आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Drought In Maharashtra Due To Corruption Says Rajendra Sinh

भ्रष्टाचारामुळेच महाराष्ट्राला जलदारिद्र्य : राजेंद्रसिंह

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - दोन-तीन जणांचा अपवाद वगळता आजवर देशाचे कृषिमंत्री महाराष्ट्रातीलच होते. त्यांनी पाण्यासारखा पैसा ओतून तब्बल 40 टक्के जलप्रकल्प एकट्या महाराष्ट्रात आणले. परंतु पाण्यातील भ्रष्टाचारामुळे येथील जलदारिद्र्र्य कायमच राहिले, असे मत प्रसिद्ध जलतज्ज्ञ व मॅगसेसे पुरस्कार विजेते राजेंद्रसिंह यांनी मंगळवारी व्यक्त केले.जळगावातील पाणी परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

अध्यक्षस्थानी खासदार ईश्वरलाल जैन होते. खासदार हरिभाऊ जावळे, महापौर किशोर पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती. देशात पाण्यावर सर्वाधिक पैसा महाराष्ट्रात खर्च करण्यात आला आहे. 40 टक्के धरणे महाराष्ट्रात असूनही जलसंधारणात अपेक्षित यश मिळाले नाही. यापुढे इतिहास, भौगोलिक, सामाजिक स्थिती विचारात घेता जलसंधारणाची कामे करणे शक्य आहे. जुने जलाशय शोधून त्यांच्या सीमा निश्चितीचे, पुनरुज्जीवनाचे काम प्रशासनाने हाती घेण्याची सूचनाही राजेंद्रसिंह यांनी केली.

शॉर्ट टर्म प्लॅन हवा : जावळे
जिल्ह्यात प्रस्तावित मेगा रिचार्ज प्रकल्पासाठी केंद्रीय समितीने कमी वेळेत पूर्ण होऊ शकणारा प्लॅन तयार करावा. जलसंधारणाच्या केंद्रीय समितीमध्ये जलतज्ज्ञांमध्येच एकमत नसल्याने प्रकल्पांवर वर्षानुवर्षे कामे चालतात. जळगावच्या मेगा रिचार्ज प्रकल्पासाठी राजेंद्रसिंह यांनी प्रयत्न करून कमी वेळेचा अ‍ॅक्शन प्लॅन द्यावा, पाच वर्षांत पूर्ण होत नसलेला प्रकल्प देऊ नये. केंद्राकडे पाठपुरावा करून जिल्हा परिषदेला 35 कोटी रुपये मंजूर करून दिले. मात्र, यापूर्वी मिळवून दिलेले 18 कोटी खर्च न झाल्यामुळे नवीन निधीची अडचण येत आहे. यंत्रणा गांभीर्याने काम करीत नसल्याचे खासदार जावळे म्हणाले.

तुम्ही पाणीदार झाल्यास गावही होईल
राजस्थानात केलेल्या जलसंधारणाच्या कामांचा दाखला देत राजेंद्रसिंह यांनी राज्यात जलसमृद्धी आणण्यासाठी करावयाच्या तांत्रिक, तात्त्विक आणि आध्यात्मिक बाबी उलडगल्या. भ्रष्टाचारामुळे नद्यांचे नाल्यात रूपांतर झाले. कायद्याने भ्रष्टाचार थांबणार नाही. त्यावर सदाचार हाच मार्ग आहे. तुमचे गाव पाणीदार व्हायचे असेल तर आधी तुम्ही पाणीदार व्हा, असे आवाहनही त्यांनी केले.