आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा परिषद ते रेल्वेस्थानक रस्ता रुंदीकरणाचा मार्ग मोकळा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानालगतच्या संकुलातील उर्वरित गाळेधारकांनी शनिवारी स्वत: स्थलांतराचा मार्ग पत्कारला. उर्वरित दोघे गाळेधारकांनी नवीन गाळ्यांच्या चाव्या नेल्याची माहिती अतिक्रमण अधीक्षकांनी दिली. गाळे खाली होताच तेथील बांधकाम पाडण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यानंतर रस्ता रुंदीकरणाच्या कामाला सुरुवात होणे शक्य आहे. जिल्हा परिषद चौक ते रेल्वेस्थानकादरम्यानचा रस्ता रुंदीकरण करण्यासाठी महापालिकेने मुखर्जी संकुलातील 47 दुकानांचे स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी उद्यानाच्या दक्षिण बाजूला नवीन गाळे बांधण्यात आली आहेत. मात्र, काही गाळेधारकांनी यापूर्वीच स्थलांतरित होण्याचा निर्णय घेतला होता. तर काही गाळेधारकांचा या स्थलांतरास विरोध होता. स्थलांतरास विरोध असलेल्या 13 जणांनी दाखल केलेली याचिका औरंगाबाद उच्च न्यायालयाने फेटाळली होती. त्यानंतर काही गाळेधारकांनी पालिकेत अर्ज करून स्थलांतर करण्याची इच्छा व्यक्त केली होती. दरम्यान, 13 पैकी 11 गाळेधारकांनी गेल्या आठवड्यात स्थलांतर करून घेतले. मात्र, मालतीबाई अग्रवाल व नरेंद्र सोनवणे या गाळेधारकांनी स्थलांतर केले नव्हते. न्यायालयाने याचिका फेटाळल्याने संबंधितांना स्थलांतरित होणे बंधनकारक होते. अखेर शनिवारी दुपारी नारायण अग्रवाल तर सायंकाळी दीपक सोनवणे यांनी नवीन दुकानांच्या चाव्या पालिकेतून नेल्या. दुकानातील साहित्य स्थलांतरित करण्यासाठी त्यांनी काही अवधी मागितला होता.
तातडीने झाली कारवाई
अतिक्रमण अधीक्षकांविरुद्ध धमकावल्याची तक्रार करणारे नारायण अग्रवाल यांनी सायंकाळी 6 वाजेपर्यंत आपले साहित्य काढून घेतले होते. त्यामुळे अतिक्रमण विभागाच्या पथकाने जेसीबीच्या सहायाने तातडीने हे दुकान पाडून जागा मोकळी केली. दीपक सोनवणे यांनी सकाळपर्यंतची मुदत मागितली आहे.