आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Drought Relief Fund Given To Rich Students By NCP

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अजब कारभारः राष्ट्रवादीचा दुष्काळ निधी श्रीमंतांच्या मुलांना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- राष्ट्रवादीने दुष्काळग्रस्त सहायता अभियानांतर्गत दुष्काळाची झळ पोहचलेल्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करणार असल्याचा राज्यभर प्रचार केला. प्रत्यक्षात दुष्काळग्रस्त, गरजू विद्यार्थ्यांना डावलून पक्षाने श्रीमंतांच्या मुलांना दोन हजाराचा 'पॅकेटमनी' दिला आहे. पक्षाने प्रसिद्ध केलेल्या यादीतील अनेक विद्यार्थ्यांच्या पालकांचे उत्पन्न दोन लाखापेक्षा जास्त आहे. मदत घेणारे बहुतांश विद्यार्थी शहरातील मोठय़ा श्रीमंताचे पाल्य असल्याने राष्ट्रवादीच्या राजकीय दुष्काळाचा रंग पुढे आला आहे.

चालून आलेल्या दुष्काळाचे भांडवल केल्याने राष्ट्रवादीचे अभियान पहिल्या दिवसापासून वादग्रस्त ठरले आहे. याच अभियानाचा भाग असलेल्या विद्यार्थी सहायता निधी हा राजकीय स्टंट ठरला आहे. याच उपक्रमातून शहरातील जी.एच. रायसोनी इन्स्टिट्यूटमध्ये एकूण 25 विद्यार्थ्यांना मदतीचे धनादेश देण्यात आले. त्यातील किमान 9 विद्यार्थ्यांचे पालक हे शहरातील नामांकित श्रीमंत आहेत. मदत मिळणारे सर्वच विद्यार्थी हे खुल्या प्रवर्गातील असून शासकीय निकषाप्रमाणे त्यांच्या पालकांचे उत्पन्न हे एक लाखापेक्षा अधिक आहे. दुष्काळाची झळ बसलेल्या विद्यार्थ्यांऐवजी धनदांडग्यांच्या पाल्यांना मदत केली जात असल्याने पक्षाच्या अभियानाविषयी आणि उद्देशाविषयी शंका येणे स्वाभाविक आहे. त्याबाबत पदाधिकार्‍यांना विचारले असताना हा निकष पक्षाच्या वरिष्ठांनीच ठरविल्याने हा राजकीय स्टंट असल्याची खात्री देखील पटते.

जबाबदारी ढकलली

पक्षाच्या राजकीय भांडवलाची चर्चा सुरू होताच पक्षाने ही जबाबदारी संबंधित महाविद्यालये आणि विद्यापीठावर ढकलली आे. त्यांनी दुष्काळग्रस्तांऐवजी दुसरीच यादी दिली असल्याचा दावा पक्षाच्या जिल्हाध्यक्षांनी केला आहे तर आम्ही पक्षाला नव्हे तर विद्यापीठाला यादी दिल्याचे स्पष्टीकरण महाविद्यालयाकडून देण्यात आले आहे.दरम्यान, महाविद्यालयांमध्ये अर्ज भरून घेण्यात आल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.विद्यापीठ, कॉलेजची चूक
दुष्काळग्रस्त गावांमधील पदव्युत्तर शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांची यादी आम्ही विद्यापीठ अणि महाविद्यालयांकडे मागितली होती. या यादीत श्रीमंतांच्या मुलांचा समावेश असेल तर ती चूक विद्यापीठ आणि महाविद्यालयांची आहे. आम्ही खात्री केली नाही हे मी मान्य करतो, परंतु ही पद्धत पक्षाच्या वरिष्ठांनीच ठरविली होती. गफफार मलिक, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी

विद्यापीठाने मागितलेली सर्वच विद्यार्थ्यांची यादी आम्ही विद्यापीठाला दिली. पक्षाने आमच्याकडे मागणी केली नव्हती. मदत देण्याचा त्यांचा प्रस्ताव होता. मदत राष्ट्रवादीकडून दिली गेल्याने सर्वच अधिकार त्यांचे होते. यादी देखील तेच घेऊन आले होते.
प्रभाकर भट, प्राचार्य, रायसोनी इन्स्टिट्यूट

विद्यार्थी म्हणतात
कॉलेजमध्ये फॉर्म भरून घेण्यात आले. खुल्या प्रवर्गातील सर्व विद्यार्थ्यांनी इंटरनेटवरही फॉर्म भरले. त्यात खाते क्रमांक आणि स्वत:विषयी माहिती होती. तुम्हाला स्कॉलरशिप मिळणार आहे, असे सांगण्यात आले होते. या वेळी खरंच पैशांची गरज आहे का? याबाबत विचारणा केली नाही, अर्ज भरा असे सांगितले होते. त्यानुसार चेक मिळाले पण, ते वटले नाही. जिमीकुमार गांधी, वसुंधरा रावलानी, अमित अग्रवाल, सिंधू लखवानी, सर्व एमबीए विद्यार्थी

वादग्रस्त बाबी
> शहरातील धनदांडग्यांच्या पाल्यांना लाभ.
> खरे दुष्काळग्रस्त विद्यार्थी वंचित.
> प्रत्यक्ष माहिती न घेता महाविद्यालयांच्या याद्या ठेवल्या कायम.
> मदत दिलेल्या विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थितीची पडताळणी केली नाही.
> केवळ पदव्युत्तर असलेल्यांचाच केला समावेश.