आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • District Council With Municipal ,25 Million Grant For Schools

जिल्हा परिषदेसह मनपाच्या शाळांसाठी २५ कोटी मंजूर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - सर्वशिक्षा अभियानांतर्गत जिल्हा परिषद महापालिकेच्या शाळांना मिळणारा निधी तांत्रिक अडचणीमुळे मिळाला नव्हता. त्यानंतर नवी दिल्लीतील प्रोजेक्ट अॅप्रुव्हल बजेट बोर्डाने जिल्हा परिषद महापालिकेच्या शाळांसाठी २५ कोटी ६० लाख रुपयांच्या बजेटला मंजुरी दिली आहे. या निधीतून शाळांमध्ये विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत.

जिल्ह्यातील शाळांचा दर्जा सुधारावा तसेच शाळांमध्ये विविध भौतिक सुविधा पुरवण्यासाठी सर्वशिक्षा अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानांतर्गत शाळांमध्ये बहुतांश योजना राबवण्यात आल्याने शासनाने सन २०११-१२ या आर्थिक वर्षापासून सर्वशिक्षा अभियानाच्या अंदाजपत्रकाच्या रकमेत कपात करण्यास सुरुवात केली आहे. एकीकडे ही स्थिती असताना दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या सर्वशिक्षा अभियान कार्यालयाने यंदा ६० कोटी रुपयांचे अंदाजपत्रक महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषदेकडे सादर केले होते. हे अंदाजपत्रक एप्रिल महिन्यामध्येच मंजूर होणे अपेक्षित होते. कारण केंद्र राज्याच्या अर्थसंकल्पातही सर्वशिक्षा अभियानासाठी आर्थिक तरतूद करण्यास मंजुरी देण्यात आली असली तरी जिल्ह्यासाठी निधी मंजूर झाला नव्हता. त्यानंतर गुरुवारी (दि.९) दिल्ली येथील प्रोजेक्ट अॅप्रुव्हल बोर्डाने जिल्ह्यासाठी २५ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक मंजूर केले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत मंजूर झालेली रक्कम कमी आहे.
तसेच मंजूर झालेल्या रकमेतून जिल्हा परिषदेसह महापालिका शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये विविध योजना राबवण्यात येणार आहे. त्यातही या निधीतून अपूर्ण कामे पूर्ण करण्यावर भर दिला जाणार आहे. या वर्षी मंजूर झालेल्या रकमेत नवीन बांधकामाचा अंतर्भाव करण्यात आलेला नाही. मंजूर रक्कम अपंग विद्यार्थ्यांचे शिक्षण, गणवेश, पाठ्यपुस्तक वाटप, शिक्षकांचे प्रशिक्षण, विशेष शिक्षकांचे वेतन, शौचालय आदी बाबींवर खर्च केली जाणार आहे. तसेच गुणवत्ता विकास कार्यक्रमांतर्गत काही उपक्रम राबवले जाणार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, सर्वशिक्षा अभियानांतर्गत गेल्या महिन्यात मोफत पाठ्यपुस्तक वाटप करण्यात आले होते. त्याचबरोबर काही विद्यार्थ्यांना गणवेशही देण्यात आले.

- ६० कोटी रुपयांचे अंदाजपत्रक पाठविले होते राज्य प्राथमिक शिक्षण परिषदेकडे.
- मंजूर निधी शिक्षकांच्या वेतनासाठी, स्वच्छतागृहांच्या कामासाठी वापरणार.

वेतनाचा तिढाही सुटेल
अंदाजपत्रकमंजूर झाले नसल्याने सर्वशिक्षा अभियानांतर्गत कार्यरत असलेल्या कर्मचा-यांना गेल्या तीन ते चार महिन्यांपासून वेतन मिळाले नव्हते. त्यात जिल्हा परिषद, गटशिक्षणधिकारी स्तरावर कार्यरत कर्मचा-यांसह विषयतज्ज्ञ, साधनव्यक्ती आदींचा समावेश आहे. अंदाजपत्रक मंजूर झाल्याने या कर्मचा-यांच्या वेतनाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे कर्मचा-यांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, सर्व शिक्षा अभियानातंर्गत जिल्ह्यातील शाळामध्ये स्वच्छतागृह उभारण्यासह वर्ग खोल्यांचे बांधकाम यापूर्वीच करण्यात आले आहे. त्यामुळे शाळांची चांगली सोय झाली आहे.

सर्वशिक्षा अभियानांतर्गत अंदाजपत्रक मंजूर झाले असले तरी अद्याप कोणत्या योजनेसाठी किती तरतूद करण्यात आली आहे याचे विभाजन झालेले नाही. निधी विभाजनासाठी अंतिम प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिका-यांकडे पाठवण्यात आला आहे.