आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Divya Marathi Jalgaon Edition 2nd Anniversery Musical Night

‘सरीवर सरी..’त रसिक झाले चिंब!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - अग्गोबाई ढग्गोबाई.. अशा बालगीतांपासून ते ‘नसतेस तू घरी जेव्हा जीव तुटतुटता होतो..’ अशा एकापेक्षा एक सरस प्रेमकविता, गझल सादर करून संदीप खरे आणि सलील कुळकर्णी यांनी जळगावकर र्शोत्यांची मने जिंकली. तब्बल तीन तास चाललेल्या संगीत मैफलीत शेरोशायरीने प्रेक्षागृहात हास्यकल्लोळ निर्माण केला. मध्येच सादर केलेल्या ‘सरीवर सर..’ या गीताला दाद देत रसिकही चिंब झाले.

‘दिव्य मराठी’च्या दुसर्‍या वर्धापनदिनानिमित्त आयोजित सलील कुलकर्णी आणि संदीप खरे यांचा ‘आयुष्यावर बोलू काही’ या सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी खास जळगावकर वाचकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली. शनिवारी सायंकाळी कांताई सभागृहात हा कार्यक्रम झाला. सलील आणि संदीप यांनी पावसाच्या गाण्यांपासून वातावरण निर्मिती केली. ‘सरीवर सरी.’, ‘अग्गोबाई ढग्गोबाई.’ ह्या गीतांनी प्रेक्षागृहात चैतन्य आणले तर सलीलच्या ‘पाऊसराव’ या कवितेतून वास्तवता मांडली. यात ते म्हणतात, बिजलीच्या त्या तारांमधून अर्जंट आला फोन, पाऊसराव जमीन बोलतेय, बायको तुमची दुसरं कोण?, होता कुठे इतके दिवस..

‘स्पॅडमॅन’ने खदखदून हसविले

‘दूर देशी गेला बाबा, गेली कामावर आई, निज दाखवी वाट घरी कुणी नाही’ गीतातून संदीप यांनी वास्तवदर्शी चित्र उभे केले. मुलांना आईवडिलांनी वेळ द्यायलाच हवा, असा संदेशही यातून त्यांनी दिला. ‘सुपरमॅन’ हे पत्नीचीकैफियत मांडणार्‍या गीताला प्रतिसाद मिळालाच. पण त्याने रसिकांना आणखीन खुलविले. ‘स्पॅडमॅनची बायको म्हटली आमचे हे भलते चिकट ढिम्म बघत राहतात नुसते पापणीसुद्धा पडत नाही, काय नक्की मनात हे चेहर्‍यावर कळत नाही.’, ‘आमचं ध्यान कसं सांगू मलाच येऊन चिटकून बसतं.’ या गीताने वन्समोअरचा नारा दिला.

प्रेमकविता, शेरोशायरीला दाद

प्रेमकविता, गझलची जादू र्शोत्यांना भावली. प्रेमात पडल्यानंतर प्रेमवीराच्या मन:स्थितीवरही दोघांनी गमतीदार किश्श्यातून प्रकाश टाकला. दोघांनी बालकविता, प्रेमगीते, गझल आणि शेरोशायरी करून प्रेक्षकांना खिळवून ठेवले. शेवटच्या टप्प्यात परीक्षेच्या सुटीच्या गाण्याने धमाल उडवून दिली. ‘परीक्षेला उरले 30 दिवस, सहा पेपर मग सुटी.’ पालक आणि विद्यार्थ्याच्या मन:स्थितीवर प्रकाश टाकणार्‍या गाण्याला चांगलीच दाद मिळाली. ‘तुझं खरं की माझ खरं’ह्या सलीलच्या कवितेला भरभरून दाद दिली.