आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जिल्हा रुग्णालयात केला जाणार पाच हजार लिटर रक्ताचा साठा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषदेने दिलेल्या प्रस्तावानुसार राज्य शासनाने रक्त आणि रक्त घटकांच्या पुरवठय़ासाठी आकारण्यात येणार्‍या दरात दुपटीहून जास्त वाढ केल्यामुळे सर्वसामान्यांना त्याची झळ सोसावी लागणार आहे. तथापि, जिल्हा सामान्य रुग्णालयात अत्याधुनिक दर्जाच्या मेट्रो ब्लड बॅँकेचे काम सुरू असून, ते अंतिम टप्प्यात आहे. डिसेंबर 2014पर्यंत ही ब्लड बॅँक कार्यरत होण्याची शक्यता असून, या ब्लड बॅँकेत 5 हजार लिटरपेक्षा जास्त रक्त साठवले जाणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय दूर होणार आहे.
अद्ययावत ब्लड बॅँक : या मेट्रो ब्लड बॅँकेत 5 हजार लिटर रक्त साठवण्याची क्षमता असणार आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयात येणार्‍या कोणत्याही रुग्णाला रक्त विकत घेण्याची गरज पडणार नाही. राज्य शासनाच्या आरोग्य खात्यातर्फे या बॅँकेसाठी एकूण 1.5 कोटींचा निधी मिळणार असून, त्यापैकी 86 लाखांचा निधी प्राप्त झाला आहे. त्यासोबतच बॅँकेसाठी स्वतंत्र रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली जाणार आहे. या बॅँकेचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे, ब्लड कम्पोनंट सेपरेशन युनिटसाठी अद्ययावत यंत्रणा उपलब्ध केली जाणार आहे. त्यामुळे रक्तातील पॅक्ड रेड सेल, फ्रेश फ्रोझन प्लाझ्मा, प्लेटलेट्स यासारखे घटक वेगळे करण्यास मदत होणार आहे. सध्या रक्त साठवण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. रुग्णालयातील रुग्णांना पुरेल एवढे रक्त पेढीत उपलब्ध होत नसल्याने रेडक्रॉस सोसायटीतर्फे रक्त पिशव्यांची व्यवस्था केली जाते.
अनेक आजारांच्या चाचण्याही होणार
या ब्लड बॅँकेत एचआयव्ही, सिकलसेल, कावीळ, टायफॉइड, मलेरिया यासारख्या आजारांसोबत इतर काही आजारांच्या रक्त चाचण्याही करणे शक्य होणार आहे. त्यामुळे अनेक रुग्णांच्या मुंबई व पुण्याच्या फेर्‍या वाचतील.
सुविधा उपलब्ध होणार
दरवर्षी उन्हाळ्यात रक्ताचा तुटवडा जाणवतो. या काळात महाविद्यालये बंद असल्याने रक्तदान शिबिरांचे आयोजनही करता येत नाही. तसेच या काळात अपघातांचे प्रमाणही वाढत असल्याने रक्ताची मागणी मोठय़ा प्रमाणात असते. ही समस्या या ब्लड बॅँकेमुळे दूर होणार आहे.
विविध पदे भरली जाणार

शहरी व ग्रामीण भागातील रुग्णांना सहजतेने आवश्यक ते रक्त व रक्त घटक उपलब्ध व्हावेत, यासाठी तांत्रिकदृष्ट्या अत्याधुनिक व पूर्णत: संगणकीकृत अशी मेट्रो ब्लड बॅँक जिल्ह्यात प्रथमच सुरू होणार आहे. या बॅँकेत संक्रमण अधिकारी, तंत्रज्ञ व वैद्यकीय समाजसेवक आदी पदे भरली जाणार आहेत.
सर्वसामान्यांना फायदा
जिल्हा रुग्णालयात सहा महिन्यांत मेट्रो ब्लड बॅँकेचे काम पूर्ण होईल. त्यामुळे सर्वसामान्यांना लाभ होणार आहे. एखाद्या डेंग्यूच्या रुग्णाला प्लेटलेट्ससारखा घटक लागतो. त्यामुळे आता जिल्हा रुग्णालयातच असे घटक उपलब्ध होणार आहेत. बीपीएल, राजीव गांधी योजनेसह केशरी कार्डधारकांना मोफत सेवा मिळते. डॉ.किरण पाटील, प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक