आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन दिवसात सव्वा क्विंटल उटण्याची विक्री

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- दीपावलीत अभ्यंगस्नानाला अधिक महत्त्व असल्याने उटण्यासह सुवासिक तेलाला मोठी मागणी आहे. दोन दिवसात सव्वा क्विंटल उटण्याची विक्री झाली आहे. तर शुक्रवारी सायंकाळपर्यंत खरेदीसाठी गर्दी सुरूच होती.

शहरात सुटे उटणे विक्री करणार्‍यांची संख्या फार नाही. त्यामुळे आता कंपन्यांनीही पॅकिंगच्या स्वरूपात उटणे बाजारात आणले आहे. गाठीसारख्या असणार्‍या वनस्पतीचे बारीक चूर्ण करून उटणे बनवले जाते. सुट्या सुवासिक उटण्याला ग्राहकांकडून मोठा प्रतिसाद मिळतो. टॉवर चौक, सुभाष चौकात उटणे विक्रेत्यांनी दुकाने थाटली आहेत. दोन दिवसात तब्बल सव्वा क्विंटल उटण्याची विक्री झाली आहे. धनत्रयोदशीला उटण्याची मोठय़ा प्रमाणात मागणी होती. यंदा लक्ष्मीपूजन आणि नरक चतुर्दशी हे सण वेगवेगळ्या दिवशी आले आहेत. त्यामुळे शनिवारी नरक चतुर्दशीला सुवासिक तेल आणि उटणे लावून आंघोळ होईल तर रविवारीदेखील अभ्यंगस्नान करता येणार आहे.
उटणे महागले
परंपरागत व्यवसाय असलेल्या कुटुंबातील सदस्य उटणे तयार करून विकण्याचा व्यवसाय करीत आहेत. यंदा उटण्याच्या किमतीही महागल्या असून प्रती 50 ग्रॅमला 20 रुपये प्रमाणे उटणे विकले जात आहे. यंदा काही कंपन्यांनीही उटणे पॅकिंगच्या स्वरूपात बाजारात आणले आहे. तसेच काही होलसेल विक्रेत्यांकडून खरेदीवर उटणे पुड्या मोफत देण्यात येत आहेत.

उटणे कशाचे बनते ?
चंदन, नागरमोथा, हळद, कडुनिंबाची साल, वाळा, पिळखंड व विळखा या वनस्पतीपासून उटणे बनविले जाते. चंदन महाग असल्याने अनेक उटण्यांमध्ये चंदनाचा सुवास नसतो.


हातावरील व्यवसाय असल्याने दिवाळीतच उटणे खरेदी मोठय़ा प्रमाणात होते. गेल्या वर्षापेक्षा यंदा पाच रुपयांनी उटणे महागले आहे. तरी ग्राहकांची संख्या मात्र कमी झालेली नाही. तुकाराम पाटील, विक्रेते

त्वचेतील अशुद्धी निघते
उटणे हे दिवाळीपुरतेच नव्हेतर केव्हाही अंगाला लावल्यास त्वचेची दुर्गंधी नष्ट करते. आधी तेलाची मालिश करून उटणे लावल्यास त्वचेतील अशुद्धी बाहेर पडते. डॉ.आनंद दशपुत्रे, आयुर्वेदाचार्य

उटण्याचा सुगंध दरवळतो
उटण्यात तेल व दूध मिसळून गरम अथवा कोमट पाण्याने आंघोळ केल्यास उटण्याचा सुगंध दरवळत राहतो. त्यामुळे अभ्यंगस्नानानंतर प्रसंन्न वाटते. सुनीता चौधरी, गृहिणी

उटणे त्वचेसाठी हितकारी आहे. उटण्यात असलेल्या वनस्पतीचा वापर सौंदर्य प्रसाधनात होतो. त्वचा उजळून टाकणार्‍या या घटकांचा वापर आता यात होऊ लागला आहे. जया पाटील, ब्युटीशियन