भुसावळ - शिवसेनेचे बूथ प्रमुख अन् पदाधिका -यांचा मेळावा रविवारी ब्राह्मणसंघात पार पडला. माजी जिल्हाप्रमुख गणेश राणा यांनी गेल्या वेळी पराभूत झालेले उमेदवार अॅड. राजेश झाल्टे यांच्यावर दोन ते चार वेळा मुक्ताफळे उधळली. त्यानंतर ‘राजेश झाल्टे तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’च्या घोषणांनी सभागृह दणाणले. क्षणाचाही विलंब न करता राणा यांनी ‘प्रत्येक जण झाल्टे समजून कामाला लागला पाहिजे’असे विधान केले. मात्र, यानंतर बाळू भोई यांनी उभे राहून राणांचे भाषण थांबवून ‘साहेब माफ करा, पण उमेदवाराचे नाव कृपा करून जाहीर करू नका’, अशी सूचना केल्याने व्यासपीठासह संपूर्ण सभागृहाच्या भुवया उंचावल्या.
संघटनात्मक बांधणीच्या उद्देशाने आयोजित केलेल्या या मेळाव्यात आगामी काळात होणा-याविधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवाराचा नेत्यांनी नामोल्लेख करताच त्याची तत्काळ प्रतिक्रिया उमटल्याने नव्या चर्चेला तोंड फुटले आहे. पक्षांतर्गत गटबाजी मूळ धरत असल्याचे या प्रकारावरून प्रकर्षाने समोर आले आहे. मात्र, संपर्कप्रमुख रवींद्र मिर्लेकर यांनी एकमेकांचे पाय खेचू नका. सामर्थ्याचा उपयोग विरोधकांवर करा, अशा शब्दात पदाधिका -यांची खरडपट्टी तर केलीच पण उपदेशाचे ‘हेवी डोस’ पाजून झणझणीत अंजनही घातले आहे. संघटनात्मक रचना आणि प्रत्यक्षात शहर व तालुक्यात केलेल्या बांधणीची माहिती घेतल्यानंतर त्यांची तळपायाची आग मस्तकातच गेली. पदांची रचनाच भुसावळातील पदाधिका -यांना माहीत नाही, याचेच वैषम्य वाटत असल्याची भावना त्यांनी या जाहीर व्यासपीठावरून बोलून दाखवली. या वेळी मात्र, पदाधिका -यांनी माना खाली घालणे पसंत केले.
हारतुरे अन् संताप
शिवसेनेचे संपर्कप्रमुख रवींद्र मिर्लेकर हे ब -याच वर्षांच्या कालखंडानंतर या मेळाव्याच्या निमित्ताने भुसावळात आले होते. दीड ते दोन डझन कार्यकर्त्यांनी त्यांचा सत्कार केला. थोडीसी उसंत मिळाल्यानंतर त्यांनी सूत्रसंचालन करणारे प्रशांत निकम यांना विचारले की. आणखी किती जण सत्कार करणार आहात. त्यानंतर निकम यांनी पाच जण, असे उत्तर दिले. तेव्हा मिर्लेकरांना ‘पाच जण अन् माझा एकट्याचा सत्कार करणार?’ असे नमूद केले. मात्र, त्यांची ही देहबोली अंतर्मनात संताप होत असल्याचे दर्शन घडवणारी होती.
कुजबुज करणा -यांना खडसावले
बूथ प्रमुखांना मार्गदर्शन करताना चार ते पाच युवक कुजबुज करून भाषणात व्यत्यय आणत होते. ही बाब खटकल्याने मिर्लेकरांनी ‘थांबायचे असेल तर थांबा, नाही तर निघा पुढे’ अशा शब्दात खडसावून पाणउतारा केला. त्यानंतर मात्र, त्यांचे भाषण संपेपर्यंत टाचणी पडली तरी आवाज येईल, ऐवढी शांतता होती. गतकाळात ज्या चुका केल्या असतील त्या पुन्हा होऊ नयेत, यासाठी नियोजन करून शिस्तीने कामाला लागा, असे आवाहन करून त्यांनी पदाधिका -यांना आत्मपरीक्षण करण्यास भाग पाडले. विश्वनाथ पाटील यांनी तयार केलेल्या मतदारसंघाच्या आराखड्याचे मान्यवरांनीही मेळाव्याच्या समारोपानंतर कौतुक केले.