आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साखरपुड्यासह लग्नात डीजे लावून नाचगाण्यावर बंदी, मुस्लिम समाजाचा निर्णय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - शहरातील मुस्लिम समाजात होणारे लग्न, साखरपुड्यात डीजे, नाचगाण्यावर बंदी घालून मोठ्या जेवणावळी बंद करण्याचा निर्णय समाजबांधवांनी घेतला. इकरा महाविद्यालयाच्या प्रांगणात समाज सुधारणेची बैठक झाली. यात समाजहिताचे विविध सात ठराव करण्यात आले. मालेगावचे धर्मगुरू मुफ्ती हसनैन अध्यक्षस्थानी होते. व्यासपीठावर मौलाना उस्मान उपस्थित होते.
या वेळी उपस्थित सर्व मशिदीच्या धर्मगुरूंनी इस्लाम धर्माच्या शिकवणीनुसार म्हणजे पवित्र कुराण प्रेषित हजरत महंमद यांच्या जीवनशैलीवरूनच मुस्लिम समाजातील लग्न, साखरपुडे होणार असल्याचे सांगितले. धर्मगुरू हसनैन यांनी सांगितले की, जळगावकरांनी अत्यंत महत्त्वाचे ठराव केले आहेत. त्याचे देशभर अनुकरण केले जाईल. जो कोणी त्याविराेधात कार्य करेल त्यांना त्यापासून परावृत्त करावे. तरीही एेकल्यास मौलानाने निकाह पढू नये, असाही निर्णय घेण्यात आला.

अमाप खर्चावर मर्यादा येणार
मुस्लिमसमाजातील विवाहातील अनिष्ट प्रथांना आळा बसावा, समाजामध्ये प्रगल्भता यावी म्हणून विवाह सोहळ्यातील अाचारसंहिता लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे विवाहातील अमाप खर्चावर मर्यादा येऊन नाचगाण्यातून वाढत जाणाऱ्या अश्लीलतेलाही आळा घालता येणार आहे.

अशी होणार अंमलबजावणी
जळगावशहरातील सुमारे ४० मशिदींच्या परिसरात त्या-त्या ‘इमाम’च्या अध्यक्षतेखाली मोहल्ला समिती स्थापन करण्यात येणार आहे. या समितीद्वारे सर्व समाजाला माहिती देण्यात येणार आहे. ज्यांच्याकडे लग्न, साखरपुडा होणार आहे, त्यांच्याकडे आधीच जाऊन समजावून सांगण्यात येईल. त्यांना ठरावांची अंमलबजावणी करण्याचे आवाहन केले जाणार आहे. कोणत्याही प्रकारचा दबाव आणला जाणार नाही. त्यात त्यांनी ऐकले नाही तर ठरावानुसार कार्यवाही करण्यात येईल.

महत्त्वाचे ठराव
ज्यांच्याघरात लग्न असेल, त्यांनी लग्नापूर्वी डीजेचा उपयोग करून गाणे, नाच केला तर त्यांच्या लग्नाचे ‘निकाह’ मौलाना वाचणार नाही.
लग्नात दिसून येणारी अश्लीलता बंद करावी
‘हळद’च्या नावाखाली वर-वधूंकडे होणारी कुप्रथा त्वरित बंद करावी
लग्नात वधूकडील मंडळींनी अत्यंत कमी प्रमाणात जेवणावळ द्यावी
लग्न झाल्यावर वराने ‘वलिमा’(जेवण) देताना कमी प्रमाणात द्यावे
आवश्यकतेनुसार चित्रीकरण, फोटो फक्त काढावेत.