आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सकाळी निदर्शने...दुपारी घेतली लाच

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर कर्मचाऱ्यांसाेबत वेतनासाठी लढा देणारे कार्यकारी अभियंता चंद्रकांत दुपारी स्वत:च लाच घेताना जाळ्यात अडकले. एकाच दिवसात चंद्रकांत वाघ यांची दाेन रूपे जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांना पाहायला मिळाली. या विभागाला कार्यकारी अभियंत्यांनीच काळिमा फासला अाहे. अातापर्यंत कार्यकारी अभियंता दर्जाच्या तीन अधिकाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ लाच घेताना पकडले अाहे. त्यात अाता स्वत:ला विशिष्ट संप्रदायाचा भक्त म्हणवून घेणाऱ्या अापल्या दालनात सतत उदबत्तीचा सुगंध दरवळत राहील याची दक्षता घेणाऱ्या चंद्रकांत वाघ यांचा समावेश झाल्याने जिल्हा परिषदेत काही काळासाठी खळबळ उडाली हाेती.
जिल्हा परिषदेच्या चंद्रकांत वाघ यांनी सकाळी ११ वाजेदरम्यान जीवन प्राधिकरण विभागाच्या कर्मचाऱ्यांसाेबत जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर निदर्शने केली. जीवन प्राधिकरणाच्या उत्पन्नाचे मार्ग शासनाने बंद केले. त्यामुळे अधिकारी कर्मचाऱ्यांचे वेतनही होत नाही. त्यामुळे आर्थिक तूट भरून काढावी. तसेच अधिकारी कर्मचाऱ्यांना असलेल्या आर्थिक विवंचनेतून मुक्त करावे, या मागणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. या आंदोलनाचे प्रतिनिधित्व जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता चंद्रकांत वाघ यांनीच केले. या आंदोलनानंतर कार्यालयात अाल्यानंतर चंद्रकांत उर्फ सी. पी. वाघ यांच्यावर लक्ष ठेवून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. त्यांना रंगेहाथ ताब्यात घेतले. अवघ्या दोन तासापूर्वी जो अधिकारी वेतनासाठी लढत होता. त्याच अधिकाऱ्यास लाचप्रकरणी अटक होण्याची आतापर्यंतची ही पहिलीच घटना ठरली. दरम्यान जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागात कार्यकारी अभियंता पदावरून लाच घेताना अटक करण्यात आलेले सी. पी. वाघ हे तिसरे अधिकारी ठरले आहेत. यापूर्वी याच कार्यालयातील कार्यकारी अभियंता एन. एन. भोई, ठाकूर यांच्यावरही कारवाई झालेली आहे. विशेष बाब म्हणजे सी. पी. वाघ हे जळगाव जिल्ह्यात कार्यरत असताना तब्बल दोन कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेतील अपहारप्रकरणी त्यांच्यावर यापूर्वीच गुन्हा दाखल आहे. तसेच त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सर्वाेच्च न्यायालयाने फेटाळला अाहे. परिणामी आज ना उद्या वाघ यांना अटक होणे अटळ होते. जिल्हा परिषदेच्या सभांमध्ये सतत वादग्रस्त ठरणाऱ्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील भ्रष्टाचार यामुळे एकदा चव्हाट्यावर आला आहे. यापूर्वीच अनेक पाणीपुरवठा योजनांमध्ये चौकशी सुरू आहे. त्यात या घटनेने जणू पाणीपुरवठा योजनांमध्ये अपहार होतो या बाबीवर चक्क शिक्कामोर्तब केले अाहे. दरम्यान धार्मिक प्रवृत्तीचे लाचखोर सी. पी. वाघ यांनी काही वर्षांपूर्वी अशाच धार्मिक प्रवृत्तीचे भ्रष्ट भास्कर वाघ यांची आठवण करून दिली आहे.

चर्चेतील विभागांपैकी एक
जिल्हापरिषदेत अनेक वर्षांपूर्वी शून्याचा यथायोग्य वापर करून काेट्यवधींचा अपहार करणारे भास्कर वाघ यांचा लघुसिंचन विभाग नेहमीच चर्चेत राहतो.त्याच बरोबर बांधकाम विभागातही अनेक कांड घडतात. त्यात पाणीपुरवठा विभागही मागे नाही, हे वेळोवेळी सिद्ध केलेले आहे. जिल्ह्यातील पाणीयोजना वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. त्या पूर्ण होत नाही. तर दुसरीकडे पाणीपुरवठा विभागातील अिधकारी लहानमोठ्या रकमेची लाच घेताना अाढळून येत आहेत.

कठाेर पावले उचलणार...
^जिल्हा परिषदेचा कारभार अधिकाधिक पारदर्शक करण्याचा प्रयत्न केला आहे. शिक्षण विभागातील कारवाईनंतर सर्व विभागप्रमुखांसह कर्मचाऱ्यांना सूचना केलेल्या आहेत. मात्र, तरीही असे प्रकार होत असतील तर कठोर पावले उचलण्यात येतील. लोकाभिमुख प्रशासनाच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. ओमप्रकाशदेशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

दुपारी १२.४५ वाजता सकाळी ११.३० वाजता
जीवन प्रािधकरण विभागाच्या अिधकारी, कर्मचाऱ्यांसोबत निदर्शनाचे प्रतिनिधित्व करताना कार्यकारी अिभयंता वाघ (लाल वर्तुळात).

सी. पी. वाघांच्या दालनात नेहमी अगरबत्तीचा सुगंध
सी.पी. वाघ एका धार्मिक परिवाराशी संबंधित आहेत. कार्यालयात असतानाही नेहमी देवादिकांच्या नामजपासह इतर धार्मिक अनुष्ठान सुरू राहत.त्यांच्या कार्यालयात धूप, अगरबत्तीचा सुगंध नेहमीच दरवळत असे.

कार्यालयात कमी आणि दौऱ्यावर अधिक
सी.पी. वाघ हे कार्यालयात कमी आणि बाहेर अधिक वेळ देत होते. परिणामी बहुतांश वेळेस ते वरिष्ठांच्या रोषाचे धनी ठरत. वाघ कार्यालयात थांबत नसल्यामुळे त्यांच्या एेवजी कनिष्ठ अधिकाऱ्यांनाच वरिष्ठांच्या उत्तरांना सामोरे जावे लागते.

वाघांविरुद्ध यापूर्वीही गुन्हा
याप्रकरणात सापडलेले चंद्रकांत वाघ यांच्याविरुद्ध जळगाव िजल्हा परिषदेत झालेल्या अपहारप्रकरणीही गुन्हा दाखल झाला होता. त्या प्रकरणात त्यांना जामीनही नाकारण्यात अाल्याची माहिती अाहे. त्यानंतर त्यांची बदली धुळे येथे करण्यात अाली हाेती. दाेन वर्षांपूर्वी तत्कालीन कार्यकारी अभियंता भाेई यांच्यावरही लाचलुचपत प्रतिबंधक िवभागाकडून कारवाई झाली हाेती.

सहा महिन्यांतील चाैथी कारवाई
जिल्हापरिषद अधिकारी, कर्मचाऱ्यांविरुद्ध गेल्या सहा महिन्यांत लाचलुचपत प्रतिबंधक िवभागाने केलेली ही चाैथी कारवाई अाहे. यापूर्वी माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयातील विस्तार अधिकारी गेंदिलाल साळुंखे, त्यानंतर शिक्षण िवभागातील राहुल पवार नेरकर त्या नंतर गेल्याच महिन्यात िशरपूर येथील कृषी अधिकारी अभय कुंवर यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात अाली अाहे.तर दोन वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेत पाच हजारांची लाच घेताना विस्तार अधिकारी डी.एस.सोनवणे, पंचायत समितीत लघुसिंचन विभागाच्या ठाकूर नामक कर्मचाऱ्यास अटक करण्यात आली हाेती. त्यानंतर आता सी.पी.वाघ आणि पवार या दोन जणांवर कारवाई झाली आहे.