आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा बँक व्यवहाराची नाबार्डतर्फे चौकशी करा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - जिल्हा बँकेचे आपण अधिकृत सभासद असताना आपल्याला वार्षिक सभेत बँक पदाधिकाऱ्यांच्या अनधिकृत समर्थकांकडून अन्यायकारक वागणूक मिळाली आहे. शेतकऱ्यांच्या बँकेत शेतकऱ्यांनाच प्रश्न विचारण्याचा अधिकार नसेल तर ही बँक कुणासाठी आहे. कर्जपुरवठा बंद करून ही बँक केवळ शोभेची बनली आहे, असे आरोप करीत अन्यायकारक वागणुकीची जिल्हा बँकेच्या व्यवहाराची नाबार्डने चौकशी करावी, अशी मागणी जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपाध्यक्ष कैलास चौधरी यांनी केली आहे.

जिल्हा बँकेची बुधवारी १०० वी सर्वसाधरण वार्षिक सभा झाली. त्या वेळी प्रश्न उपस्थित केल्याबद्दल कैलास चौधरी यांना बाहेर काढण्यात आले होते. या विषयावर आपली भूमिका मांडण्यासाठी चौधरी यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले की, आमदार एकनाथ खडसे हे मंत्रिपदावरून पाय उतार झाल्याने त्यांची अस्वस्थता वाढली आहे. त्यांनी आधी शेतकरी कोण आहे तो काय करू शकतो, याचा अभ्यास करावा. बँकेच्या बैठकीत मी अधिकृत सदस्य असताना, मला समर्थकांकरवी हाकलण्याचा प्रयत्न झाला. मात्र, हाकलणारे समर्थक हे बँकेचे सभासद आहेत का हे आधी तपासावे त्यांच्यावर कारवाई करणार का? हेही जाहीर करावे. बेळगाव, वसंत, चोसाका सारखे अनेक कारखाने बंद पडले आहेत, यावर कोणतेही निर्णय होत नाहीत. खडसे यांच्या चौकटीतील लोक चुकीची माहिती देतात. त्यावर खडसे निर्णय घेतात.
शेतकरी हिताविरुद्ध निर्णय घेणाऱ्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही. चुकीच्या निर्णयाचा जाब विचारणाऱ्यांना वेठीस धरण्याचा हा खडसे यांचा धंदाच बनला आहे. कृउबातील उपाध्यक्षपदाचा आपण यापूर्वीच राजीनामा आपल्या नेत्यांकडे सोपवला असल्याचेही चौधरी यांनी या वेळी स्पष्ट केले. यावेळी पत्रकार परिषदेस शिवसेनेचे राजेंद्र चव्हाण, अॅड. हर्षल चौधरी आदी उपस्थित होते.

आरोपांच्या फैरी
>कर्जपुरवठा बंद करून ही बँक केवळ शोभेची
>मंत्रिपदावरील पायउतारामुळे खडसेंची अस्वस्थता
>चुकीच्या निर्णयाचा जाब विचारणाऱ्यांना वेठीस धरण्याचा धंदाच
>शेतकऱ्यांच्या बँकेत शेतकरीच वंचित
बातम्या आणखी आहेत...