आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • District General Hospital,Latest News In Divya Marathi

‘सिव्हिल’ला शवपेट्या प्राप्त; मात्र शवविच्छेदनगृहच नाही

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- जिल्हा सामान्य रुग्णालयाला डीडीएचएसकडून शुक्रवारी तीन मॉर्च्युरी कॅबिनेट (शवपेट्या) मिळाल्या आहेत. मात्र, त्या ठेवण्यासाठी जागाच नाही. कारण गेल्या अनेक महिन्यांपासून शवविच्छेदनगृहाचे काम बांधकाम विभागाला पैसे देऊनही रखडलेलेच आहे. त्यामुळे या शवपेट्या ठेवायच्या कुठे? हा प्रश्न सध्या जिल्हा रुग्णालय प्रशासनासमोर उभा ठाकला आहे. सध्या गोदामात ठेवल्या आहेत.

‘चणे आहेत पण दात नाहीत’
डीडीएचएसने जिल्हा सामान्य रुग्णालयाला तीन शवपेट्या दिल्या आहेत. मात्र, त्या ठेवण्यासाठी पुरेसी जागा नसल्याने ‘चने आहेत, पण दात नाही’ अशी अवस्था जिल्हा सामान्य रुग्णालयाची आहे. जानेवारी 2013 मध्ये जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाने बांधकाम विभागाला शवविच्छेदनाच्या नूतनीकरणासाठी 35 लाख रुपयांचा निधी दिलेला आहे. मात्र, अभियान संचालकांच्या मंजुरीमुळे अनेक दिवसांपासून तो प्रस्ताव पडून होता. तर काही दिवस धनादेश मुंबईच्या बॅँक शाखेचा दिल्याने काम रखडले.
वॉरंटी 24 महिन्यांची
हिमाचल प्रदेशातील इस्टिम इंडस्ट्रीजने तयार केलेल्या शवपेट्या जिल्हा रुग्णालयाला शुक्रवारी मिळाल्या. त्या स्वीकारल्यापासून म्हणजे शुक्रवारपासूनच 24 महिन्यांची वॉरंटी दिली आहे. अजून ठेवण्यासाठी जागा, शवविच्छेदनगृह नाही. त्यामुळे पुढील दोन वर्षे त्या वापराविना पडून राहिल्या तर त्यांचा वॉरंटी काळ असाच निघून जाईल.

कशा आहेत शवपेट्या?
तीन शवपेट्या अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर मिळाल्या आहेत. त्यांची लांबी 2400 मिमी, रुंदी 800 मिमी, उंची 1600 मिमी आहे. एका पेटीत एकाच वेळी दोन शव ठेवता येऊ शकतात. कमीत कमी 2 अंश आणि जास्तीत जास्त 8 अंशापर्यंत त्यातील तापमान ठेऊ शकतो. एका पेटीची किंमत 1 लाख 99 हजार 500 रुपये आहे. एकूण 5 लाख 98 हजार 500 रुपये किमतीच्या या शवपेट्या आहेत.
सध्या सिव्हिलमध्ये काय व्यवस्था आहे
जिल्हा सामान्य रुग्णालयात सध्या शव ठेवण्यासाठी स्वतंत्र व्यवस्थाच नाही. नादुरुस्त शवपेट्या अनेक वर्षांपासून आहे त्याच स्थितीत पडलेल्या आहेत. त्यामुळे मृताची ओळख पटली असेल तर नातेवाइकांना किंवा अज्ञात मृतदेहाच्या आजूबाजूला संबंधित पोलिसांना बर्फ लावण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. अनेक दिवस पडून राहिलेल्या मृतदेहांमुळे परिसरात दुर्गंधी पसरते. त्यामुळे येथे येणा-यांच्या आणि कर्मचा-यांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

चेक चुकीचा दिला
जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून मिळालेला धनादेश हा पेएबल अ‍ॅट मुंबई या नावाने असल्याने निधी मिळालेला नव्हता. त्यामुळे बांधकाम सुरू झाले नव्हते. मात्र, आता चेक मिळाला असून तत्काळ काम सुरू करण्यात येईल.
संजय सोनवणे, अधीक्षक अभियंता, बांधकाम विभाग
निधी वर्ग केलेला आहे
शवविच्छेदनगृहाच्या बांधकामासाठी बांधकाम विभागाला 35 लाखांचा निधी वर्ग करण्यात आला आहे. त्यांनी गेल्या महिन्यातच काम करून देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अजून कामाला सुरुवात झालेली नाही. डॉ. किरण पाटील, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक