आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गाळ्यांबाबत काही चिंता करू नका! भाजपच्या नगरसेवकांना गप्प राहण्याचा सल्ला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव; गाळ्यांबाबत काहीही चिंता करू नका, महासभेचा अजेंडा आल्यानंतर आपण आपली भूमिका ठरवू. आपण विरोधी आहोत. त्यामुळे शांत रहा, कुठेही काहीही बोलू नका. सर्व संभ्रम मी लवकरच दूर करेल, असा विश्वास व्यक्त करत महसूलमंत्री एकनाथ खडसेंनी भाजप नगरसेवकांना ‘नो कॉमेंट्स’चा सल्ला दिला.

राज्य शासनाने गाळ्यांबाबत निर्णय दिल्यानंतर भाजपच्या नगरसेवकांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली होती. पुन्हा निवडणुका लढायच्या आहेत. नागरिकांचा रोष कसा सहन करायचा? असा प्रश्न नगरसेवकांसमोर होता. निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यासाठी खडसेंनी नगरसेवकांची शुक्रवारी सकाळी बैठक घेतली. या वेळी २५ मिनिटांच्या बैठकीत खडसेंनी मनमोकळ्या गप्पा मारत चिंता करण्याचा सल्ला दिला. मार्केटची जागा महसूल विभागाची आहे.
वेळ आल्यावर मी तुमच्याशी बोलेलच. महासभेचा अजेंडा अजून आलेला नाही. विषयपत्रिका आल्यानंतर मी सांगेल ती भूमिका घ्या. गाळ्यांबाबत टेन्शन घेऊ नका, असा त्यांनी सल्ला दिला. आमदार सुरेश भोळे यांचीही या वेळी उपस्थिती होती. आमदार नगरसेवकांनी एकमेकांशी ताळमेळ ठेवून वागावे. एकत्र बसून चर्चा करून निर्णय घ्या, असा सल्लाही या वेळी देण्यात आला. महसूलमंत्री खडसेंनी बैठक घेतल्याने सगळेच नगरसेवक हजर होते.

५० लाख निधी देणार
२५कोटींच्या निधीबाबतही चर्चा करण्यात आली. अनेकांच्या तक्रारी लक्षात घेता अाणखी निधी आणणार असल्याचे सूतोवाच खडसेंनी केले. या वेळी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशीही खडसेंनी फोनवरून संपर्क करून चर्चा केली. २५ कोटींव्यतिरिक्त लवकरच प्रत्येक भाजप नगरसेवकाच्या वॉर्डात ५० लाखांचा निधी देणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे नगरसेवकांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळाले.