आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॉस्पिटलसमाेरून डाॅक्टरच्या चारचाकीची ‘हायटेक’ चोरी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - रिंगरोड परिसरातील हाॅस्पिटल तथा घरासमोर उभी असलेली इनोव्हा ही चारचाकी गुरुवारी मध्यरात्री चोरट्यांनी चोरून नेली. सॉफ्टवेअरच्या मदतीने ‘सर्किट ब्रेक’ करून चोरट्यांनी गाडी सुरू करून ती लांबविल्याचा संशय व्यक्त करण्यात अाला आहे. त्यामुळे चोरटे हॅकर असल्याचा अंदाज गाडीमालकाने व्यक्त केला.
डॉ. किशोर पाटील यांचे रिंग रोडवर कामिनी-कमल नावाचे हॉस्पिटल आहे; तर चाैथ्या मजल्यावर डॉ. पाटील कुटुंबासह राहतात. गुरुवारी सायंकाळी वाजेपासून त्यांची इनाेव्हा (एमएच- १९, बीयू- ९९११) ही चारचाकी हॉस्पिटच्यासमोर उभी होती. रात्री अडीच वाजेच्या सुमारास डॉ. पाटील यांच्या पत्नी शीतल यांना हॉस्पिटलबाहेर रस्त्यावर ते जण गप्पा करत असल्याचा आवाज आला. त्यानंतर चारचाकी वाहन सुरू करून पुढे जाण्याचाही आवाज शीतल यांनी एेकला. मात्र, रिंग रोड परिसरात बरीच हॉस्पिटल आहेत, त्यामुळे या परिसरात रात्रभर वाहनांची वर्दळ सुरू असते, असे गृहित धरून त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. सकाळी वाजता डॉ. पाटील घरातून खाली अाल्यानंतर त्यांना चारचाकी जागेवर नसल्याचे दिसून आले. त्यांनी शोध घेतल्यानंतर गाडीची चोरी झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार डॉ. पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक जी.व्ही.निकम तपास करत आहेत.

रॅम्पवर ओरखडे : डॉ.पाटील यांनी गाडी उभी करण्यासाठी रॅम्प तयार केला आहे. जेथे गाडी उभी होती, त्या ठिकाणी जमिनीवर अाेरखडल्यासारखे व्रण उमटलेले होते. गाडीला जॅक लावल्यानंतर खालच्या बाजूने आत शिरून लॅपटॉपच्या मदतीने अन् विशिष्ट सॉफ्टवेअर वापरून सर्किट ब्रेक करून ही गाडी सुरू करण्यात आली. त्यानंतर ती चोरून नेली असावी, असा संशय डॉ. पाटील यांनी व्यक्त केला आहे. ही महागडी अत्याधुनिक चारचाकी सुरू करण्यासाठी केवळ त्याच गाडीच्या किल्लीचा उपयोग होतो; त्याशिवाय इतर कोणत्याही किल्लीने चारचाकी सुरू होणे अशक्य आहे. या बाबतची माहिती डॉ. पाटील यांनाही आहे. त्यामुळे डॉ. पाटील यांनी शुक्रवारी दिवसभर चोरीच्या पद्धतीचा शोध घेतला. यात त्यांनी चारचाकीच्या शोरूममधील काही अभियंत्यांशी सविस्तर चर्चा केली. चोरट्यांनी जॅकने गाडी उचलून खालच्या बाजूला असलेल्या सर्किटमध्ये लॅपटॉपच्या मदतीने छेडछाड केली असावी. त्यावरून चोरटे ‘हॅकर’ असल्याचा अंदाज सर्वप्रथम अभियंत्यांनीच व्यक्त केला. महागड्या चारचाकी चोरण्यासाठी मोठ्या शहरांमध्ये अशी पद्धत वापरल्याच्या घटना या पूर्वी उघडकीस आल्या आहेत. ते लोण आता जळगावात आल्याचे या घटनेतून दिसून येते.

सीसीटीव्ही नुकताच नादुरुस्त
डॉ.पाटील यांच्या रुग्णालय परिसरातही सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले आहेत. त्यातील एक कॅमेरा पंधरा दिवसांपूर्वी नादुरुस्त झाला आहे. नेमका हाच कॅमेरा चारचाकी उभी राहण्याच्या जागेवर लावलेला होता. राजस हॉस्पिटलच्या बाहेर असलेल्या कॅमेऱ्यातून डॉ. पाटील यांची चारचाकी बहिणाबाई उद्यानाकडे जात असल्याचे दिसून येत आहे.

चोरटे आले फाेर्ड फिगाेने
चोरटे फोर्ट फिगो या चारचाकीतून अाले असल्याचा संशयही डॉ. पाटील यांनी व्यक्त केला आहे. रिंग रोडवरील राजस हॉस्पिटलबाहेर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात गुरुवारी मध्यरात्री वाजून मिनिटांनी डॉ. पाटील यांच्या हॉस्पिटलसमोरून त्यांची चारचाकी निघाली आहे. तर वाजून मिनिटांनी राजस हॉस्पिटलसमोरून फिगो आणि डॉ. पाटील यांची चारचाकी एकामागे एक जात असल्याचे दिसून आले आहे. फिगो कारची नंबरप्लेट कोरी आहे. चोरट्यांनी हायटेक पद्धत वापरली आहे. त्यामुळे ही फिगो कारदेखील चोरट्यांची असल्याच्या संशयाला पुष्टी मिळते, असे डॉ. पाटील यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले.
बातम्या आणखी आहेत...