आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘डीजे’चा दणदणाट आजपासून होणार बंद!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - ध्वनिप्रदूषणाचा आरोप होणार्‍या ‘डीजे’चे सूर आता धुळयात ऐकू येणार नाही. धुळे पोलिस प्रशासनाने रविवारी सकाळी झालेल्या बैठकीत डीजेला परवानगी नाकारली आहे. शहर वाहतूक नियंत्रण शाखेजवळ असलेल्या सभागृहात ही बैठक झाली.

याप्रसंगी पोलिस अधीक्षक अखिलेशकुमार सिंग, उपअधीक्षक चंद्रकांत गवळी, शिरपूर उपविभागाचे अधिकारी प्रकाश सैंदाणे यांच्यासह धुळे एलसीबीचे निरीक्षक देविदास पाटील, एम. बी. पाटील, देविदास शेळके, श्रावण सोनवणे, गवळी, रमेशसिंग परदेशी, जिल्हा वाचक शाखेचे निरीक्षक डी. आर. भोज, शिरपूर पोलिस ठाण्याचे प्रमुख मंगलसिंग सूर्यवंशी, मोहाडी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, पिंपळनेर पोलिस ठाण्याचे डी. एस. ढुमणे आदी अधिकारी उपस्थित होते. या वेळी अधीक्षक सिंग यांनी हा निर्णय जाहीर केला. 45 डेसिबलपर्यंत डीजेला मर्यादा ठरवून दिली असताना बर्‍याचदा कायद्याचा भंग होतो. ही बाब बैठकीत नजरेत आणून देण्यात आली. सुरुवातीला या निर्णयाला डीजेचालकांनी आक्षेप घेतला. पोलिसांनी आपली भूमिका मांडून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाबाबत डीजेचालकांना अवगत करून दिले. निर्धारित वेळेनंतरही बर्‍याचदा काही डीजे बंद होत नसल्यामुळे वाद होतात. अधिक वेळ डीजे सुरू राहिल्यास सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशाकडे दुर्लक्ष केल्यासारखे होते. हे योग्य नसल्याचे मत या वेळी पोलिस प्रशासनाने व्यक्त केले. दरम्यान, या निर्णयानंतर गरुड मैदानावरील कार्यक्रमासाठी परवानगीबाबत उशिरापर्यंत हालचाली सुरू होत्या.
55 दहीहंड्या, 835 जणांचा बंदोबस्त
शहरासह जिल्ह्यात 55 ठिकाणी सार्वजनिक दहीहंडीचा कार्यक्रम होणार आहे. यामध्ये तीन मोठ्या तर 52 लहान मंडळांनी पोलिसांकडे नोंदणी केली आहे. त्यासाठी पोलिस अधीक्षक सिंग, उपअधीक्षक गवळी, ग्रामीण पोलिस दलाचे उपअधीक्षक प्रकाश सैंदाणे यांच्या मार्गदर्शनाखाली 12 पोलिस निरीक्षक, सहा सहायक पोलिस निरीक्षक, 19 उपनिरीक्षक, 255 पोलिस कर्मचारी, 90 जवानांचा समावेश असलेली एक एसआरपीएफची कंपनी, 400 पुरुष आणि 50 महिला होमगार्ड बंदोबस्तावर राहणार आहेत. 385 पोलिसांसह तब्बल 835 जण बंदोबस्तावर राहतील.
एरवी सण-उत्सव, धार्मिक व कौटुंबिक कार्यक्रमात अविभाज्य बनलेल्या ‘डीजे’ला धुळे पोलिसांनी रविवारी परवानगी नाकारली. ऐन दहीहंडीच्या एक दिवस आधी परवानगी नाकारल्यामुळे अनेकांचा कल आता पारंपरिक वाद्यांकडे वळला आहे. तर दुसरीकडे पोलिस प्रशासनाच्या या निर्णयामुळे डीजेचालकांमध्ये नाराजी पसरली आहे.

पारंपरिक वाद्याला सुगीचे दिवस
डीजेला परवानगी नाकारल्यामुळे गोकुळाष्टमी साजरी करू पाहणार्‍या काही मंडळांची मात्र दमछाक झाली. एकीकडे कायद्याचे पालन तर दुसरीकडे पारंपरिक वाद्य शोधण्यासाठी मंडळांची तारांबळ उडाली. पारंपरिक वाद्यांना अचानक अच्छे दिन आल्यामुळे वाद्यवृंद मिळणे कठीण झाले होते. रविवारी सायंकाळी निघालेल्या मिरवणुकीतही तरुणाई पारंपरिक वाद्यांवर थिरकताना दिसून आली.

बॅन्जोला परवानगी
डीजेवर बंधने असली तरी बॅन्जोला मात्र काही अटींवर परवानगी देण्यात आली आहे. बॅन्जोसाठी छोटा स्पीकर लावावा ही त्यातील प्रमुख अट असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यामुळे निर्धारित नियमांचे पालन करून डीजे ऐवजी बॅन्जोच्या सुरांवर थिरकण्याचा आनंद उपभोगता येऊ शकतो.
४सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार डीजेवर बंदी करण्यात आली आहे. कायद्यानुसार हे पाऊल उचलले आहे. शहरातील नागरिकांनीदेखील कायद्याचे पालन करावे. त्यामुळे वादही टाळता येतील.
अखिलेशकुमार सिंग, पोलिस अधीक्षक,धुळे