आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वच्छता करताना जामनेरच्या पुरवठा विभागात आढळून आल्या बाटल्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जामनेर - येथील पुरवठा विभागात मंगळवारी रात्री ओली पार्टी झाल्याचे पुरावे आढळून आले. बुधवारी सकाळी स्वच्छता करताना दारूच्या बाटल्यांसह पार्टीसाठी लागणारे अन्य साहित्यही पडलेले होते. त्यामुळे शासकीय कार्यालयात पार्टी करणारे महाभाग कोण? त्यांच्यावर कारवाई होईल काय? असे प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.

जामनेर तहसील आवारातील पुरवठा विभागात बुधवारी सकाळी दारूच्या बाटल्या आढळून आल्या. हा प्रकार जागरूक नागरिकांनी पत्रकारांना कळवला. मिळालेल्या माहितीची खात्री केल्यावर दारूच्या रिकाम्या तीन बाटल्या, दारू पिण्यासाठी वापरलेले प्लास्टिकचे ग्लास पाण्याच्या बाटल्या आढळून आल्या. मंगळवारी महाशिवरात्रीची सुटी असली तरी, कार्यालयीन कामकाज पूर्ण करण्यासाठी काही कर्मचारी रात्री उशिरापर्यंत कार्यालयात बसल्याचे सांगण्यात आले. हा प्रकार पत्रकारांनी तहसीलदार चंद्रकांत देवगुणे यांच्या कानी घातल्यानंतर त्यांनी संबंधितांची झाडाझडती घेतली.
मात्र, कुणीही मद्यपान केले नसल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे, असे त्यांनी सांगितले. कचेरीच्या आवारात चोवीस तास वर्दळ असलेले पोलिस ठाणे आहे. असे असतानाही घडलेला हा प्रकार निंदनीय असल्याचे मत जनसामान्यांतून व्यक्त होत आहे.

दरम्यान, सप्टेंबर २०१४ रोजीही येथील सेतू सविधा केंद्राजवळ अशाच दारुच्या बाटल्याचा खर्च आढळून आला होता. तेव्हाही अशीच ओली पार्टी रंगली होती.
सीसीटीव्हीची गरज

यापूर्वीही तहसील कार्यालय आवारात असलेल्या सेतू सुविधा केंद्रालगत दारूच्या रिकाम्या बाटल्यांचा ढीग आढळून आला होता. त्यानंतर तहसीलदार देवगुणे यांनी कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पुरवठा विभागात कॅमेरा लावला गेला. मात्र, काही दिवसांतच तो काढण्यात आल्याचे या घटनेने निदर्शनास आले आहे.