आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आणखी किती बळी घेणार डॉक्टरांचा संप?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटना गट अ चे सदस्य विविध मागण्यांसाठी 1 जुलैपासून बेमुदत संपावर आहेत. संपाच्या पाचव्या दिवशी शनिवारीही तीच परिस्थिती होती. डॉक्टर संघटनाही माघार घ्यायला तयार नाही आणि सरकारही मागण्या मान्य करायला तयार नाही. शनिवारी गेंदालाल मिल परिसरातील एका रुग्णाला वेळेत उपचार न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या नातेवाइकांनी केला तर अनेक रुग्णांना उपचारासाठी ताटकळत थांबावे लागते.

उपचाराअभावी तरुणाचा मृत्यू
शनिवारी गेंदालाल मिल परिसरातील नरेंद्र माधव सोनवणे (वय 35) हे सकाळी घराच्या गॅलरीत उभे असताना चक्कर येऊन खाली पडले. त्यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना सिव्हिलमध्ये दाखल केले. मात्र, डॉक्टरांचा संप असल्याने सुरुवातीला दाखल करून घेण्यासही टाळाटाळ केली. उपचारास उशीर केला. शेवटी दुपारी 12 वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.आतापर्यंत आठ जणांचा बळी गेला..

सिव्हिलमध्ये डॉक्टर नसल्याने सुरुवातीला कर्मचारी रुग्णाला दाखल करून घेण्यास टाळाटाळ करतात. दाखल केले तर उपचारासाठी ताटकळत थांबावे लागते. सिव्हिलमध्ये प्रसूती तज्ज्ञ नसल्याने केवळ सामान्य प्रसूती होत आहे. मात्र, सिजेरियनसाठी नाईलाजाने काहींना औरंगाबादला पाठविण्याची वेळ येत आहे. आतापर्यंत मंगळवारी 4, बुधवारी 5 आणि गुरुवारी 4 अशा 13 महिलांना औरंगाबाद येथे प्रसूतीसाठी पाठवले आहे तर दोन विष प्राशन केलेल्या रुग्णांनाही औरंगाबादला पाठविण्याची वेळ आली आहे.

‘मेस्मा’ अंतर्गत कारवाईचे प्रधान सचिवांनी दिले आदेश
सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिका-यांनी त्यांच्या मागण्यांबाबत शासनाने सकारात्मक कार्यवाही करूनही संप पुकारला आहे. त्यामुळे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्रधान सचिव सुजाता सौनिक यांनी या संपकरी डॉक्टरांवर महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परिरक्षण अधिनियम 2011(मेस्मा) अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक, जिल्हा शल्यचिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांना देण्यात आले.

...अन् आंदोलक डॉक्टर पळाले
राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिका-यांच्या संपामुळे जिल्हा रुग्णालयात गेल्या पाच दिवसात 8 जणांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी नरेंद्र माधव सोनवणे (वय 35, रा. गेंदालाल मिल) हा तरुण घराच्या गॅलरीतून पडल्याने गंभीर जखमी झाला होता. त्याला जिल्हा रुग्णालयात भरती केल्यानंतर डॉक्टर नसल्याने त्याच्यावर वेळेत उपचार होऊ शकले नाही. त्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला. धरणे आंदोलन करणा-या डॉक्टरांवर मृताचे संतप्त नातेवाईक धावून गेले. त्यामुळे डॉक्टरांनी शनिवारी धरणे गुंडाळले.

उपचाराअभावी मृत्यू
- सिव्हिलमध्ये सुरुवातीला माझ्या भावाला दाखल करून घेत नव्हते. काही वेळानंतर दाखल करून घेतले. त्याच्यावर वेळेत उपचार न केल्यानेच त्याचा मृत्यू झाला. संतोष सोनवणे, मृत नरेंद्रचा भाऊ.

रुग्णांच्या अवहेलनेसाठी शासन जबाबदार
- शासनाकडे गेल्या चार वर्षांपासून आमच्या मागण्या मान्य होत नाही. राज्य शासन शांततेच्या मार्गाने मागण्या मान्य करीत नसल्याने नाइलाजाने संप करावा लागला आहे. याला सर्वस्वी शासनच जबाबदार आहे. डॉ. संजय चव्हाण, विभागीय सचिव, मॅग्मो.

रुग्ण मरत असताना डॉ. एस.एन.लाळीकर यांना निरोप - डॉक्टरांच्या संपामुळे गेल्या 5 दिवसांपासून रुग्णांचे अतोनात हाल होत आहेत. जिल्ह्यात संपकाळात एकीकडे 8 रुग्णांचा मृत्यू झाला, तर दुसरीकडे वादग्रस्त माजी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एस.एन.लाळीकर यांना निरोप देण्याचा कार्यक्रम सुरू होता. या समारंभाला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.आर.के. शेळके आणि निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. किरण पाटील, डॉ. गिरीश पाटील हे हजर नव्हते. एकीकडे रुग्ण मरणयाताना भोगत होते तर दुसरीकडे डॉ. लाळीकरांसोबत कर्मचारी चिवड्यावर ताव मारीत होते.

हजर न झाल्यास कारवाई
- संपात सहभागी डॉक्टर 24 तासांच्या आत कामावर हजर झाले नाही तर त्यांच्यावर कारवाईच्या नोटिसा आम्ही दिलेल्या आहेत. वरिष्ठ कार्यालयाला त्याचा अहवालही सादर केला आहे. या डॉक्टरांवर सेवासमाप्तीची कारवाई करण्यात येईल. - डॉ.आर.के.शेळके, शल्यचिकित्सक

जिल्ह्यात केवळ 10 डॉक्टर कामावर
जिल्ह्यात स्थायी आणि अस्थायी असे एकूण 102 डॉक्टर आहेत. मात्र 92 डॉक्टर संपावर गेल्याने केवळ 10 डॉक्टर सध्या कामावर आहेत.

...तर डॉक्टरांवर उद्या गाडी घालेन
- डॉक्टरांच्या संपामुळे माझ्या मित्राचा मृत्यू झाला आहे. त्यांनी रविवारी जर संप सुरू ठेवला तर त्यांच्या मंडपात गाडी घालेन. या होणा-या प्रकाराला डॉक्टरच जबाबदार असतील. विनोद जाधव, मृत नरेंद्रचा मित्र.