसल्याने त्यावर आताच बोलणे उचित ठरणार नाही. रमेश जैन, नेते, खान्देश विकास आघाडी.