आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्यदूत मंत्र्यांच्याच जिल्ह्याचे आरोग्य धोक्यात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- राज्यशासनाच्या मंत्रिमंडळात मोठे वजन असलेले दोन कॅबिनेटमंत्री जळगावचे आहेत. त्यातील एक मंत्री तर स्वाभिमानाने स्वत:ची ओळख आरोग्यग्यदूत अशी करून देतात; असे असले तरी जळगावचे आरोग्य मात्र सर्वाधिक धोक्यात आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्राची अवस्था सांगितलेली बरी. सामान्य रुग्णालयात रुग्ण उपचाराअभावी मृत्यूला सामोरेजात असताना शासन आणि स्थानिक मंत्री त्याकडे लक्ष देण्यास तयार नसल्याचा घणाघाती आरोप काँग्रेसचे महानगराध्यक्ष डॉ ए.जी.भंगाळे यांनी पत्रकार परिषदेत केला.
जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी जिल्हा शल्यचिकित्सकांसह डॉक्टर्स उपलब्ध नसल्याने काँग्रेसतर्फे गुरुवारी जिल्हा रुग्णालयावर मोर्चा काढण्यात आला. डॉक्टरांची ३७ पदे असताना प्रत्यक्षात सात डॉक्टरच उपलब्ध आहेत. दररोज शेकडो सामान्य पेशंट सामान्य रुग्णालयात येत असतात. त्यांच्यावर योग्य उपचार होऊ शकल्यामुळे काही जण मृत्यूला सामोरे जातात. परिणामी, जिल्ह्यात आरोग्याचा प्रश्न सर्वाधिक गंभीर झाला आहे. किमान आरोग्यदूत असलेल्या मंत्र्यांनी तरी याकडे लक्ष देण्याची गरज आहे. एखाद्या पेशंटला मुंबईला घेऊन जाण्यापेक्षा हाती सत्ता आणि आवड असल्याने जळगावातच आरोग्याच्या चांगल्या सुविधा आणि डॉक्टरांची फळी उभी करावी, अशी मागणी डॉ.भंगाळे यांनी व्यक्त केली. दरम्यान, जिल्हा रुग्णालयातील रिक्त जागा येत्या १५ दिवसांत भरल्यास काँग्रेस तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा या वेळी देण्यात आला.

काँग्रेसतर्फे निदर्शने
केंद्रशासनाने संसदेच्या अधिवेशनात एकाच वेळी २५ खासदारांचे निलंबन केले आहे. ही घटना लोकशाहीचा गळा घोटणारी आहे. ललित मोदी प्रकरणात दोषी असल्याने परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे, व्यापमं घोटाळ्याप्रकरणी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचा राजीनामा मागण्यात गैर काहीच नाही. खासदारांचे निलंबन हे मोदींच्या हुकूमशाही राजवटीचे उदाहरण आहे. या घटनेचा निषेध म्हणून काँग्रेसतर्फे गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आल्याची माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड.संदीप पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी प्रदेश सचिव अॅड.सलीम पटेल, तालुकाध्यक्ष सुभाष पाटील, ब्लाॅक अध्यक्ष श्याम तायडे उपस्थित होते.

जिल्हा प्रशासनाला निवेदन
जिल्हाध्यक्ष,महानगराध्यक्षांसह डी.जी.पाटील, शैलेंद्र पाटील, राजेश करजगावकर, दीपक सोनवणे, जगदीश गाढे, परवेज पठाण, नारायण राजपूत, अरुणा पाटील, देवेंद्र मराठे राजस कोतवाल यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी उपजिल्हाधिकारी मनोहर चौधरी यांना निवेदन दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करताना काँग्रेसचे पदाधिकारी.
बातम्या आणखी आहेत...