आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावात डॉक्टरचा चाकूने गळा चिरून खून; कारण अस्पष्ट; पोलिसांना धागेदाेरे सापडेनात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खुनाच्‍या तपासासाठी श्‍वानाकडून माग काढताना पोलिस कर्मचारी. इन्‍सेटमध्‍ये डॉ. अरविंद मोरे. - Divya Marathi
खुनाच्‍या तपासासाठी श्‍वानाकडून माग काढताना पोलिस कर्मचारी. इन्‍सेटमध्‍ये डॉ. अरविंद मोरे.
जळगाव- जिल्हा सामान्य रुग्णालयात कुष्ठरोग विभागाच्या सहायक संचालकपदी असलेल्या डॉ.अरविंद मोरे यांच्या हत्येची वार्ता सोमवारी सकाळी वाऱ्याच्या वेगाने शहरात पसरली. चार महिन्यांपूर्वी शहरात आलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या रहस्यमय हत्येमुळे खळबळ उडाली. विशेष म्हणजे डाॅ.माेरे रविवारी दिवसभरात किंवा रात्री कुणासही भेटले नव्हते. त्यामुळे त्यांची हत्या का किंवा कुणी केली असावी? याबद्दल तर्कवितर्क सुरू आहेत. सोमवारी सकाळी डॉ.मोरेंच्या खोलीतून त्यांचा मृतदेह उचलताच त्याखाली रक्ताने माखलेला चाकू आढळला. त्यामुळे या हत्येबद्दल आणखीनच गूढ निर्माण झाले आहे.
 
रामानंदनगर परिसरातील पार्वतीनगर येथील सेवानिवृत्त कर्मचारी जगन्नाथ नथ्थू पाटील यांच्या घरात वरच्या मजल्यावरील दोन खोल्यांमध्ये ते रहायला होते. दर शनिवार रविवारी ते नाशिक येथे जात असत; परंतु या शनिवारी (९ सप्टेंबर) ते रेल्वेने घरी जाण्यासाठी निघाले होते. पण अचानक त्यांचा विचार बदलल्यामुळे ते धावत्या रेल्वे गाडीतूनच पुन्हा खाली उतरून जिल्हा सामान्य रुग्णालयात गेले होते. सहकारी डॉक्टर चंद्रशेखर पाटील यांना फोन करून त्यांनी नाशिक येथे जात नसल्याचे कळवले होते. त्यानंतर ते रात्री पार्वतीनगर येथील घरी परतले. रविवारी सकाळी 9 वाजता घरमालक पाटील यांना भेटले. त्यानंतर सकाळी ११ वाजता गॅलरीत उभे होते. रामानंदनगर स्टॉपवर जाऊन त्यांनी एका हॉटेलात चहा घेतला. काही वेळातच डॉ.मोरे हे पुन्हा आपल्या खोलीत गेले. त्यानंतर रविवारी दुपारी ११.१५ वाजेनंतर त्यांच्या मोबाईलवर आलेले सर्व कॉल मिस झालेले आहेत. म्हणजेच डॉ.मोरे यांच्यासोबत दुपारीच घटना घडली आहे. त्यांच्या खिशातून २८ हजार रूपये रोख एक एटीएम कार्ड मिळून आले आहे. मारेकऱ्याने पैशांसाठी हा खून केलेला नसल्याचे यातून स्पष्ट होते आहे. तसेच घरात मद्यापान झाल्याचेही काही पुरावे पोलिसांना मिळालेले नही. 

जळगावात नव्यानेच रहायला आल्यामुळे त्यांचा कोणाशी जास्त परिचय देखील नव्हता. सहकारी डॉक्टरांशी देखील त्यांचे कामापुरतेच संबंध येत होते. रविवारी रात्री त्यांच्या घराचा दरवाजा उघडाच होता. तसेच दोन्ही खोल्यांमधील लाइट, पंखे सुरू होते. घरमालक तसेच शेजारच्यांनी लाइट सुरू असल्याची बाब कबुल केली. मात्र, सध्या प्रचंड उकाडा असल्यामुळे डॉक्टरांनी लाइट दरवाजा सुरूच ठेवला असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. सोमवारी सकाळी डाॅ.मोरे यांचा खून झाल्याचे उघडकीस झाल्यानंतर पोलिस अधीक्षक दत्तात्रय कराळे, अप्पर पोलिस अधीक्षक बच्चन सिंह, पोलिस उपअधीक्षक नीलोत्पल, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक राजेशसिंह चंदेल यांच्यासह फॉरेन्सिक पथक श्वान पथक काही मिनिटांतच घटनास्थळी दाखल झाले. डॉ.मोरे यांचा मृतदेह मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावरच पडलेला होता. डोके दरवाजाबाहेर तर पाय घरात होते. त्यांचा गळा निर्घृणपणे चिरलेला होता. दोन्ही खोल्यांमध्ये रक्ताचा सडा पडलेला होता. त्यात पायांचे ठसे देखील उमटलेले होते. किचन रुमच्या माळ्यावरील एक खुर्ची खाली पडलेली होती. डाॅ.मोरे यांचे दोघे मोबाइल एका टेबलावर होते. दरवाजावर रक्ताने माखलेले हाताचे ठसे उमटलेले होते. संपूर्ण पंचनामा झाल्यानंतर पोलिसांनी त्यांचा मृतदेह उचलताच डॉ.मोरेंच्या मृतदेहाखाली चाकू आढळला. याच चाकूने त्यांचा गळा चिरला आहे. त्या चाकूचा पंचनामा करून पोलिसांनी जप्त केला आहे. 

कुटंुबियांनी घटनास्थळ पाहिले : दरम्यान,डॉ.मोरे यांचा मृतदेह घेण्यासाठी त्यांचे पाच-सहा नातेवाईक सायंकाळी वाजता जळगावात आले होते.रात्री ८.३० वाजता शव विच्छेदन करण्यात आले. त्यानंतर नातेवाईकांनी घटनास्थळ पाहण्याची विनंती केली. पोलिस त्यांना घटनास्थळी घेऊन गेले होते. 
 
घटनेनंतर लागलीच जळगावच्या फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळावर तपासणी केली होती. त्यानंतर दुपारी वाजता धुळे येथील फॉरेन्सिकची टीमही जळगावात दाखल झाली होती. मारेकऱ्यांनी अत्यंत शांत डोक्याने हा खून केला आहे. त्यांनी घटनास्थळावर कोणताही पुरावा ठेवलेला नसल्यामुळे या खुनाचा छडा लावणे पोलिसांपुढे मोठे आव्हान ठाकले आहे. दोन्ही जिल्ह्याच्या फॉरेन्सिक पथकांनी घटनास्थळावरून पाणी, रक्त आदींचे नमुने घेतले आहेत. मंगळवारी पुन्हा धुळ्याचे पथक येऊन तपासणी करणार आहे. 
 
घटनास्थळावरून नमुने घेतले 
डाॅ. अरविंदमाेरेयांच्या खूनाच्या स्थळावरून न्याय वैद्यक प्रयाेग शाळेच्या व्हॅनला पाचारण केले हाेते. रक्ताचे नमुने घेतले अाहे. ते तपासणीसाठी नाशिक येथे पाठवण्यासाठी जळगाव पाेलिसांच्या ताब्यात दिले अाहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार फाॅरेन्सिक लॅबचे व्हॅन जळगावात पाठवण्यात अाली हाेती. 
- अशाेक पंडीत, कनिष्ठ वैज्ञानिक सहायक 
 
दोन स्वतंत्र पथके धुळे, नाशिकला तपासासाठी रवाना 
खूनाचा गुन्हा दाखल केल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे दोन स्वतंत्र पथक धुळे नाशिक येथे तपासासाठी पाठवण्यात आले आहेत. दोन वेगवेगळ्या शक्यतांवर पोलिस काम करीत आहेत. डॉ.मोरे यांचे संपर्क धुळे नाशिक जिल्ह्यात जास्त असल्यामुळे पथक रवाना केले आहेत. 
- दत्तात्रय कराळे, पोलिस अधिक्षक 
 
रविवारी सायंकाळी किंवा मध्यरात्री हत्या 
सोमवारी सकाळी जिल्हा रुग्णालयातून हत्येची सूचना मिळताच पोलिस तत्काळ घटनास्थळाकडे धावले. घराच्या दारातच मोरे यांचा मृतदेह पडला होता. त्यांच्या अंगावर, गळ्यावर तसेच घरात सांडलेले रक्त कोरडे झाले होते. म्हणजेच रविवारी सायंकाळी किंवा मध्यरात्रीच त्यांचा खून झाला असावा, असा संशय पाेलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी डॉ.मोरे यांचा मोबाइल, घरातील काही संशयित वस्तू जप्त केल्या आहेत; परंतु, ही घटना घडत असताना कोणीच पाहिलेली नाही किंवा खालच्या मजल्यावर राहणाऱ्या घरमालक, शेजारच्यांना आवाजदेखील आलेला नाही, अशी माहिती घरमालक पाटील यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली. डॉ.मोरे यांच्या खोलीत जाण्यासाठी मागच्या बाजूने अरुंद जीना आहे. चार फूट उंचीची कपाउंड वॉल आहे. ही वॉल ओलांडून मारेकरी घरात शिरले असावेत आणि त्याच मार्गाने पळून गेले असावेत, अशी शक्यता वर्तवली जात आहे. 
 
डॉ.मोरे यांच्या गळ्यावर कंठापासून ते मानेच्या मागच्या बाजूपर्यंत दीड इंच खोलवर वार करण्यात आला आहे. त्यांच्या गळ्यातील स्वरयंत्र पूर्णपणे बाहेर लोंबकळले होते. डॉ.मोरे उभे असताना त्यांचा गळा चिरण्यात आला आहे. तर मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होईपर्यंत त्यांना जमिनीवर कोसळू दिलेले नाही. म्हणूनच वार केल्यानंतर त्यांच्या गळ्यातून वाहणारे रक्त संपूर्ण शरीरावरून खाली आले आहे. त्याचे तळपायापर्यंत रक्त वाहिल्याचे डाग दिसून आलेले आहे, अशी माहिती शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांनी दिली. 
 
अभियानाच्या कामात होते डॉ.मोरे 
राज्य शासनाने ते २० सप्टेंबर दरम्यान कुष्ठरोग शोध अभियान राबवण्यात येत आहे. डॉ.मोरे हे जिल्ह्याचे प्रमुख म्हणून अभियानाचे काम करीत होते. तसेच या कामासाठी पुणे येथील एक पथक सोमवारी सकाळीच जळगावात दाखल झाले होते. डॉ.मोरे यांची पथकासोबत बैठक होणार होती. तत्पूर्वीच ही घटना समोर आली. 
 
बातम्या आणखी आहेत...