आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

४० अंश कोनात बस चालवून वाचवले सर्वच प्रवाशांचे प्राण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जामनेर - अचानकसमोर आलेली कार पाहून अपघात टाळण्यासाठी रस्त्याच्या कडेला अक्षरश: ३५ ते ४० अंशांच्या कोनात बस चालवून प्रवाशांचे प्राण वाचवणाऱ्या बसचालकाचा जामनेर येथील यूथ फाउंडेशनतर्फे गुरुवारी गौरव करण्यात आला. या वेळी जितेंद्र पाटील यांनी बसचालकास पाच हजार रुपयांचे बक्षीस दिले. या वेळी शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांसह काही कर्मचाऱ्यांचाही सत्कार करण्यात आला.
जामनेर येथून टाकरखेडा येथे जाण्यासाठी बस (एमएच- २०, डी- ८९८५) सकाळी ११ वाजता निघाली. जामनेर शहराबाहेर जाताच एकलव्यनगरजवळ समोरून एक स्विफ्ट कार वेगात बसकडे येत असताना अपघात होण्याची शक्यता पाहून बसचालक नामदेव पाटील यांनी बस डाव्याबाजूला रस्त्याच्या कडेला वळवली; मात्र रस्त्याच्या डाव्याबाजूला भलीमोठी कडा उतार असून रात्रीच्या पावसामुळे झालेला चिखल पाहता बस आटोक्यात आणणे शक्य होत नसल्याचे पाहून समयसुचकता दाखवत बसचालक नामदेव पाटील यांनी १०० मीटरपेक्षा जास्त अंतर तब्बल ३५ ते ४० अंशांत बस चालवून प्रवाशांचे प्राण वाचवले. या वेळी बसमध्ये २० ते २५ विद्यार्थी अन्य काही प्रवाशांनी एकच गोंधळ केल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. मात्र, बस याेग्य पद्धतीने थांबल्यानंतर मात्र सर्वांनी खाली उतरून बसचालक नामदेव पाटील यांचे आभार मानले.
पोलिस अधिकारी अन् कर्मचाऱ्यांचाही सत्कार
तहसीलदार चंद्रकांत देवगुणे यांच्या हस्ते बसचालकासह पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी जामनेर युथ फाउंडेशनचे पदाधिकारी उदय पाटील, किशोर महाजन, डॉ. आशिष वाघ, जितेंद्र पाटील, जिल्हा परिषद सदस्य नामदेव मंगरुळे, गजानन पाटील, जे.पी.पाटील, सुहास चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.
पाच हजारांचे बक्षीस
अपघात होऊ नये म्हणून बसचालकाने केलेला प्रयत्न गौरवास्पद असल्याचे सांगून, अशा व्यक्तींचे मनोधैर्य वाढवणे हे आपले कर्तव्य असल्याचे मत पाटील मोटर्सचे संचालक जितेंद्र पाटील यांनी व्यक्त केले. आणि त्यासाठीच पाटील मोटर्सतर्फे बसचालक पाटील यांना पाच हजर रुपयांचा बक्षिसाचा धनादेश सुपूर्द करण्या आला.

दुसऱ्यांदा बचावले विद्यार्थी
गुरुवारी बस रस्त्याच्या खाली कडेने जाऊन मोठा अपघात टळला. या घटनेत बसमधील २० ते २५ विद्यार्थ्यांसह अन्य प्रवासी बचावले. काही दिवसांपूर्वी जामनेर तहसील कार्यालयासमोर डंपरने धडक दिल्याने विजेचा खांब वाकून तारा बसच्या खिडकीपर्यंत खाली आल्या होत्या. त्या वेळीदेखील बसमधील ४० ते ५० विद्यार्थी थोडक्यात बचावले होते.
बस चालकाचा गौरव
नवर्षाच्या प्रारंभी अर्थात गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजेदरम्यान बसचा अपघात झाल्याची माहिती मिळताच, काही पोलिस पत्रकारांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. प्रत्यक्ष परिस्थिती पाहून बस उलटली कशी नाही? हाच प्रश्न या वेळी प्रत्येकाला पडला. या वेळी बसचालक नामदेव पाटील यांनी कथन केलेला स्वानुभव शहारे आणणारा होता.
हा प्रकार पाहता जामनेर यूथ फाउंडेशनतर्फे बसचालक नामदेव पाटील यांचा यथोचित सत्कार केला. त्याचबरोबर जामनेर शहरातील अतिक्रमण काढून वाहतुकीला बऱ्यापैकी शिस्त लावण्याचा केलेला प्रयत्न शहरातील रोडरोमियोंना धडा शिकवण्यासाठी उचललेले पाऊल पाहता पोलिस निरीक्षक रफीक शेख, सहायक पोलिस निरीक्षक वैशाली पवार लेडी कॉन्स्टेबल मंजुळा तिवारी यांचाही या वेळी जामनेर येथील यूथ फाउंडेशनतर्फे सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास माेठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.