आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : एका अवघड खटल्याची सोपी गोष्ट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. विजया चौधरी यांनी रुग्णालयाच्या शवविच्छेदन ओट्यावर अनेक शवांचे विच्छेदन केले; पण ज्यांच्यावर त्यांनी विश्वास ठेवून 12 मार्च 2012 रोजी शवविच्छेदनगृहात प्रवेश केला त्या ओळखीच्याच तिघांनी त्याच ओट्यावर त्यांच्या सचेतन देहाचे शवात रूपांतर केले. पुढचे तीन दिवस डॉ. विजया चौधरी यांचे गायब होणे एक गूढ बनून राहिले होते. मारेकर्‍यांनी त्यांच्या देहाची परस्पर जाळून विल्हेवाट लावल्यामुळे पुरावा सापडण्याची शक्यताही नव्हती. तरीही पोलिसांनी कौशल्याने या गुन्हय़ाचा तपास लावला आणि सरकारी वकिलांनी प्रभावीपणे खून सिद्ध करून मुख्य आरोपीला फाशीच्या शिक्षेपर्यंत पोहोचवले. कशी घडली ही प्रक्रिया, यावर टाकलेला हा प्रकाशझोत.

चार शक्यता आणि समोर अंधार
डॉ. विजया चौधरी बेपत्ता असल्याची फिर्याद डॉ. अरविंद चौधरींनी 13 मार्च 2012 रोजी जिल्हापेठ पोलिसात दिली. त्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. त्यावेळी त्यांच्यासमोर होत्या चार शक्यता आणि समोर नुसता अंधार.

शक्यता 1 डॉ. विजया चौधरी रागाच्या भरात कुठे तरी निघून गेल्या असाव्यात.
अंधार असा - आपणच त्यांना रुग्णालयापर्यंत सोडले होते आणि लग्नाला जायचे असल्याने त्या खुशीत होत्या, असे पती सांगत होते. त्यामुळे त्या रागात नव्हत्याच.
शक्यता 2 त्यांना अपघात झाल्याने जखमी अवस्थेत त्या रुग्णालयात असाव्यात.
अंधार असा - कुठेही अशा गंभीर अपघाताची नोंद नव्हती आणि त्या डॉक्टर असल्याने परिसरातल्या कोणत्याच डॉक्टरसाठी त्या अनोळखी देखील नव्हत्या.
शक्यता 3 डॉ. विजया चौधरी यांचे कोणी तरी अपहरण केले असावे.
अंधार असा- 24 तासात कोणीही त्यांच्या पतीशी वा अन्य कोणाशी संपर्क साधून त्यांच्या अपहरणाच्या बदल्यात कशाची मागणी देखील केलेली नव्हती.
शक्यता 4 डॉ. विजया चौधरींचा कोणी तरी खून केला असावा.
अंधार असा- खून होण्या-इतपत त्यांचे कोणाशी वैर, भांडण नव्हते अथवा कोणी धमकी दिलेली नव्हती. त्यांच्या मृत्यूने कोणाला संपत्ती मिळण्याचीही शक्यता नव्हती.

..आणि अंधार अचानक दूर झाला
स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे तपास वर्ग केल्यावर त्यावर लक्ष केंद्रित केले गेले. जिल्हापेठ पोलिसांचा तपास पुढे नेण्यासाठी पोलिस निरीक्षक डी.डी. गवारे यांनी घड्याळाचे काटे उलटे फिरवायला सुरुवात केली आणि अंधार दूर झाला.

शेवटी कुठे दिसल्या होत्या? डॉ. विजया चौधरी सर्वात शेवटी कुठे आणि कोणाला दिसल्या होत्या, याचा शोध घ्यायला पोलिसांनी सुरुवात केली आणि तपासाचा एकेक धागा जुळायला लागला.
शेवटचे कोणी पाहिले? डॉ. चौधरींना शवविच्छेदनासाठी तिकडे जाताना पाहिलेला एक कर्मचारी पोलिसांना भेटला. त्यानंतर त्यांना कोणी पाहिल्याचे समोर येत नव्हते. म्हणून शवविच्छेदनगृहात नियुक्त पवन जाधव आणि त्याचा मदतनीस युवराज साबळेशी त्यांची त्यानंतर भेट झाली असणार असा अंदाज पोलिसांनी केला.
युवराज आलाच नाही पोलिस निरीक्षक डी.डी. गवारे यांनी दोघांनाही बोलावणे पाठवले. दिलेल्या वेळी पवन आला. युवराज मात्र आलाच नाही. म्हणून त्याला दुपारी 1 वाजता फोन केला गेला.
खोट्याने उघडले खरे युवराजशी संपर्क केल्यावर तो म्हणाला मी एक शव घेऊन चाललो आहे आणि आता नागपूरपर्यंत पोहोचलो आहे. त्यामुळे येता आले नाही. त्याच वेळी त्याला 11 वाजता रुग्णालयाच्या आवारात पाहाणारी व्यक्ती समोर होती. तिथे युवराज खोटे बोलतो आहे हे लक्षात आले आणि संशयाची सुई त्याच्याकडे फिरली.

मृतदेहाशिवायही गुन्हा सिद्ध : निकम
गुन्हा सिद्ध करताना ज्याचा खून झाला त्या व्यक्तीचा मृतदेह सापडणे बंधनकारक आहे, असे कायद्यात म्हटलेले नाही. परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारानेही गुन्हा सिद्ध होतो. मृतदेह सापडल्याशिवाय खून सिद्ध होणार नाही, अशी कायद्यात तरतूद असती तर आरोपी खून करून मृतदेहाची विल्हेवाट लावतील आणि मग त्या खटल्यात आरोपींना शिक्षाच होणार नाही. डॉ.चौधरी यांच्या खून खटल्यात परिस्थितीजन्य पुराव्यांची साखळी न्यायालयात स्पष्टपणे सादर करण्यात आली. घटनेच्या दिवशी तिन्ही आरोपींची सामान्य रुग्णालयातली उपस्थिती, त्यानंतर तिघांचे एका गाडीतून बाहेर पडणे आणि ते अनेकांनी पाहाणे, तशा साक्षी होणे हे खुनातील सहभाग सिद्ध करीत होतेच.- अँड. उज्‍जवल निकम