आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘डीआरटी’ची सुनावणी लांबणीवर; पालिकेला पुन्हा दिलासा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- ‘हुडको’च्या दाव्याचा निकाल सोमवारी लागणार म्हणून जीव टांगणीला लागलेल्या महापालिकेला पुन्हा महिनाभराचा दिलासा मिळाला आहे. न्यायाधीश रजेवर गेल्याने सुनावणी होऊ शकली नाही. त्यामुळे आज द्यावयाचे देणे आता लांबणीवर पडले आहे. दरम्यान, मंत्रालयातील बैठकीतून तोडगा निघू शकेल, ज्यामुळे महापालिका ठोस उत्तर देऊ शकेल, असे प्रशासनाला वाटत आहे. त्यामुळे 20 फेब्रुवारी रोजीच्या बैठकीतील चर्चेवर मोठय़ा अपेक्षा आहेत.

हुडको संस्थेतर्फे महापालिकेला दिलेल्या कर्जाच्या परतफेडीपोटी 130 कोटी रुपये अदा करावे, असा निकाल डीआरटी कोर्टाने दिला होता. त्यावर महापालिकेतर्फे 9 जानेवारी रोजी पुरवणी प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले. त्यात म्हणणे मांडण्यास उशीर का झाला, याची कारणे नमूद करण्यात आली होती. प्रतिज्ञापत्राद्वारे मांडलेल्या मुद्द्यांवर डीआरटी कोर्टाने सामनेवाला यांचा खुलासा मागवावा, अशी विनंती महापालिकेतर्फे करण्यात आली. त्या संदर्भात अंतिम निकाल 4 फेब्रुवारी रोजी देण्यात येणार होता. परंतु सोमवारी न्यायाधीश रजेवर असल्याने पुढील सुनावणी 7 मार्च रोजी होणार आहे.

‘हुडको’चे देणे लांबले
तत्कालीन पालिकेने विकासकामांच्या नावाने ‘हुडको’कडून कर्ज घेतले होते. त्याची परतफेड न झाल्याने कर्ज 130 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. या कर्जाची परतफेड कशी व केव्हा करणार, याचे उत्तर महापालिकेला द्यावे लागणार आहे. त्यावर सोमवारी अंतिम निर्णय होण्याची अपेक्षा होती; परंतु सुनावणीच लांबल्याने आता महापालिकेला भरायची रक्कम उद्यावर लोटली आहे.

मंत्रालयातील बैठकीवर आशा
डीआरटी कोर्टाची सुनावणी लांबली असली तरी महापालिकेकडे आजच ‘हुडको’ची रक्कम भरण्यासाठी मोठी रक्कम नाही. गाळेधारकांकडून मिळणार्‍या पैशातूनच कर्जाची रक्कम अदा होणार आहे. त्यामुळे एकमेव साधन उपलब्ध असलेल्या व्यापारी संकुलासंदर्भात मंत्रालयात 20 फेब्रुवारी रोजी होणार्‍या बैठकीतून काही तरी निष्पन्न होईल व महापालिकेवरील संकट दूर लोटले जाईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.