आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जलप्रकल्पांची स्थिती चिंताजनकच

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - पावसाळ्यातील सुरुवातीचे दोन नक्षत्र कोरडे गेल्यामुळे जिल्ह्यात दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर गेल्या 15 दिवसांपासून सर्वत्र पावसाने बर्‍यापैकी हजेरी लावली आहे. या पावसामुळे जलाशयातील जलपातळीत काही प्रमाणात वाढ झाली असली तरी परिस्थिती अद्यापही चिंताजनक असल्याची माहिती पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली आहे. दमदार पावसाअभावी प्रकल्पात पुरेसा साठा झाला नसल्याचे मत काही अधिकार्‍यांकडून व्यक्त करण्यात आले. जोरदार पाऊस झाल्यास जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये जलसाठा वाढू शकतो.

पावसाळ्याच्या सुरुवातीचे मृग, आद्र्रा नक्षत्र जवळपास कोरडी गेल्याने जिल्ह्यात पेरणीची कामे तर खोळंबली होतीच; परंतु वाढत्या तापमानामुळे आणि उन्हाच्या तीव्रतेमुळे जिल्ह्यात असलेल्या विविध जलप्रकल्पांतील पाण्याने तळ गाठला होता. अनेक प्रकल्पात केवळ मृतसाठा शिल्लक राहिला होता. त्यामुळे पुढे चांगला पाऊस न झाल्यास जिल्ह्यात भीषण पाणीटंचाईची समस्या निर्माण होण्याचा धोका निर्माण झाला होता; परंतु गेल्या 15 ते 20 दिवसापांसून जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाने बर्‍यापैकी हजेरी लावली आहे. जिल्ह्यातील तापी वगळता इतर कोणत्याही नदीला अद्याप पूर आलेला नसला तरी सतत पडणार्‍या पावसामुळे जमिनीतील उष्णता कमी होऊन जलपातळीत काही प्रमाणात वाढ झाली आहे. त्याचा फायदा विहिरींना होत आहे. रिमझिम पडणार्‍या पावसामुळे पेरणीची कामे आटोपली असली तरीदेखील बागायती शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी आवश्यक जलसाठा जिल्ह्यातील प्रकल्पात अद्याप झाला नसल्याने चिंता कायम आहे. जिल्ह्यातील काही मोठे प्रकल्प हे साक्री तालुक्यात आहेत; परंतु दरवर्षी सर्वाधिक पाऊस पडणार्‍या साक्री तालुक्यात यंदा सर्वात कमी पावसाची नोंद आजपर्यंत झाली आहे. तर दुष्काळी म्हणून ओळखल्या जाणार्‍या शिंदखेडा तालुक्यात चांगल्या पावसाची नोंद झाली आहे. पांझरा, मालनगाव, जामखेडी आदी मोठे प्रकल्प हे पांझरा, बुराई नदीवर असून या परिसरात पुरेसा पाऊस नसल्याने, प्रकल्पातही पाहिजे त्या प्रमाणात जलसाठा झालेला नाही. भविष्यात प्रकल्प पूर्ण क्षमतेने न भरल्यास फेब्रुवारीपासूनच जिल्ह्यातील अनेक गावांना पाणीटंचाईची समस्या जाणवण्याची शक्यता नाकारता येत नाही.
नकाणे तलाव कोरडाच, डेडरगावमध्ये 50 टक्के साठा

जिल्ह्याप्रमाणेच धुळे शहराला पाणीपुरवठा करणारा प्रमुख स्रोत नकाणे तलावात केवळ 12 ते 15 एमटीएफसी जलसाठा झाला असला तरी पाटबंधारे विभागाकडून तलाव कोरडाच असल्याची माहिती देण्यात आली आहे. डेडरगाव तलावात 120 एमसीएफटी क्षमतेपैकी 57 एमसीएफटी जलसाठा झाला आहे. नकाणे तलावाच्या गेट दुरुस्तीमुळे सध्या हरणमाळ तलावातून शहरातील पाणीपुरवठा केला जात आहे. त्यात 250 एमटीएफसी जलसाठा उपलब्ध असल्याची माहिती महापालिका पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे.
जिल्ह्यात सरासरी 40 टक्के पाऊस - जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या 40 टक्के पावसाची नोंद झाली आहे. त्यात धुळे तालुक्यात सरासरी 556.50 मि.मी. पैकी 222 मि.मी. पाऊस म्हणजे 40 टक्के, साक्री तालुक्यात सरासरीच्या 411 मि.मी. पैकी 139 म्हणजे 33.81 टक्के, शिरपूर तालुक्यात सरासरीच्या 646 मि.मी.पैकी 211 म्हणजे 32.66 टक्के आणि शिंदखेडा तालुक्यात सरासरी 508 मि.मी. पैकी 260 मि.मी. म्हणजे सर्वाधिक 51.18 टक्के पावसाची नोंद 31 जुलैपर्यंत झालेली आहे. जिल्ह्याच्या एकूण सरासरी 2121 मि.मी. पावसापैकी आतापर्यंत 832 म्हणजे 39.22 मि.मी. टक्के पावसाची नोंद झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात केवळ पाच टक्के पावसाची नोंद जिल्ह्यात झाली आहे.