आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

EXCLUSIVE : खान्देशात 773 स्कूल बसवर RTOचा ‘वॉच’; 100 बस अनोंदणीकृत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - स्कूलबसवर अाता आरटीओ विभागाने लक्ष केंद्रित केले आहे. विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन स्कूल बसची पासिंग फिटनेस प्रमाणपत्र तपासले जात आहे. त्यानुसार आतापर्यंत खान्देशातील ७७३ नोंदणीकृत स्कूल बसपैकी ६९७ बसेसची तपासणी करण्यात आली आहे. सुमारे ७८ स्कूल बसमध्ये त्रुटी काढण्यात आल्या आहेत. कारवाईच्या भीतीने काही शाळांनी अद्यापही बसची तपासणी केलेली नाही. तसेच या व्यतिरिक्त १०० स्कूल बस अवैधरीत्या विद्यार्थी वाहतूक करत असल्याचे दिसून आले. 
 
अनेक प्रथितयश शाळांकडून विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया राबवताना डोनेशनप्रमाणे स्कूल बसच्या भाड्यापोटी मोठी रक्कम घेतली जाते; परंतु मोटार वाहन अधिनियमानुसार अनेक स्कूल बस अद्यापही आरटीओ कार्यालयाच्या रेकॉर्डवर नाहीत. धुळे, नंदुरबार जळगावमध्ये अशा स्कूल बसची संख्या १०० पेक्षा जास्त आहे. सद्य:स्थितीत धुळे, जळगाव, नंदुरबार जिल्ह्यात ७७३ स्कूल बस असल्याची नोंद आरटीओ कार्यालयाच्या दप्तरी आहे. त्यातील काही स्कूल बसची परिस्थिती दयनीय आहे. त्यामुळे अशा वाहनांमधून दररोज घर ते शाळा शाळेपासून पुन्हा घरी असा प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात येऊ शकतो. त्यामुळेच आरटीओ विभागाने अशा स्कूल बसवर वॉच वाढविला आहे. शिवाय नियमानुरूप या बसची तपासणी केली जाते आहे.
 
नोंदणीकृत बसमध्ये धुळे जिल्ह्यात २११, नंदुरबारमध्ये ११० तर जळगावमध्ये सर्वाधिक ४५२ बस आहेत. त्यापैकी ६९७ स्कूल बसेसची तपासणी करण्यात आली आहे. त्यात धुळ्यातील १६५, नंदुरबारमधील ९८ तर जळगावमधील ४३४ स्कूल बसचा समावेश आहे. उर्वरित ७६ स्कूल बस तपासणीसाठी आरटीओ कार्यालयाकडे अजूनही फिरकलेल्या नाही. तपासणी झालेल्या ६९७ स्कूल बसपैकी सुमारे ७८ वाहनांमध्ये त्रुटी काढण्यात आल्या आहेत. त्यापैकी ३० स्कूल बसमध्ये शासन नियमानुरूप सुविधा व्यवस्था नसल्यामुळे संबंधित शाळांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. १८ स्कूल बसवर परवान्याबद्दल कारवाई करण्यात आली आहे. तर २९ स्कूल बसना नोटीस देऊन कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. त्यात धुळ्यातील २६ जळगावमधील तीन बसचा समावेश आहे. याव्यतिरिक्त एक स्कूल बस जप्त केली. अद्याप फिटनेस सर्टिफिकेटसाठी आलेल्या ७६ स्कूल बसमध्ये त्रुटी आढळून येऊ शकतात. त्यामुळे सध्या त्रुटी असलेल्या स्कूल बसचा आकडा ७८ वरून १२५ पर्यंत जाऊ शकतो असा अंदाज आरटीओ विभागाने वर्तविला आहे. खान्देशात सुमारे शंभर स्कूल बसेस अनोंदणीकृत असण्याची शक्यता आहे. 
 
तपासणी बंधनकारक 
- शाळांनी स्कूल बसची वेळोवेळी तपासणी करणे बंधनकारक. 
- मोटार वाहन अधिनियमानुसार अनेक स्कूल बस अद्यापही आरटीओ कार्यालयाच्या रेकॉर्डवर नसल्याचे चित्र. 
- सुविधा व्यवस्था नसल्यामुळे संबंधित शाळांना दिल्या नोटिसा. 
- सुरक्षित विद्यार्थी वाहतुकीसाठी आरटीओ विभागाने घेतला पुढाकार. 
 
नऊ वर्षांपूर्वीचा कटू अनुभव 
नऊ वर्षांपूर्वी ३१ जुलै २००८ रोजी नेताजी डे स्कूलच्या बसचा शहराजवळ अपघात झाला होता. या घटनेला आता तब्बल नऊ वर्षे पूर्ण झाली आहेत. या अपघातात दुर्दैवाने दोन विद्यार्थी चालकाचा मृत्यू झाला होता. शिवाय ४५ विद्यार्थी जखमी झाले होते. गेल्या नऊ वर्षांत सुदैवाने विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या स्कूल बसचा अपघात झालेला नाही. 
 
याचाही विचार व्हावा 
प्रत्येक शाळेमध्ये पालक संघ असतो. पालक संघाच्या बैठकीत पालकांनी स्कूल बसविषयी माहिती घेतली पाहिजे. तसेच इंजीन फिटनेस सर्टिफिकेटची प्रत स्कूल बसमध्ये लावण्याचा आग्रह धरला पाहिजे. शिवाय मोटार वाहन नियमानुसार स्कूल बसमध्ये अग्निशमन बंब, डोअर बेल, संरक्षण जाळी, संकटकालीन स्थितीत बाहेर पडण्यासाठी दरवाजा इतर सुविधा आहे का याची पाहणी केली पाहिजे. त्यातील त्रुटी लक्षात घेऊन मुख्याध्यापक अथवा आरटीओ विभागाच्या निदर्शनास ती आणून देणे गरजेचे आहे. 
 
शाळांचीही जबाबदारी 
- स्कूल बसवर कारवाईसाठी आरटीओ विभागाने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना केली आहे. तपासणीकडे दुर्लक्ष करणाऱ्या शाळांनी पारदर्शीपणे स्कूल बस तपासणीसाठी पाठविल्या पाहिजे; परंतु काही शाळा याकडे दुर्लक्ष करत आहेत.
- व्ही.व्ही. लांडे, प्रादेशिक परिवहन अधिकारी, धुळे. 
 
जागरूक पालकांची अनास्था 
तपासणीकडे पाठ फिरविणाऱ्या ७६ स्कूल बसपैकी सर्वाधिक ४६ बस धुळे जिल्ह्यातील असून, त्या खालोखाल नंदुरबारमधील १२ जळगावमधील १८ स्कूल बस आहेत. या सर्व बस प्रतिष्ठित शिक्षण संस्थांच्या आहेत. आरटीओ विभागाने एका स्कूल बसवर दंडात्मक कारवाई केली आहे. संबंधित संस्थेकडून ३५ हजारांचा दंडही वसूल करण्यात आला आहे. प्रथितयश शाळांमध्ये पाल्यांच्या प्रवेशासाठी प्रयत्न करणारे पालक मात्र स्कूल बसबाबतचे नियम आणि त्याच्या परिस्थितीबाबत मात्र जागरूक दिसत नाही. ही अनास्था धोकेदायकही ठरू शकते. 
बातम्या आणखी आहेत...