आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दुष्काळानं धोपटलं, राजकारणानं भेदरलं..!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - शहरातल्या टंचाईवर नेहमीच चर्चा होते, पण ग्रामीण भागांत काय स्थिती आहे हे पाहण्यासाठी लळिंगपासून सडगाव रस्त्याने पुढे गेलो. कडक ऊन, रखरखलेला आसमंत आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूस भेगाळलेली शेतजमीन पाहून ‘गौतम गोविंदा’ या जुन्या हिंदी चित्रपटाची आठवण झाली. दिवाण माळ, जुन्नेरच्या पाण्याचा हालहवाल घेत मोरशेवडी गाठली. एकीकडे निसर्गानं लोकांच्या तोंडचं पाणी पळवलेलं असतानाच दुस-या बाजूला जेवढं काही पाणी पिण्यासाठी उपलब्ध आहे तेदेखील राजकाणामुळे गावक-यांच्या तोंडी लागत नाही याचा प्रत्यय मोरशेवडीत आला.

ग्रामपंचायतीच्या राजकारणाची धग काळीज कसं होरपळून काढतं त्याची दाहकता जशी इथे अनुभवायला मिळाली तसंच होरपळलेल्या मनांना आणि कोमेजलेल्या चेह-यांना 20 दिवसांआड थोडेफार का होत नाही, परंतु त्या मिळालेल्या पाण्याचं किती अप्रूप असतं हे पाहताना पुरता हेलावलो.

सडगाव आणि आठ गाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या व्हॉल्व्हच्या ठिकाणी साचलेल्या डबक्यात बक-यांना पाणी पाजण्यासाठी आलेल्या सत्तरीतल्या कमलबाई वडार यांचा फोटो काढला. त्या वेळी त्या म्हणाल्या, ‘फोटू काम्हून काढू राहिला रे भाऊ?’ मी म्हणालो, ‘आपल्या गावात दुष्काळ, पाणीटंचाई आहे, त्याची बातमी द्यायची आहे.’ त्यावर कमलबाई म्हणाल्या, ‘फोटू काढ, काहीबी कर.... पण पाणी दे भाऊ, माणसांसले नही, तठे जनावरसले कोठे पाणी भेटावशे?’ असे सांगत तिने मोरशेवडीतल्या दुष्काळाचे चटके ऐकवायला सुरुवात केली.

या गळक्या व्हॉल्व्हजवळून मोरशेवडीतली घरे टंचाईमुळे चांगलीच होरपळलेली दिसली. गावाच्या सुरुवातीला दोन घरांच्या रांगेत एका मोकळ्या जागेत पाण्याचे हंडे, कळशा, बादल्या आणि ड्रम पडलेले होते. हाक दिली तेव्हा कोणीतरी सरकारी साहेब आल्याचे वाटून महिलांनी घरात धाव घेतली. काही तरुणांनी माझी उलटतपासणी घेतली अन् पेपरवाला असल्याचे कळताच त्यांच्यातील काही कार्यकर्त्यांनी महिलांना बोलावून आणले. पाण्यासाठी काय त्रास सहन करावा लागतो हे सांगण्यास सांगितले. तरीही महिला भेदरलेल्या. त्या काहीच बोलल्या नाहीत. एकंदरीत या गावात पाण्यावरून पेटलेल्या राजकारणात लोक कसे होरपळून निघत आहेत याची पुरेशी कल्पना आली. मात्र, काही तरुणांनी हत्तीचं बळ एकवटून धीटपणे बोलण्याचा प्रयत्न केला.

भिलाटीतल्या एका शेतात 40 फुटांपेक्षा अधिक खोली असलेल्या दगडी विहिरीत जेमतेम तीन फुटांपर्यंत अन् तेही दूषित पाणी होते. तेलाच्या रिकाम्या डब्यांना दोरी बांधून महिलांसह शाळकरी मुलं पाणी काढत होती. इथं ढगूबाई पाटील यांना बोलतं केलं तेव्हा लक्षात आलं की, गावात 15 दिवसाला पाणीपुरवठा होतो. पाण्यासाठी महिलांनाच वणवण करावी लागते. गावात एकच विहीर आहे. तेथे प्रचंड गर्दी उसळत असल्याने दिवस-रात्र न पाहता पाणी भरावे लागते.

टंचाईच्या झळा सोसून गाव पुरता गलितगात्र
इथल्या जलकुंभाजवळ बोलत बसलेल्या काही मंडळींसोबत बोलत राहिलो तेव्हा पाणीटंचाईच्या झळा सोसून हा गाव पुरता गलितगात्र झाल्याचं लक्षात आलं. ‘लई कळ काढाव लागतिया.... पर कोण काय नाय करत’ अशी कैफियत त्यांनी मांडली. ‘आम्ही बोललो ते खरंय, पण हे छापू नका. उगाच मुले-सुनांना त्रास होईल,’ असं ते कळकळीनं म्हणाले. तेव्हा इथल्या ग्रामपंचायतीचं राजकारण किती टोकाला गेलंय ते लक्षात आलं. सडगावचे ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग गर्दे हे पाण्यावरून राजकारण करीत असल्यानं तेथून जाणीवपूर्वक कमी दाबानं पाणी सोडलं जातंय. त्यामुळे इथला जलकुंभ भरत नाही अन् गावक-यांना प्यायलादेखील पुरेसं पाणी मिळत नाही. शामराव पाटलांनी तर थेट गर्देंवर तोफ डागली. ठेकेदाराने या ठिकाणी येऊन जलकुंभ भरून दाखवावे, असं आव्हानदेखील दिलं.

पाणीटंचाईचा प्रश्न
आज ना उद्या सुटंल
येथून पुढे मोरशेवडीत दोन वेळा फेरफटका मारला. प्रत्येकाच्या दारासमोर बैलगाडीवर प्लास्टिकचा ड्रम, भांडी होतीच. काही महिला पापड लाटत होत्या. त्यांना पाण्याविषयी बोलतं करण्याचा प्रयत्न केला, परंतु कोणीतरी अनोळखी लोक गावात फिरतात अशा संशयाने त्या पाहत राहिल्या. दिवाण मळा, मोरशेवडी, जुन्नेर ही दूध उत्पादक गावे म्हणून प्रसिद्ध आहेत. गावात दीड हजार दुधाळ जनावरे आहेत. साधारणपणे 4800 लिटर दूध उत्पादन होते. गवळी, बंजारा आणि आदिवासी समाजाची लोकसंख्या अधिक आहे. कोणाच्याही अध्यात-मध्यात नसलेले गावकरी पाणीटंचाईचा प्रश्न आज ना उद्या सुटेल, विकासाची पहाट उगवेल याची वाट पाहत जीवन जगत आहेत.