आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉ.कोल्हे होते अपघातापूर्वी तणावात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - औरंगाबाद- जळगाव मार्गावर सिल्लोडजवळ अपघातात ठार झालेल्या डॉ. राहुल कोल्हे यांच्या पार्थिवावर शनिवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, पीसीपीएनडीटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर वैद्यकीय सेवेचा परवाना रद्द झालेले डॉ. कोल्हे सध्या कोणत्या तरी वेगळय़ाच तणावाखाली होते, ही बाब समोर आली आहे.

शुक्रवारी रात्री 9.30 वाजेच्या सुमारास सिल्लोडजवळ भायगावच्या शिवारात डॉ.कोल्हे यांची मारुती स्विफ्ट कार (क्रमांक एमएच 19 एपी 1259) एका वळणावर रस्त्याच्या खाली उतरून झाडाच्या फांदीला धडकली. त्यामुळे कारचे अक्षरश: दोन भाग झाले आहेत. त्यात डोक्याला जबर मार लागल्याने डॉ. कोल्हे जागीच ठार झाले. वडोदबाजार पोलिस ठाण्यात याप्रकरणी नोंद केली आहे. आज सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास त्यांचे पार्थिव जळगावात आणले गेले. थोडा वेळ पार्थिव नव्या हॉस्पिटलच्या इमारतीत नेण्यात आले. त्यानंतर दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास वैकुंठधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी शहरातील डॉक्टर्स मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

त्या तणावाचे गूढ: अंबाजोगाई येथील डॉ. मुंडेप्रकरणातही आरोपी असलेले डॉ. कोल्हे शुक्रवारी न्यायालयात हजर राहाण्यासाठी तिथे गेले होते. तिथून परतण्यापूर्वी त्यांनी डॉ. एन.एल. सोमवंशी यांच्याशी चर्चा करताना आपण वेगळय़ाच तणावाखाली असल्याची बाब नमूद केली होती. तो तणाव पीसीपीएनडीटी कायद्यान्वये झालेल्या कारवाईचा नसून वेगळाच आहे, असेही त्यांनी नमूद केले होते, असे डॉ. सोमवंशी यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले. असाच अनुभव डॉ. कोल्हे यांचे मामेभाऊ सचिन धांडे यांनाही आला.

या तणावाबद्दल बोलण्यासाठी त्यांना आपल्याबरोबर अंबेजोगाईला येण्याचे आवाहनही डॉ. राहुल कोल्हे यांनी केले होते. मात्र, शेवटच्या क्षणी आपण एकटेच जाणार असल्याचे सांगून ते निघून गेले. त्यामुळे हा तणाव कसला होता, हे जाणून घ्यायचे राहून गेले, अशी खंत सचिन धांडे यांनी व्यक्त केली.

ऑक्टोबर 2011 मध्ये अनधिकृतपणे स्त्रीभ्रूणहत्या केल्याच्या आरोपात डॉ. राहुल कोल्हे यांना अटक झाली होती. त्यामुळे त्यांचा परवानाही रद्द झाला होता. पद्मावती हॉस्पिटलही सील झाले. सध्या या खटल्याचे कामकाज बीड येथील न्यायालयात सुरू आहे.

याप्रकरणानंतर त्यांनी जळगावातील रिंगरोडवर एका भव्य इमारतीचे बांधकाम सुरू केले होते. नुकतेच ते पूर्ण होत आले आहे. खटला संपल्यानंतर तिथे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू करण्याचा डॉ. राहुल यांचा मनोदय होता. दोन बहिणींचा हा एकुलता एक भाऊ होता. त्यांच्या पत्नी सध्या देवरा, गुजरात येथे रुग्णालय चालवतात. त्यांच्या पश्चात पत्नीसह 8वर्षे वयाचा वज्र आणि 4 वर्षे वयाची जिया ही मुलगीही आहे. डॉ. राहुल यांच्या आई वडिलांना या घटनेने मोठा धक्का बसला आहे.