आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणुकीसाठी संस्थांना चुकवावी लागणार जिल्हा बँकेची थकबाकी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- राजकीय क्षेत्रात जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे पडघम वाजत असताना दुसरीकडे ९७व्या घटना दुरुस्तीमुळे निर्माण झालेला पेच बँकेच्या सभासद सभासद संस्थांना हादरा देणारा आहे. बँकेचे सभासद राहण्यासाठी निवडणूक प्रक्रियेत सहभाग घेणे आणि त्यात सहभाग घेण्यासाठी बँकेची थकबाकी भरणे आवश्यक आहे. दरम्यान, थकबाकी भरल्यास अनेक मोठ्या संस्थांच्या प्रतिनिधींवर बँकेच्या निवडणुकीपासून लांब राहण्याची वेळ येण्याची शक्यता आहे. थकबाकीच्या अटीमुळे अनेक इच्छुकांच्या आशेवर पाणी फिरणार आहे तर दुसरीकडे वसुली होणार असल्याने बँकेची आर्थिक स्थिती भक्कम होण्यास मदत होणार आहे.
महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था अधिनियम १९६० या कायद्यात सन २०१३मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. ९७व्या घटना दुरुस्तीतील तरतुदी लागू करण्यासाठी सर्वच सहकारी संस्थांनी विशेष सभा घेऊन ठराव मंजूर केला आहे. त्यामुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सभासद असलेल्या ८७८ विविध कार्यकारी सोसायट्या आणि इतर सभासद संस्था जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सहभागी होण्यासाठी थकबाकीदार नसणे आवश्यक आहे. या संस्थांना निवडणूक प्रक्रियेत सहभाग घेण्यासाठी सहकार विभागाने नोटीस काढल्यानंतर ३० दिवसांत कर्जाच्या थकबाकीची रक्कम व्याजासह भरणा केल्याची पावती सादर करणे आवश्यक आहे. वैयक्तिक सभासद आणि सभासद संस्था थकबाकीदार असल्यास त्यांना मतदानाचा अधिकारच नसेल आणि संबंधित संस्थेवर प्रतिनिधित्व करणे, कामकाजात भाग घेण्यापासूनही लांब रहावे लागणार आहे.
थकबाकीमुळे हादरे
बँकेच्यासंचालक मंडळावर येऊ पाहणारे परंतु संस्थांवर कर्ज असलेले अनेक इच्छुक दिग्गज थकबाकीच्या अटीमुळे हादरले आहेत. स्वत:कडील आणि आपल्या मतदार संस्थेकडील थकबाकी भरणे शक्य नसल्याने बँकेच्या निवडणूक प्रक्रियेपासून लांब राहण्याची वेळ काही दिग्गजांवर येऊ शकते. दरम्यान, इतर संस्थांमध्ये अनेक संस्था वर्षानुवर्षे थकबाकीदार असल्याने त्यांना मतदानाचा हक्कही बजावता येणार नाही.
बँकेलावसुलीची संधी...
आर्थिक आणीबाणीतून मार्गक्रमण करत पुढे आलेल्या जिल्हा बँकेला एनपीए कमी करण्यासाठी निवडणूक फायद्याची ठरणार आहे. ९७व्या घटना दुरुस्तीमुळे बँकेला थकबाकीदार संस्थांकडील थकबाकी वसूल करता येणार आहे. त्यामुळे बँकेचा एनपीए कमी होण्यास मदत होणार आहे. निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर पुढील महिन्यात संबंधित थकबाकीदारांना सहकार विभागाकडून थकबाकी भरण्याची नोटीस दिली जाऊ शकते.