आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काउंटर पेग अन् वाइन शाॅपीबाहेरील तळीरामांच्या बैठकांमुळे बिघडले जळगावचे समाजस्वास्थ्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - शासनाच्या महसूल वाढीसाठी किराणा दुकाने, मेडिकल शॅापच्या धर्तीवर भरवस्तीत वाइन शॉपी, बिअर शॉपींना परवाने देण्याचे दुष्परिणाम आता समोर येत आहेत. गल्लीबोळांमधील हे वाइन शॉप, बिअर शॅापी म्हणजे तळीरामांसाठी हक्काची बैठक झाली अाहे. वाइन शाॅप बाहेरच बैठक मारून सार्वजनिक ठिकाणी सर्रास मद्यपान केले जाते. बाजारपेठ, रहिवासी काॅलन्या, बस थांबे, रस्त्यावर असलेल्या या वाइन शाॅपीवरील तळीरामांची हुल्लडबाजी, शिवीगाळ, भांडणे आणि छेडछाडीमुळे महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली अाहे. मुळात राज्यातील दारूबंदी कायद्यानुसार सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणेेच निषिद्ध आहे. भरवस्तीमध्ये हाेणाऱ्या या प्रकारांकडे पाेलिसही कानाडोळा करत असल्याने शहरात कायदा सुव्यवस्था आणि समाज स्वास्थ्य दोन्हीही बिघडत चालल्याचे चित्र अाहे. 

रामानंदनगर परिसरात भरवस्तीत असलेल्या एका परमिट रूमविरोधात नगरसेविकेच्या नेतृत्वाखाली नागरिकांनीच जोरदार स्वाक्षरी मोहीम नुकतीच राबवली. त्यामुळे मनपाने परमिट रूमचे अतिक्रमण पाडण्याची कारवाई शुक्रवारी केली होती. त्या पार्श्वभूमीवर ‘दिव्य मराठी’चमूने भरवस्तीमधील वाइन शॉप, बियर शॉपी बाहेरील परिस्थितीची शनिवारी पाहणी केली असता धक्कादायक चित्र दिसून आले. शहरात वाइन शाॅपीवरील ‘काऊंटर पेग’ हा प्रकार शहरात झपाट्याने वाढला अाहे. गेल्या दीड-दाेन वर्षांपासून वाइन, बिअर शाॅपीसाठी असे ग्राहक वाढल्याने त्यांच्यासाठी दुकानाशेजारीच ‘काऊंटर पेगची व्यवस्था करण्यात येते. अधिकृत हाॅटेल, बिअर बारमध्ये गेल्यास अधिक पैसे माेजावे लागतात, हा खर्च टाळण्यासाठी आजकाल तळीराम वाइन शाॅपबाहेरच बैठक लावतात. शिवाय पार्किंगमध्ये, अंडा अाॅमलेट गाड्यांवर अथवा भरवस्तीत असलेल्या एखाद्या मद्याच्या शॉपीवर उभे राहूनच सर्रास मद्यपान केले जाते. या ठिकाणी मद्याच्या नशेत भांडणे, शिवीगाळ, हुल्लडबाजी, छेडछाड असले प्रकार घडतात. त्यामुळे शालेय विद्यार्थी, महिलांमध्ये असुरक्षितता निर्माण झाली अाहे.
 
दरम्यान, या प्रकाराकडे पाेलिसांचे मात्र साफ दुर्लक्ष असून वाइन शाॅपीचालक अाणि तळीरामांमध्ये पोलिसांचा अजीबात धाक नसल्याचे चित्र अाहे. चित्रा चाैक, प्रभात चाैक, अजिंठा चाैफुली, गुजराल पेट्राेल पंप, रामानंद, भजे गल्ली, जुन्या बसस्थानकाबाहेरील परिसर, शिव काॅलनी स्टाॅप, गणेश काॅलनी रस्ता येथे तळीराम ठिय्या मारून असतात. 

अर्थकारणामुळे रस्त्यावर ‘जाम पे जाम’ 
मुळातवाइन शॉपीमधून केवळ मद्याची बाटली विकत घेण्याची व्यवस्था असते. या दुकानाच्या बाहेर दारू पिणे बेकायदा आहे. पण, बिअर बारमध्ये मिळणारी मद्याच्या बाटलीच्या किमतीपेक्षा कमी पैशात वाइन शॉपीमध्ये दारू मिळते. एका बाटलीच्या मागे किमान ३५-४० रुपये कमी लागतात. म्हणून अनेक मद्यपी वाइन शॉपीमधून दारू खरेदी करून सार्वजनिक ठिकाणीच ती रिचवतात. या अर्थकारणामुळे रस्त्यावर दारू पिण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढते आहे. 

महसूल आणि रोजगार वृद्धी या दृष्टिकोनातून शासनाने इतर दुकांनाप्रमाणे वाईन शाॅपी,बियर शॉपींना रहिवासी वस्ती मध्ये परवाने देण्याचा निर्णय झाला होता.त्यामुळे गल्लोगल्ली बियर शॉपी,वाईन शॉपी सुरु झाल्या. ही सर्व दुकाने कायदेशीर आहेत. त्यामुळे या दुकानांना विरोध नाही. परंतु व्यवसाय वाढीच्या गळेकापू स्पर्धेमुळे अनेक दुकानदारांनी तळीरामांसाठी सोय करुन दिली. शिवाय हाॅटेल,परमिटरुमध्ये अधिक पैसे देण्यापेक्षा सोईस्कर पर्याय सापडल्यामुळे लोकांनीही त्याचा दुरुपयोग करण्यास सुरुवात केली. परिणामी भरवस्तीमधील दुकानांमध्ये ‘काउंटर पेग’ घेतल्यानंतर तळीरामांचेही भान सुटते,तिथेच डिस्पोजेबल ग्लास टाकल्याने कचरा होतो. मद्यपींचा गोंधळ, कलकलाट, भांडणे, छेडछाडीचे प्रकार घडतात, असे दिसून आले आहे. महिला, मुलींची सुरक्षितता आणि शहराचे सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याला तळीरामांच्या या बैठका कारणीभूत ठरत आहेत. त्या विरोधात नागरिकांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. 

कायदा काय म्हणतो? 
सार्वजनिक ठिकाणी दारू पिणे कायद्याने गुन्हा आहे. असा गुन्हा करणाऱ्यांवर मुंबई दारूबंदी प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करता येतो. यात ते हजार रुपये दंड किंवा महिन्यांचा कारावास अशी शिक्षा होऊ शकते. अॅड.राजेश गवई, सरकारी वकील.