आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गटारीला राजकारणाची दुर्गंधी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- रचना कॉलनीत गटारींचे बांधकाम होणार म्हणून नागरिकांमध्ये असलेले आनंदाचे वातावरण हा केवळ देखावा असल्याचे लक्षात आल्याने नाराजीत रूपांतरीत झाले आहे. गटारीचे बांधकाम प्रत्यक्षात 180 मीटर मंजूर असताना महापालिकेने तब्बल 700 मीटर खोदकाम केल्याने यामागे राजकीय स्टंट असावा असा आरोप होऊ लागला आहे.

रचना कॉलनीत आमदार सुरेश जैन यांच्या आमदार निधीतून गटारींचे काम मंजूर झाले आहे. पालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी या भागात उद्घाटनाचे सोपस्कार पार पाडण्यात येवून खोदकामही करण्यात आले. गटारीचे बांधकाम 180 मीटर मंजूर असताना प्रत्यक्षात 700 मीटर खोदकाम करण्यात आल्याने परीसरातील नागरिकांची गैरसोयच झाली आहे. घरांच्या सुरक्षा भिंतीपासून एक मीटर खोदकाम करून तीन महिने उलटले असून घरात जाण्यासाठी रस्ताच नसल्याने महिला व लहान मुले गटारीत पडून जखमी होत आहेत.

तक्रारींचा उपयोग नाही
रचना कॉलनीत तीन महिन्यांपूर्वी गटारी खोदल्या आहेत. परंतु बांधकामाला सुरुवात नाही. मंजुरीपेक्षा जास्त खोदकाम केले गेले. याबाबत पालिकेतही तक्रार केली परंतु कोणी लक्ष द्यायला तयार नाही. जास्तीच्या खोदकामामागे नेमका हेतू काय होता? यास जबाबदार व्यक्तींवर कारवाई व्हावी. रमेश सूर्यवंशी,( परीसरातील नागरिक)

पाठपुरावा सुरूच
नागरिकांच्या तक्रारीनंतर आयुक्तांकडे तीन वेळा विषय मांडून चर्चा केली. मंजूर कामापेक्षा जास्त खोदकाम करण्यात आल्याने अडचण वाढली आहे. यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. यात पालिकेचेही नुक सान झाले असून संबंधित ठेकेदाराविरुद्ध कारवाई करणे गरजेचे आहे. माझा पाठपुरावा सुरूच आहे. चेतन शिरसाळे, (नगरसेवक, प्रभाग क्रमांक 25)

तक्रारींकडे दुर्लक्ष
मंजुरीपेक्षा जास्तीचे खोदकाम करण्याची गरजच काय?असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.हा केवळ निवडणुकीचा स्टंट असल्याची टीकाही आता होऊ लागली आहे. दररोजच्या अडचणीबाबत प्रशासनाकडे तक्रारी करूनही काही उपयोग होत नसून आयुक्त आदेश करतात. परंतु अधिकारी मात्र त्याची अंमलबजावणी करण्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे निदर्शनास आले आहे.