आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉक्टरांच्या चौकशी अहवालात दिरंगाई!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धरणगाव - धरणगाव ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी विना परवानगीने परस्पर निघून गेल्याचे वृत्त ‘दिव्य मराठी’ने प्रसिद्ध केले होते. त्यानंतर चौकशी अधिकार्‍याची निवड करण्यात आली. या संदर्भात चौकशी अधिकार्‍याने चौकशी करुन तो अहवाल वरिष्ठांकडे सादर केला. मात्र, त्यानंतर संबंधितांवर कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे या प्रकरणात अहवाल दडपला जातो कि काय? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

येथील ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण जाधव हे विनापरवानगी निघून गेल्याचे वृत्त ‘दिव्य मराठी’ने प्रकाशित केले होते. यासंदर्भात हरिहर पाटील यांनी आरोग्य उपसंचालक नाशिक यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार आरोग्य उपसंचालकांनी जिल्हा शल्यचिकित्सकांना जबाबदार अधिकारी पाठवून चौकशी करण्याचे सांगितले होते. तसेच केलेल्या चौकशीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. वसंत कारंडे यांची नेमणूक करण्यात आली होती. ते चौकशीसाठी गेले, त्यानंतर त्यांनी धरणगाव ग्रामीण रुग्णालयात 27 जून रोजी जाऊन चौकशीही केली होती. त्यात त्यांना येथील दोन्ही डॉक्टरांच्या कामकाजात अनेक अनियमितता व त्रुटी आढळून आल्या होत्या. तसा अहवाल त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांना दिला होता. त्यानंतर वसंत कारंडे यांनी धरणगाव ग्रामीण रुग्णालयात येऊन डॉक्टरांचे म्हणणे सादर करण्याची संधी दिली होती. परंतु अद्याप हा चौकशी अहवाल नाशिक येथे पाठविण्यात आलेला नाही.

अहवाल वरिष्ठांकडे
आठ/नऊ दिवसांपूर्वी माझा अहवाल तयार करण्यात आला. त्यानंतर तो अहवाल मी वरिष्ठांकडे सादर केलेला आहे. त्यावर ते काय शेरा देतात व त्यांच्या वरिष्ठांना पाठविणार का? हा त्यांच्या कक्षेतला प्रश्न आहे. डॉ. वसंत कारंडे, चौकशी अधिकारी

अहवाल दडपण्याचा प्रयत्न
डॉ. प्रवीण जाधव गैरहजर आढळले. त्याचप्रमाणे त्यावेळी आढळलेल्या त्रुटी व अनियमितता याचा अहवाल नाशिक येथील आरोग्य उपसंचालक यांच्याकडे पाठवायचा होता. पण चौकशी अधिकार्‍याने अहवाल सादर करण्यात कुणाच्या सांगण्यावरून दिरंगाई केली? याची चौकशी करण्याची गरज आहे. तसेच अहवाल मिळून पाच दिवस उलटूनही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. शिवराज गायकवाड यांनी हा अहवाल तसाच का पडू दिला? असा प्रश्‍नन निर्माण होतो. ते हा अहवाल दडपण्याचा प्रयत्न करताहेत, असा प्रश्‍ननही उपस्थित होतो. डॉ. जाधव यांना पाठीशी घालण्याचा हा प्रयत्न आहे का? असाही प्रश्‍न आहे. अहवालाबाबत बोलण्यास ते नकार देतात, यावरून त्यांचा हा अहवाल दडपण्याचा प्रयत्न आहे, असे दिसते. तरी हा अहवाल त्वरित सादर होऊन कारवाईची गरज आहे.

अहवालात दिरंगाई
डॉ. प्रवीण जाधव विनापरवानगी गैरहजर आहेत किंवा नाहीत? हे पाहणे एवढाच उद्देश या चौकशीचा होता. परंतु डॉक्टरांच्या अनेक अनियमितता व त्रुटी या चौकशीदरम्यान आढळून आल्या. त्यामुळे हा अहवाल त्वरित सादर होण्याची गरज होती, असे असताना डॉ. वसंत कारंडे यांनी 17 जुलै रोजी अहवाल जिल्हा शल्यचिकित्सकांना सादर करण्यात आला. हा अहवाल सादर करण्यात एवढी दिरंगाई का करण्यात आली की, यामागे दुसरे काही कारण आहे? असा प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.


माहिती देण्यास असर्मथता
याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक शिवराज गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी फोनवर बोलण्यास नकार दिला. प्रत्यक्ष येऊन भेट, असे प्रतिनिधीस सांगितले.