आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

.. आता मद्यधुंद वाहनचालकांचे परवाने होणार रद्द

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- मद्यपान करून वाहन चालवल्यास पोलिस कारवाई करून चालकाला सोडून देत असत. तथापि, यापुढे मद्यधुंद वाहनचालकाला पोलिस दंड घेऊन सोडून देतील; मात्र त्यानंतर त्या चालकाचा अहवाल आरटीओ कार्यालयात पाठवून काही दिवसांसाठी त्याचा परवाना रद्द करण्याची मागणी करण्यात येणार आहे. शहर वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक रामकृष्ण भोसले यांचा यासंदर्भातील अहवाल येत्या दोन-तीन दिवसांत आरटीओंकडे पाठवण्यात येईल.

हल्ली दारू पिऊन वाहन चालवणार्‍यांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे अशा वाहनचालकांवर कारवाई सुरू आहे. तसेच दंडात्मक कारवाईनंतरही हे प्रमाण कमी होत नसल्यामुळे पोलिस प्रशासनाने आता कठोर भूमिका घेतली आहे. 31 डिसेंबर व नुकत्याच झालेल्या वाहतूक सुरक्षा पंधरवड्यातही ‘ड्रंक अँण्ड ड्राइव्ह’विरुद्ध कारवाई केली जात होती. यापुढे कारवाई झालेल्या वाहनचालकांचा अहवाल आरटीओंकडे पाठवून त्यांचे परवाने रद्द करण्याची शिफारस केली जाणार आहे.

अपघातांच्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे आता ‘ड्रंक अँण्ड ड्राइव्ह’च्या केसेसमध्ये परवाने रद्द करण्याची मागणी आरटीओंकडे करण्यात येणार आहे. तशी यादी लवकरच आरटीओंकडे पाठवण्यात येणार आहे. रामकृष्ण भोसले, पोलिस निरीक्षक, वाहतूक शाखा

फॅन्सी क्रमांकाच्या विरोधातही मोहीम
शहरात अनेक दुचाकी व चारचाकी वाहनांवर फॅन्सी व नियमबाह्य नंबरप्लेट आहेत. त्यामुळे वाहनाचा क्रमांक लक्षात येत नाही. त्यातच सोनसाखळीचोरीच्या घटनाही वाढल्या आहेत. दुचाकीवरून येऊन सोनसाखळी ओढून पळणार्‍या चोरट्यांच्या वाहनांचा क्रमांकही अद्याप कुणाच्या निदर्शनास आलेला नाही. कदाचित या वाहनांवर विचित्र नंबर असेल किंवा कोरी नंबरप्लेट लावली जात असल्याचा पोलिसांचा दावा आहे. त्यामुळे आता फॅन्सी क्रमांकाच्या नंबरप्लेट लावणार्‍यांविरुद्धही कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

दुचाकीवर दोनच शाळकरी विद्यार्थी
शाळेत पोहोचवण्यासाठी अनेक पालक एका दुचाकीवर तीन-चार विद्यार्थ्यांना घेऊन जातात; मात्र यापुढे शहरात एका दुचाकीवर दोनच विद्यार्थ्यांना घेऊन प्रवास करता येणार आहे. त्यापेक्षा जास्त विद्यार्थी असल्यास दुचाकीस्वाराविरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे.

परवाना काही दिवसांसाठी होणार रद्द
पोलिसांनी ‘ड्रंक अँण्ड ड्राइव्ह’च्या केसेस केल्यानंतर न्यायालयात दंड भरला जातो. त्यानंतर विभागीय कारवाई होऊ शकते. या कारवाईत उपविभागीय परिवहन अधिकारी परवाना किंवा नोंदणी काही दिवसांसाठी रद्द करू शकतात.

पोलिसांकडून येणार्‍या अहवालावर तत्काळ कार्यवाही करण्यात येईल. मद्यपी चालकांचे परवाने किंवा नोंदणी 15 दिवस ते तीन महिन्यांपर्यंत रद्द करण्याची कारवाई होऊ शकते. सुभाष वारे, उपविभागीय परिवहन अधिकारी