आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराचाळीसगाव - नाट्यरसिक व नाट्यकलावंतांसाठी शहरात स्वतंत्र नाट्यगृहाची उभारणी व्हावी, या मागणीसाठी गेल्या अकरा वर्षांपासून विविध सामाजिक संघटना व नाट्य कलावंतांकडून मागणीचा जोर वाढला होता. अखेर नाट्यगृहासाठी लागणार्या जागेचा तिढा सुटला असून लवकरच दीड एकर जागेवर हे नाट्यगृह उभारण्यात येणार आहे. जिल्हाधिकार्यांनी जागेच्या अंतिम मंजुरीला हिरवी झेंडी दिली आहे.
शहरातील शासकीय दूध डेअरी मागील दीड एकर जागेचा नगरपालिका प्रशासनाने नाट्यगृहासाठी यापूर्वी प्रस्ताव पाठविला होता. आमदार राजीव देशमुख यांनी सातत्याने जिल्हाधिकार्यांकडे जागा मिळण्यासाठी पाठपुरावा केला होता. जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर यांनी तीन दिवसांपूर्वी या जागेची पहाणी केली. तांत्रिक अडचणींमुळे अनेक वर्षांपासून जागेअभावी नाट्यगृह उभारणीला अडचण येत होती. यामुळे स्थानिक नाट्यकलावंतांमध्ये नाराजीचा सूर पसरला होता. तालुक्यात विविध कलागुणांनी संपन्न असलेले अनेक लहान-मोठे नाट्य कलावंत उदयास येत आहेत. मात्र त्यांना सरावासाठी खुले व्यासपीठ मिळत नसल्याने त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळणे अवघड होते. कलाकारांसाठी स्वतंत्र रंगमंच उभारणे गरजेचे आहे. हे काम लवकरच मार्गी लागावे, अशी अपेक्षा कलावंतांची आहे.
शहरातील काही नामवंत कलावंतांनी तालुक्याचा अभिमान वाटावा अशी नाटके सादर करून नावलौकिक मिळविला आहे. स्थानिक कलावंतांनीच नाट्य चळवळ आजपर्यंत जिवंत ठेवली आहे. गेल्या 11 वर्षांपासून शहरात नाट्यगृह व्हावे अशी मागणी करणार्या नाट्यरसिकांचे स्वप्न येणार्या काळात पूर्ण होण्याची अपेक्षा वाढली आहे.
स्व.डॉ.काकासाहेब पूर्णपात्रे, स्व.डॉ.प्रमिला पूर्णपात्रे, डॉ.शकुंतला आठवले यांच्यासह अनेक लहान-मोठय़ा नाट्य कलावंतांनी शहरात नाट्य चळवळीचा पाया उभा केला. शालेय जीवनापासून रंगमंच गाजविणारे नंतरच्या काळात दिग्गज कलावंत झाले. जिल्हय़ात जळगावनंतर सर्वाधिक नाट्यकलावंत चाळीसगाव येथे घडत असताना त्यांना आपली अदाकारी सादर करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळालेले नव्हते, मात्र ही अपेक्षा लवकरच पूर्णत्वास येणार आहे. अनेक नावाजलेली नाटके या भूमीत सादर झाली. आता अपेक्षा केवळ नाट्यगृहाचीच उरली आहे. मांदुर्णेचे शिवाजी पाटील यांच्या ‘धग’ चित्रपटाने राष्ट्रीय पारितोषिक मिळविले.
दीड एकर जागेचा प्रस्ताव
नगरपालिकेने नाट्यगृहासाठी शासकीय दूध डेअरी जवळील गट क्रमांक 425/26 मध्ये 6 हजार चौरस मीटरचा जवळपास दीड एकर जागेची तीन दिवसांपूर्वीच पहाणी करून जागा मोजमाप करण्याच्या सूचना प्रांताधिकार्यांना दिल्या. जागेची मोजणी करून अंतिम मंजुरीसाठी हा प्रस्ताव लवकरच जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी रवींद्र जाधव यांनी सांगितले. जागेची पहाणीदरम्यान पाचोर्याचे प्रांताधिकारी गणेश मिसाळ, चाळीसगावचे प्रांत मनोज घोडे पाटील तहसीलदार बाबासाहेब गाढवे, मुख्याधिकारी रवींद्र जाधव, उपनगराध्यक्ष प्रदीप निकम, रामचंद्र जाधव महानंदाचे प्रमोद पाटील, दिलीप चौधरी उपस्थित होते.
काम लवकर मार्गी लावावे
संभाजी सेनेच्यावतीने शहरात नाट्यकलावंतांसाठी स्वंतत्र नाट्यगृहाची उभारणी करावी या मागणीसाठी वेळोवेळी संघटनेकडून आंदोलन करण्यात आले होते. जागेचा तिढा सुटला असला तरी हे काम लवकरच मार्गी लागले पाहिजे, अशी अपेक्षा आहे. लक्ष्मण शिरसाठ, संभाजी सेना अध्यक्ष
तत्त्वत: जागेला मंजुरी
जिल्हाधिकार्यांनी दीड एकर जागेला तत्त्वत: मंजुरी दिली आहे. लवकरच जागामोजणीचे अंतिम काम होईल व इतर शासकीय कागदपत्रांची पूर्तता करून जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव अंतिम मंजुरीला पाठविण्यात येईल. गणेश मिसाळ, प्रांताधिकारी पाचोरा.
भरीव निधी उपलब्ध करून देणार
पालिका प्रशासनाने यापूर्वीच जिल्हाधिकार्यांकडे नाट्यगृहाच्या जागेचा प्रस्ताव पाठविला होता. त्याचा सातत्याने पाठपुरावा करून जिल्हाधिकारी यांनी दीड एकर जागेला मंजुरी देण्यासाठी हिरवी झेंडी दिली आहे. लवकरच काम मार्गी लागेल. नाट्यगृहासाठी शासनाकडून भरीव निधीची मागणी करून अत्याधुनिक सोयी-सुविधांयुक्त नाट्यगृह उभारण्यात येईल. राजीव देशमुख, आमदार.
11 वर्षांपूर्वी केली होती पालिके कडे मागणी
रंगगंध कलासक्त न्यास मंडळाच्यावतीने 2002 पासून शहरात चांगले व दज्रेदार नाट्यगृह व्हावे अशी मागणी पालिका प्रशासनाकडे केली होती. अखेर उशिरा का होईना नाट्यकलाप्रेमींसाठी शहरात हक्काचे व्यासपीठ मिळणार आहे. लवकरच हे काम मार्गी लागले पाहिजे. अत्याधुनिक सोयी-सुविधांयुक्त सर्व कलांचे सादरीकरण करता येईल अशा स्वरूपाचे हे नाट्यगृह उभारण्यात यावे अशी अपेक्षा आहे. निव्वळ नाट्यगृह न रहाता त्यात विविध प्रकारच्या शिल्पकला, चित्रकलांचे प्रदर्शन भरवता यायला हवे, डॉ.मुकुंद करंबेळकर,रंगगंध कलान्यास अध्यक्ष.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.