जळगाव - शहरातील मुख्य चौकांमध्ये असलेल्या वाईन शॉपच्या जवळपासच भररस्त्यात तळीरामांचे ठिय्ये आहेत. यामुळे महिलांसह नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
चित्रा चाैक : चित्राचाैकातील नीलम वाइनबाहेर दाेन्ही बाजूने सायंकाळपासूनच तळीरामांची यात्रा भरते. दुकानाच्या डाव्या बाजूला असलेल्या गल्ली-बाेळात ५० ते १० तळीराम रस्त्यावरच पेग लावतात. चकणा, अंडा गाड्यांची तेथे व्यवस्था अाहे. दुकानाच्या उजव्या बाजूला असलेल्या पानटपरीवरच दारूसह, ग्लास, चकणा सर्व गाेष्टी ठेवलेल्या अाढळून अाल्या. भरचाैकात तळीराम खाली बैठक लावून एकमेकांना चिअर्स करीत पेग लावत असल्याचे चित्र शनिवारी सायंकाळी वाजता हाेते. त्यानंतर चाैकातील तळीरामांची गर्दी वाढत गेल्याने रस्त्याने येणाऱ्या महिलांना मार्ग बदलण्याची वेळ अाली.
गुजराल पेट्रोल पंप
पंपाच्या समोर असलेल्या मोठ्या शॉपिंग कॉम्पलेक्सच्या तळमजल्यावर वाइन शॉप आहे. या वाइन शॉपीवर सायंकाळी वाजेपासून गर्दी उसळण्यास सुरुवात होते. दुकानाच्या समोर असलेल्या मोकळ्या जागेवर मांडी मारून मद्यापींचे फड रंगलेले असतात. त्यांच्यासमोरच चाट, अंडी उपलब्ध असल्यामुळे मद्यपींची सोय होते. या मार्केटमध्ये दूध डेअरी, इलेक्ट्रीकचे दुकान आदी गृहोपयोगी वस्तूंची दुकाने आहेत. परिसरातील महिला, नागरिक दुकानांमध्ये खरेदीसाठी येत असतात. चौकात चोपडा, यावलकडे जाणाऱ्या बसेसचा थांबा आहे. त्यामुळे अनेक प्रवासी उभे असतात. त्यांच्यासमोर रस्त्यावरच मद्यपींची गर्दी झालेली असते. शिवाय या कॉम्प्लेक्सच्या तिसऱ्या मजल्यावर शाळा आहे. दिवसा विद्यार्थ्यांची रेलचेल असते. सकाळी ११ वाजेपासूनच दुकान सुरू होताच मद्यपींचे येणे-जाणे सुरू होते. तर दुसरीकडे विद्यार्थ्यांचीही वर्दळ होत असते. रात्रीच्या वेळी मद्यपींमध्ये वाद होणे, हाणामारी होणे, हे या भागात नित्याचेच झाले आहे.
भजे गल्ली
या ठिकाणी १० ते १२ अंडापावच्या हातगाड्यांवर दिवसरात्र मद्यपींची जत्रा भरलेली असते. परिसरातच पाच-सहा बिअर बार दोन वाइन शॉप आहेत. वाइन शॉपमधून दारूची बाटली घेताच समोर अंडापावची गाडी उपलब्ध होते. त्यामुळे मद्यपींना चांगलेच फावते. अंडापावच्या गाड्यांवर अनेक वेळा हाणामारीच्या घटनाही घडलेल्या असतात. रात्री उशिरापर्यंत येथे दारू, अंडी मिळत असल्यामुळे वर्दळ जास्त असते. शेजारी बसस्थानक असल्यामुळे प्रवाशांची गर्दी या भागात असते. दिवसभर मद्यपींचा गोंधळ सुरू असल्याने महिला प्रवाशांना या भागातून चालणेही अवघड जाते.
प्रभात चाैक
प्रभात चाैकातील रहिवासी परिसरात अपार्टमेंट खाली असलेल्या प्रितम वाइन शाॅपबाहेर तळीरामांची सायंकाळपासूनच यात्रा भरते. शाॅपमधून दारू घेतल्यानंतर तळीराम पार्किंगमध्ये रस्त्यावर, महामार्गाच्या कडेला असलेल्या अंडा गाडीवर बैठक लावतात. १५ ते २० जणांचा घाेळका रस्त्यावर उभा असताे. त्यामुळे तेथून जाणाऱ्या महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना अाहे. शाॅपबाहेर डिस्पाेजल पाण्याचे ग्लास अाणि पाण्याची व्यवस्था अाहे. चकणा, पाणी पाऊच बाहेरच मिळत असल्याने तळीरामांचे हे हक्काचे ठिकाण झाले अाहे.
जुने बसस्थानक
जुनेबसस्थानकाच्या बाहेर अाणि मागच्या बाजूने तळीरामांच्या टाेळ्या उभ्या असल्याने पायी जाणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागताे. सायंकाळी वाजेपासून रात्री १० वाजेपर्यंत येथे गर्दी हाेती. जवळच सट्टापेढ्यादेखील असल्याने वाढलेल्या गर्दीत हुल्लडबाजी, शिवीगाळ, भांडणे असे प्रकार अाढळून अाले.