आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dr. Devyani Borole Speech At Jalgoan For Women's Day

जिद्दीने केली मोहीम यशस्वी; पोलर वूमन डॉ. देवयानी बोरोले यांनी केले अनुभव कथन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- साहस व धाडसाने मनातील भीतीला दूर सारत आलेल्या कठिण अनुभवातूनच सहकार्‍यांच्या पाठिंब्याने अंटार्क्टिका मोहिमेचा परिपूर्ण आनंद लुटला. मनाची तयारी व जिद्दीनेच खडतर अनुभव घेऊनच मोहीम यशस्वी करता येणे शक्य असल्याचे प्रतिपादन अंटार्क्टिका मोहिमेतील पोलर वूमन डॉ. देवयानी बोरोले यांनी केले.

जिल्हा महिला असोसिएशन व भरारी फाउंडेशनतर्फे कातांई हॉलमध्ये आयोजित कार्यक्रमात डॉ. बोरोले यांनी मोहिमेचे विविध अनुभव कथन केले. या वेळी त्या म्हणाल्या की, दरवर्षी उन्हाळी व हिवाळी सदस्य या मोहिमेसाठी पाठविले जातात. 2006 मध्ये रौप्य महोत्सवी वर्षात 25 पुरुष सहकार्‍यांच्या समेवत या मोहिमेसाठी निवड झाली. शारीरिक व भौतिक चाचणी घेऊन प्रवासास सुरुवात झाली. केपटाऊन शहरातून बर्फाळ प्रवासास सुरुवात झाली. 98 टक्के बर्फाळ भाग असलेल्या परिसरात बर्फाळ चक्रीवादळांचा सामना करीत प्रियदर्शनी सरोवरात अनेक कठिण अनुभवांचा आम्ही सामना केला.

दरम्यान कुटुंब परिवाराशी कोणताही संवाद ठेवण्यास प्रतिबंध केला जातो. यामुळे डोळ्यासमोर केवळ मिशन पूर्ण करण्याचेच ध्येय असते. हिमवादळामुळे भरकटण्याची मोठी भीती मनावर असते. मात्र, या क्षणात मिळून मिसळून काम करण्याचा आनंद ही भीती घालवतो. मार्गावरील तापमानाची नोंद, वार्‍याची दिशा, याची वारंवार नोंद घेतली जाते. यामुळे पुढील अंदाज घेणे शक्य होते. बर्फाळ वादळामुळे जलसमाधी मिळण्याची भीतीही कायम असते. मात्र सांघिक भावनेमुळे असा प्रसंग आला नसल्याचे डॉ. बोरोले यांनी कथन केले. बाहेरचे तापमान मायनस 30 अंश सेल्सीअस असल्याने शरीरावर याचा विपरीत परिणाम होतो. दरम्यान एका सहकार्‍यांचा हात मशिनीमध्ये अडकल्याचा कटू अनुभव आला. मात्र या वेळी माझ्या वैद्यकीय सेवेचा फायदाही झाल्याने याचे समाधान माझ्यासह सहकार्‍यांनी व्यक्त केले. व्यासपीठावर महिला असोसिएशनच्या अध्यक्षा उषा सरोदे, राजकुमारी बाल्दी, वर्षा मोरदे आदी उपस्थित होत्या. कुमुद गुळवे यांनी परिचय करून दिला.

परित्यक्ता महिलांचे प्रबोधन

अरुणोदय ज्ञानप्रसारक मंडळ संचालित महिला गृहविज्ञान महाविद्यालयात महिला दिनानिमित्त परित्यक्ता महिलांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. स्त्री अभ्यास केंद्र व एनएसएस विभाग, प्रेरणा महिला मंडळाने याचे आयोजन केले होते. जिल्हा परिविक्षा अधिकारी प्रा. राजेंद्र पाटील, प्रेरणा महिला मंडळाच्या अध्यक्षा ज्योत्स्ना बर्‍हाटे प्रमुख पाहुण्या होत्या. राजेंद्र पाटील यांनी महिलांसाठी असलेल्या शासनाच्या विविध योजनांविषयी मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ. किसन पाटील यांनी महिलांनी आत्मविश्वासाने अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी आपली शक्ती एकवटणे गरजेचे असल्याचे सांगितले. उपप्राचार्य किशोर नेहते यांनी मनोगत व्यक्त केले. प्रा. उषा सपकाळे यांनी सूत्रसंचालन केले, प्रा. वृषाली कोल्हे यांनी आभार मानले.

विद्यापीठात आज व्याख्यान
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील स्त्री-अभ्यास केंद्रातर्फे जागतिक महिला दिनानिमित्त दुपारी अडीच वाजता संगणकशास्त्र प्रशाळेतील सभागृहात ‘महिला सुरक्षा व कायदा’ या विषयावर डॉ.छाया दातार यांचे व्याख्यान होणार आहे. स्त्रीविरोधी हिंसेचा प्रतिकार करणारी व जगभर चाललेल्या ‘वन बिलियन रायझिंग’ चळवळीची सीडी या वेळी दाखवण्यात येणार आहे. तसेच 9 मार्चला ‘ब्रेकिंग सायलेन्सेस’ ही एकदिवसीय कार्यशाळा होणार आहे.

आगामी काळात आपल्या प्रगतीसाठी मुस्लिम स्त्रियांनी संघटित होण्याची गरज व्यक्त करण्यात आली. जिल्हा महिला असोसिएशनतर्फे कांताई सभागृहात मुस्लिम महिला मेळाव्यात झालेल्या चर्चेत हा सूर व्यक्त करण्यात आला. एस.एस.मणियार महाविद्यालयाच्या प्रा.अँड. विजेता सिंह, यवतमाळ येथील सामाजिक कार्यकर्त्या रेहाना बेलीम , खुशबू हायस्कूलच्या प्राचार्या शमिम इकबाल, महिला असोसिएशनच्या अध्यक्षा उषा सरोदे, सचिव प्रभा शर्मा, सीमा उपाध्ये प्रमुख पाहुण्या होत्या.

‘मुस्लिम हक्क’ या विषयावर अँड. विजेता सिंह यांनी अभ्यासपूर्ण माहिती सादर केली. तलाक-निकाह, मालमत्ता या विषयी कलमे व महिलांचे हक्क या विषयी त्यांनी माहिती दिली. मुस्लिम महिलांसाठी शिक्षणाचे महत्त्व या विषयावर प्राचार्या शमिम इकबाल यांनी मुस्लिम समाजातील स्त्रियांचे शिक्षणाचे प्रमाण अत्यंत अल्प असून ते वाढविण्यासाठी विविध उपयायोजनांची माहिती दिली. रेहाना बेलीम यांनी मुस्लिम महिलांचे कौटुंबिक प्रश्न कथन केले. मुस्लिम समाजातील महिलांचे विविध अनुभवही त्यांनी सांगितले. शिक्षिका कमरखान यांनी सूत्रसंचालन केले. प्रभा शर्मा यांनी आभार मानले.