आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेत्रदानामुळेच पाटील कुटुंबीयांनी पाहिली सुंदर सृष्टी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- आपली जीवनयात्रा संपल्यानंतर आपली दृष्टी दुसर्‍यांना डोळस बनवते. मरणानंतरही आपण जग पाहू शकतो. ही किमया नेत्रदानामुळे सहज शक्य झाली आहे. जिल्ह्यातील एका पिढीतील चार सदस्यांना आनुवंशिक दृष्टीदोषाच्या अडचणी निर्माण झाल्या. मात्र, नेत्रदान केल्यामुळे आणि नेत्रपेढीच्या पुढाकाराने पाटील कुटुंबीयांच्या सदस्यांना सुंदर जग पाहण्याची संधी उपलब्ध करून दिली. त्या परिवाराच्या आयुष्यात चैतन्य निर्माण केले आहे.
आनुवंशिक दोषाचा परिणाम

साकरे (ता. धरणगाव) येथील पाटील कुटुंबातील निंबाबाई शिवाजी पाटील (वय 55) यांचे सहा भाऊ व चार बहिणी असे मोठे कुटुंब आहे. यात निंबाबाईंना जवळचेही अत्यंत अंधूकपणे दिसत होते. त्यांचा उजवा डोळा जानेवारी महिन्यात बदलवण्यात आला होता. या आधी त्यांनी अहमदाबाद येथे डाव्या डोळ्याचे रोपण करून घेतले होते. यामुळे आज त्या पूर्णपणे डोळस झाल्या आहेत. त्यांच्या आई रुक्माबाई सुकदेव पाटील यांनाही लहानपणापासूनच दोन्ही डोळ्यांनी अस्पष्ट दिसण्याचा त्रास जाणवत होता. मात्र, त्या आपल्या आयुष्यात नेत्ररोपण करू शकल्या नाहीत. लहान भाऊ अभिमान सुकदेव पाटील (कनाशी, ता. भडगाव) यांनाही दृष्टीदोषाचा त्रास होता. त्यांनीही नेत्ररोपण करून दृष्टी मिळवलेली आहे. बहीण नागुबाई पंडित पाटील यांनाही दोन्ही डोळ्यांनी दिसत नव्हते. त्यांच्यावरही नेत्ररोपण करून त्यांना दृष्टी मिळाली. दुसर्‍या बहिणीचा मुलगा दिनकर पाटील (वय 40) यांचीही हीच व्यथा होती. तिसरी बहीण सुमनबाई जीवराम पाटील (वय 60) यांनाही नेत्रदानातून दृष्टी प्राप्त करून देण्यात आली आहे.