आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शस्त्रक्रियेनंतर डॉ.जाधवांच्या ‘आप’तील भूमिकेकडे लक्ष

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - हृदयाचा जाणवलेला त्रास आणि त्यानंतर झालेली एन्जीओग्राफी यानंतरही उत्साह कायम ठेवत रावेर लोकसभा मतदारसंघात संपर्क वाढवत राहिलेल्या आम आदमी पक्षाच्या डॉ.प्रताप जाधव यांच्या सध्याच्या भूमिकेविषयी मात्र, पक्षातच उत्सुकता वाढली आहे.

आम आदमी पक्षात प्रवेश घेतल्यानंतर रावेर लोकसभा मतदारसंघासाठी जळगावातील अस्थिरोगतज्ज्ञ प्रताप जाधव यांनी उमेदवारी मागितली आहे. पक्षाने त्यांना अधिकृतपणे उमेदवारी जाहीर केलेली नसली तरी सकारात्मक संकेत मिळाल्यामुळे त्यांनी मतदारसंघात संपर्क वाढवला आहे. थेट मलकापूरपर्यंत ते जाऊन आले आहेत. या धावपळीत त्यांना हृदयाचा त्रास जाणवू लागल्याने दोन आठवड्यांपूर्वी आर्किड हॉस्पिटलमध्ये त्यांची एन्जीओग्राफी करण्यात आली. मात्र, सर्व काही सुरळीत असल्याने त्यांनी पुन्हा उत्साहाने आपली संपर्क मोहीम वाढवली होती. मात्र, अचानक गेल्या आठवड्यापासून त्यांनी आपली संपर्क मोहीम थांबविल्याचे वृत्त आहे.

डॉ. जाधव यांच्या हाताच्या बोटावर नुकतीच मुंबईत शस्त्रक्रिया करण्यात आल्याचे सांगण्यात आले. या शस्त्रक्रियेनंतर बुधवारी रात्री ते मुंबईहून जळगावच्या प्रवासाला निघाले. मात्र, पुन्हा ते संपर्क मोहिमेला सुरुवात करतात की प्रकृतीचे कारण देत मोहीम थांबवतात, या विषयी आम आदमी पक्षात उत्सुकता आहे. आम आदमी पक्षातर्फे उमेदवारी निश्चितीची पद्धत जाहीर करण्यात आली आहे. मात्र, पक्षातील काही वरिष्ठ पदाधिकार्‍यांकडून आणि स्थानिक पातळीवर काही संभाव्य उमेदवारांकडून थेट उमेदवारीचे दावे केले जात असल्यामुळे डॉ. प्रताप जाधव नाराज असल्याचे सांगण्यात येते. या संदर्भात त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र संपर्क झाला नाही.

डॉ.जाधव आपसोबतच
डॉ.प्रताप जाधव हे वैयक्तिक अडचणीमुळे जळगावात नव्हते. मात्र, ते आपसोबतच आहेत. लवकरच ते पक्षात सक्रिय होणार आहेत. आम्ही सतत त्यांच्या संपर्कात आहेत. सुभाष तंवर, जिल्हा समन्वयक, आप.