आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गटबाजीमुळे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष हैराण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - अंतर्गतकलह, टाेकाचा राजकीय संघर्ष, राजकीय महत्त्वाकांक्षेतून जिल्ह्याच्या राजकारणात अंतर्गत गटबाजी वाढीस लागली अाहे. पूर्वी काँग्रेस, शिवसेना या पक्षात गटबाजी दिसत होती अाणि अाता भाजपपाठाेपाठ राष्ट्रवादीतही गटबाजी, मतभेदांचे राजकारण वाढले आहे. त्यातच अागामी निवडणुकीच्या ताेंडावर अाेढवलेल्या परिस्थितीने राष्ट्रवादी हैराण झाली अाहे. पक्षातील ‘जनरेशन गॅप’ हे राजकीय संघर्षाचे प्रमुख कारण मानले जात आहे. भाजपमधील मतभेद पथ्यावर पाडण्याऐवजी राष्ट्रवादीलाच भाजप बनवण्याचे प्रयत्न हाेत असल्याने व्यतीत झालेले जिल्हाध्यक्ष अामदार डाॅ. सतीश पाटील यांनी पक्षीय संघटनात्मक जबाबदारीतून मुक्त हाेण्याचा इशारा पक्षाच्या बैठकीतून दिला अाहे.

जिल्ह्यात राष्ट्रवादीचे सहा अामदार हाेते. परंतु, पक्षात गटबाजी वाढीस लागल्याने सर्वांना घरी बसण्याची वेळ अाली. केवळ एकच अामदार निवडून येऊ शकला. यामुळे माेदी लाट नव्हे तर पक्षातील गटबाजी कारणीभूत असल्याचे विश्लेषण अामदार डाॅ. सतीश पाटील यांनी केले. सोमवारी झालेल्या बैठकीत त्यांनी पक्षात अलीकडच्या काळात शिरकाव केलेल्या ‘जनरेशन नेक्स्ट’चाही उल्लेख केला. नवीन पदाधिकाऱ्यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षा वाढल्या तरी अनुभवी नेत्यांचेही महत्त्व असल्याचे त्यांनी बाेलवून दाखवले.

जिल्ह्यात सध्या भाजपमध्ये भाऊबंदकी वाढीस लागली अाहे. या वादाचा फायदा राष्ट्रवादीने घेण्याची ही वेळ अाहे. परंतु, शेत सुपीक असूनही आपसातील मतभेद - वादांमुळे राष्ट्रवादी पेरणी करू शकत नसल्याची खंत पक्षाच्या श्रेष्ठींनी व्यक्त केली आहे. त्यातच जिल्ह्यात मोठे अस्तित्व नसले तरी परिस्थिती अनुकूल असल्याचे हेरून काँग्रेसने भाजपतील अंतर्गत वाद, भाजप-शिवसेनेतील वाद, राष्ट्रवादीतील मतभेद पथ्यावर पाडून घेण्यासाठी ठाेस कार्यक्रम हाती घेतला अाहे. ते नियाेजन करून अागामी निवडणूकाबाबत रुपरेखा ठरवितांना दिसत अाहे.

अंतर्गत कलहाने राष्ट्रवादी काँग्रेस बेहाल
अामदार डाॅ. सतीश पाटील जिल्हाध्यक्षपदाची धुरा सांभाळत असताना इतर अाजी-माजी अामदार, पदाधिकारी केवळ कार्यक्रमांपुरतेच पक्षाशी जाेडल्याचे चित्र अाहे. अनेक पदाधिकारी पक्षाच्या बैठका, नेत्यांच्या दाैऱ्याशिवाय पक्षाशी संबंध ठेवत नाहीत. जिल्हाध्यक्षांशिवाय वरिष्ठ नेत्यांचे दाैरे, कार्यक्रम आयोजित केले जातात. याच स्थितीत राष्ट्रवादीचे जनरेशन नेक्स्ट स्थानिक पातळीवर जिल्हा कार्यकारिणीपासून चार हात लांब अाहे. राष्ट्रवादी युवकांचा एक गट जिल्हाध्यक्षांच्या विराेधात सक्रिय असल्याने व्यतीत झालेल्या जिल्हाध्यक्षांनी भुसावळचे विजय चाैधरी किंवा माझ्या पुतण्यानेदेखील माझ्याविराेधात निवडणूक लढवली तरी चिंता नसल्याचे सोमवारच्या बैठकीत सांगितले. त्यामुळे पक्षातील अंतर्गत कलह निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुढे अाला अाहे.
बातम्या आणखी आहेत...