जळगाव - ‘महाराष्ट्राचा मुख्यमंत्री दिल्लीसमोर शेपूट हलवणारा हवा की ताठ मानेने वागणारा स्वाभिमानी हवा?’ अशी विचारणा मतदारांना करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी जळगावातील सभेत भाजप व काँग्रेसवर सडकून टीका केली. ‘मलाही युती टिकवता आली असती, परंतु मी मित्र राहू शकतो गुलाम म्हणून नाही,’ असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला.
प्रचाराच्या शेवटच्या दिवशी उद्धव ठाकरेंनी मुक्ताईनगर व जळगावात सभा घेतल्या. ‘आज विजयापूर्वीची ही शेवटची सभा आहे. जिंकल्यावर सरकार आल्यानंतर दुसरी सभा करेल.’ असे त्यांनी सांगितले. ‘मी साधा सरपंचही नाही, काही मागाल तर देऊ शकत नाही. परंतु काहीही नसताना या सभांसाठी माणसे भाड्याने आणावे लागत नाहीत,’ असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला.