आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गावठी पिस्तुलातून दोघांनी डॉक्टरला गोळय़ा घातल्या

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- कासमपुरा (ता. पाचोरा) येथील डॉ. रमणलाल बन्सीलाल ऊर्फ आर. बी. जैन (64) यांची गुरुवारी रात्री गोळय़ा झाडून हत्या करण्यात आली. या हल्ल्यात त्यांचा कंपाउंडर रामेश्वर पांडे (47) जखमी झाला. जामनेर तालुक्यातील मोहाडी रोटवद रस्त्यावर ही घटना घडली.

डॉ. जैन हे दर गुरुवारी जळगाव येथील अयोध्यानगरात रुग्णसेवेसाठी येतात. 6 जून रोजी रात्री नऊ वाजेपर्यंत रुग्णांची तपासणी आटोपून ते कंपाउंडर रामेश्वर पांडे यांच्यासह दुचाकीने कासमपुर्‍याकडे निघाले होते.

दोन दुचाकीस्वार आपला पाठलाग करीत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. यामुळे जैन यांनी मोहाडीजवळ गाडी थांबवून पांडे यास मागे बसण्यास सांगितले व स्वत: गाडी चालवू लागले.

मोहाडी-रोटवद रस्त्यावर एका दुचाकीस्वाराने काही अंतरावरून जैन यांच्या दिशेने गावठी पिस्तुलातून गोळी झाडली. मात्र, ती पांडे यांच्या उजव्या खांद्याला लागून ते खाली कोसळले. त्यामुळे डॉ. जैन यांनी गाडी थांबवली व पांडेंना काय झाले ते पाहण्यास खाली उतरले. याच वेळी हल्लेखोरांनी जैन यांच्या छातीवर गोळी झाडली. यात जैन यांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांना घटनास्थळी गावठी पिस्तुलाच्या दोन कॅप आढळल्या.

गरिबांचे डॉक्टर
डॉ. जैन हे कासमपुरा परिसरातील 20 ते 25 गावांतील रुग्णांवर अल्प दरात उपचार करीत. काही रुग्णांवर मोफत उपचारही त्यांनी केले आहेत. यामुळे गरिबांचे डॉक्टर म्हणून त्यांची परिसरात ओळख होती.