आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवाजीनगरात दारुड्यांचा धुमाकूळ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - सुटीच्या दिवसाचे औचित्य साधून शिवाजीनगरात राकेश पाटील, विजय आहिरे आणि आसिफ खाजाबा या तिघा दारुड्यांनी दिवसभर धूम स्टाइलने धुमाकूळ घातला. दिवसभरात त्यांनी मुलीची छेड काढणे, लुटण्याच्या प्रयत्नासह दोन जणांवर थेट चाकूहल्ला केला. रात्री 8 वाजता त्या मद्यधुंद युवकांना शहर पोलिसांनी गजाआड करून खाक्या दाखविताच तिघांची नशा उतरली अन् त्दिवसभरातील धुमाकूळची कबुली दिली.

वेळ दुपारी 4 वाजता : तिघे शिवाजीनगर ते दूध फेडरेशन दरम्यान हिरो होंडा ट्विस्टरवर (क्र. एमएच 19 बीबी 4050) धूम स्टाइलने धुमाकूळ घालत होते. तिघेही नशेत असताना आणखी नशा करण्यासाठी पैशांची व्यवस्था व्हावी म्हणून त्यांनी लूट करण्याची योजना आखली. नगरसेवक संदेश भोईटे यांच्याकडील केबल ऑपरेटर नारायण कोळी रस्त्याने स्कुटीवरून जात होते. तिघांनी त्यांच्या गाडीमागून येऊन त्यांच्या गाडीसमोर गाडी उभी केली. कोळी यांना काही समजण्याच्या आतच तिघांनी त्यांच्या खिशात हात टाकून पैसे व मोबाइल काढून घेतला. पण कोळी यांनी विरोध करीत पैसे आणि मोबाइल पुन्हा ताब्यात घेतला. तितक्यात एकाने चाकूने त्यांच्या पाठीवर एक फूट लांबपर्यंत वार करुन पळ काढला. नागरिकांनी त्यांना सिव्हिलमध्ये दाखल केले.

नशेत तर्र्र होऊन तिघांनी केला चाकूहल्ला अन् काढली मुलींची छेड
वेळ सायंकाळी 6.30 : तिघे जण पुन्हा नशा करून शिवाजीनगरात आले. यावेळी त्यांनी लाकूडपेठ भागातील प्रदीप मोरे यांच्या घरासमोर मैफल रंगवली. मोरे यांच्या घरातील मुलींची छेड काढण्याच्या उद्देशाने त्यांनी मोठमोठय़ाने गप्पा सुरू केल्या. याचवेळी ते मुलीकडे पाहून इशारेही करू लागले. मोरे यांचा 17 वर्षीय मुलगा किरणने घराबाहेर येऊन त्यांना जाब विचारला. त्याचा राग आल्याने पुन्हा तिघांनी किरणला मारहाण सुरू केली. एकाने पुन्हा आपल्याजवळील धारदार शस्त्राने किरणच्या पोटावर वार करीत पुन्हा पळ काढला. किरण रक्ताच्या थारोळ्यात पडला. घरच्यांनी व नागरिकांनी किरणला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले.

वेळ रात्री 7.30 : शहर पोलिस ठाण्याचे शोधपथकाचे कर्मचारी महेंद्र जाणे, प्रीतम पाटील, मिलिंद सोनवणे, अमोल विसपुते, प्रदीप नन्नवरे यांनी नागरिकांच्या मदतीने तिघांची ओळख पटवली. शिवाजीनगर भागातूनच तिघांना दुचाकीसह ताब्यात घेतले. रात्री 8 वाजता उपअधीक्षक प्रशांत बच्छाव शहर पोलिस ठाण्याच्या डीबीरुममध्ये दाखल झाले. तिघा दारुड्यांच्या डोळ्यात नशा अन् रग पाहून पोलिसही संतापले. अखेर पोलिसांनी खाक्या दाखवताच दोन मिनिटात त्यांनी दिवसभर केलेल्या गुन्ह्यांची कबुली दिली.