आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Drought Has Effected Banana Producers In Jalgaon River

खान्देशच्या केळीचे आगर दुष्काळाने करपले!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भडगाव- भडगाव. कवी केशवसुतांचा परीसस्पर्श लाभलेलं गाव. इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत त्यांनी नोकरी केली; इथल्याच वास्तव्यात त्यांनी गिरणा नदीच्या खडकांनाही शब्दांचा साज चढवला अन् अनेक अमूर्त भावनांना शब्दरूपांत अमरत्व दिले. गिरणाकाठचं वैभव अनुभवणारे भडगाव खेड्यात गणले जायचे. चार वर्षांपूर्वी ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपालिकेत झाले. मात्र, आजही ना शहर ना खेडे अशी इथली अवस्था आहे. खान्देशच्या जीवनदायिनी गिरणा काठावर भडगाव शहर वसलेले असले तरी नदीपात्र आज थेंबभर पाण्यासाठी काकुळतीला आले आहे. साधारण 12 वर्षांपूर्वी 11 कोटींच्या पाणीपुरवठा योजनेसाठी कागदी घोडे नाचवले गेले, सुजल निर्माण योजनेंतर्गत 12 कोटींची योजना नव्याने मंजूर झाली अन् 76 लाखांचा निधी ऐन टंचाईच्या काळात पालिकेच्या तिजोरीत असताना पाण्यासाठी संघर्ष पेटण्याची वेळ येऊन ठेपली.

‘भडगाव शहर शे का खेडं; हाईच लई मोठं कोडं शे’ असं सांगत आत्माराम मोरे यांनी भावनांना वाट मोकळी करून दिली. 15 दिवसांनी गढूळ पाणीपुरवठा होत असल्याने दवाखाने फुल्ल झालेले आहेत. इतकेच नव्हे, तर 70 टक्के लोकांना किडनी स्टोनने ग्रासले आहे. ‘अहो साहेब, भडगावमा धो-धो पानी देखाले गच्ची टाइम व्हयना... संकटमा देव पानीमा ठेवाले बी घरमा पानी नई र्‍हास...’ असं इथल्या महिला संतापानं सांगू लागल्या. यशवंतनगर भागात भडगावची निम्मी लोकसंख्या असून 18 पैकी सात वॉर्ड याच प्रभागात आहेत. मात्र, या भागातील नागरिकांना कायम पाणीटंचाईला सामोरे जावे लागतेय. दुष्काळामुळे हाताला काम नसल्याने शेकडो कुटुंब स्थलांतरित झाले आहेत. हातावर पोट भरणार्‍यांची दुष्काळामुळे होणारी घुसमट पाहिली की पोटात गोळा उभा राहतो, असे सांगत असताना ज्येष्ठ नागरिक पंढरीनाथ पवार यांनी 1972 मध्ये पडलेल्या दुष्काळापेक्षा यंदाच्या दुष्काळाचे चटके अधिक तीव्र असल्याचे सांगितले. यशवंत नगरात पाण्याच्या टाकीवर चढून पाणी भरण्यासाठी चार-पाच मुले धडपडत होती. टाकीच्या स्लॅबवर सांडलेल्या पाण्यावर त्यांचा डोळा होता. 35 हजार लिटरची टाकी पूर्ण क्षमतेने भरत नाही; पण या टाकीवर पहाटेपासूनच रांग असते. उज्ज्वल कॉलनी, भोईवाडा, शिवाजीनगर, महालक्ष्मी कॉलनी, बाळद रोड, भागवत कॉलनी हा भाग तर टंचाईने होरपळून निघतोय. खासगी टँकर पोहोचायच्या आतच शेकडो हंडे, बादल्या रांगेत उभ्या राहतात. नंबर लावण्यावरून एकमेकांची गचांडी अशी धरली जाते की, शर्टाचे बटन कधी तुटले ते दोघांनी कळत नाही, हे आता नित्याचेच झालेले. शहराला सध्या गिरणा पात्रातील दोन विहिरींवरून पाणीपुरवठा होतो; त्या विहिरीही आता तळ गाठू लागल्या आहेत. नगरपालिकेने दोन महिन्यांपूर्वी 12 लाख रुपये खर्च करून गिरणा पात्रात कच्चा बंधारा बांधला, मात्र बंधार्‍यातील पाण्याने दोन आठवडेही गावाची तहान भागवली नाही.

सद्य:स्थितीत शहरातील सर्वच वस्त्यांमध्ये 30-35 टॅँकरद्वारे पाणी पुरवले जाते. चार हजार लिटरचा टँकर 800 रुपयांत मिळतो. विकासाचे गाजर दाखवून भडगावची थट्टा चालवली जात असून शासनाने पाणीपुरवठा योजनेसाठी भरघोस निधी द्यावा, अशी माफक अपेक्षा करीत मंगा पाटील म्हणाले, ‘सरकारनी भडगाव तालुकामा दुष्काय जाहीर करीसनबी चारा छावणी लायेल नई, हायीच या शहरनी बोंब शे, अधिकारीसना डोयावर पट्टी शे, त्यासले म्हनीसनच दुष्काय दिसत नई’, भडगाव शहराला लागून असलेलं शेतशिवारातही दुष्काळानं करपलंय; जवळपास 200 हेक्टर क्षेत्र आज ओसाड पडले आहे.

जळगाव जिल्ह्यातील केळीचे आगर असलेल्या भडगाव तालुक्यातील केळी उत्पादक शेतकरी कर्जाचा डोंगर डोईजड झाल्याने वैफल्यग्रस्त अवस्थेत सापडला आहे. 28 हजार हेक्टर क्षेत्रावर केळीची लागवड झाली होती. 80 टक्के केळीच्या बागा पाण्याअभावी करपल्या आहेत. दिल्ली, मुंबईकडे जाणारी केळीची जावक थांबली. भडगाव तालुक्यातील बात्सर, वडधे, वाक, गिरड, अंतुर्ली, विचर्डे, कोळगाव, खेडगाव, गुढे, वाडे, कजगाव, कोठली, निंभोरा, कनाशी आदी गावांत गिरणेच्या कृपेमुळे येणारे भरगच्च व कसदार केळीचे खोड आता पाण्यामुळे बेबस झाले आहे, असे प्रगतिशील शेतकरी गणेश परदेशी यांनी सांगितले. वाक येथील पांडुरंग पाटील यांनी तीन एकरांत केळीची पाच हजार झाडे लावली होती. एकरी 70 हजार रुपये खर्च केला. मात्र, हा सर्व खर्च वाया गेला आहे. गणेश पाटील यांनी दोन हजार रुपयांत केळीचे एक हजार खोड घेतले होते. साधारण आठ लाखांपर्यंत उत्पन्न मिळालेही असते, परंतु आता तर लागवडीचा खर्चही निघणार नाही.

ग्रामस्थांची तहान भागवली

भडगावातील राजेंद्र पाटील यांची 20 एकरांवर केळीची बाग आहे. मात्र, दुष्काळाच्या वरवंट्यामुळे ती भुईसपाट झाली. तरीही खचून न जाता सामाजिक बांधिलकी जपत पाटील यांनी शेतातील विहिरीचे पाणी भडगावकरांसाठी खुले केले. पालिकेची मोटार 12 तास उपसा करत असून दररोज जवळपास 40 हजार लिटर पाणी ग्रामस्थांना मिळत आहे.

भट्टगाव झाले भडगाव

कवी केशवसुत 1897 ते 1901 दरम्यान येथे वास्तव्यास होते. गिरणापात्रातील खडकांवर बसून ते कविता लिहीत असत. इथे केशवसुतांचा व राणी लाडकुबाईचा वाडा आहे. भडगावचे नाव पूर्वी भट्टगाव होते. येथे भटांचे वास्तव्य असल्याने भट्टगाव असे म्हटले जायचे, नंतर त्याचा भडगाव असा अपभ्रंश झाला.

केळी लागवडीत घट

दुष्काळामुळे भडगाव तालुक्यात केळीची लागवड मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. मागील वर्षापर्यंत केळी लागवड क्षेत्र 28 हजार हेक्टर होती, यंदा फक्त दोन हजार हेक्टरवर केळी आहे. 10 टक्के क्षेत्रात केळीऐवजी अन्य पीक, तर 15 टक्के क्षेत्र ओस पडले आहे. हातगाडीधारक केळी विक्रेत्यांनाही मोठा फटका बसला असून बाजारात सद्य:स्थितीत चांगल्या प्रतीची केळी मिळत नाही.