आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चोरट्यांची मुजोरी वाढली, तोतया पोलिस १० ताेळ्यांचे सोन्याचे दागिने घेऊन पसार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- दागिना कॉर्नर या सराफा दुकानासमोर बुधवारी दुपारी २.४५ वाजता एक जण कार घेऊन आला... चालकाने गाडीतूनच दुकानदाराला आवाज दिला... नोकर पळत-पळत गाडीजवळ आला... चालकाने मी मुंबई क्राइम ब्रँचचा पोलिस अधिकारी असून, मला दागिने खरेदी करायचे आहेत...
मात्र, मॅडम बाजूच्या गल्लीत उभ्या असल्याचे सांगितले... त्यानंतर दागिने दाखवून आणण्यासाठी नोकराला गाडीत बसवले... काही अंतरावर गेल्यावर खोटा फोन करतो अन् मॅडम समोर असून, त्यांना बोलावून आणण्याचे नोकराला सांगितले... नोकर गाडीतून मॅडमला बोलावण्यासाठी उतरला... परंतु, काही अंतरावर गेल्यावर समोर कोणीही नसल्याचे समजते म्हणून तो मागे वळून पाहतो तर काय... चालक दागिन्यांसह गाडी घेऊन फरार... ही एखाद्या चित्रपटाची कथा नव्हे, तर जळगाव शहरात बुधवारी भरदुपारी घडलेली सत्यकथा आहे.
दागिना कॉर्नरचे मालक जितेंद्र वर्मा हे राजस्थानमध्ये देवदर्शनासाठी गेलेले आहेत. त्यामुळे बुधवारी दुकानात त्यांचा मुलगा आणि दोन नोकर बसले होते. दुपारी २.४५ वाजता एक पांढऱ्या रंगाची मारुती आर्टिगा (क्र.एमएच-१४-डीएन-९६४) विश्वास लुंकड ज्वेलर्सच्या बाजूला असलेल्या दागिना कॉर्नरसमोर येऊन थांबली. चालकाने दुकानदाराला आवाज दिला. त्यामुळे नोकर राजेंद्र यशवंत घुगे हा गाडीजवळ आला. गाडीत खाकी कपडे घातलेल्या व्यक्तीने मी मुंबई क्राइम ब्रँचचा अधिकारी असून, माझी बदली जळगावला झाली आहे. तसेच माझ्या पत्नीला दागिने खरेदी करायचे असल्याने दाखवायला आण, असे त्याला सांगितले.

सुरुवातीला राजेंद्रने नकार दिला. मात्र, काही वेळानंतर राजेंद्र १० तोळे सोन्याचे तीन हार आणि चार चेन घेऊन गाडीजवळ आला. गाडीला काळ्या काचा असल्याने दुरून दिसत नसल्याचे सांगून दुसऱ्या बाजूने बोलावले. त्यानंतर मॅडम पुढच्या गल्लीत आहेत. त्यांना दाखवून लगेच पैसे देतो असे सांगितले. त्यामुळे राजेंद्र गाडीत बसला अन् ते पुढे मार्गस्थ झाले.
गाडी बळीरामपेठेतील गोपाल स्टेशनरीजवळ असलेल्या दुर्गामाता मंदिराजवळ थांबवली. त्यानंतर त्या व्यक्तीने फोनवरून ‘आम्ही आलो आहोत, दागिने बघून घे’असे सांगितले. नंतर राजेंद्रला समोर मॅडम आहेत. त्यांना बोलावून आण, असे सांगितले. काही अंतर चालत गेल्यावर त्याने इमारतीवर रस्त्यावर बघितले. मात्र, त्या ठिकाणी कोणतीही महिला त्याला दिसली नाही. त्यामुळे त्याने मागे वळून बघितले तर ती गाडी भाजपच्या कार्यालयासमोरून दुसरीकडे जात होती. त्या वेळी राजेंद्रला आपण फसवले गेल्याचे समजल्यानंतर त्याला मोठा धक्का बसला.
गाडीचा क्रमांकही बनावट
घटनेत वापरलेल्या गाडीचा एमएच-१४-डीएन-९६४ हा क्रमांक सीसीटीव्हीतून मिळाला. त्यानुसार शनिपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक आत्माराम प्रधान यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सुभाष वारे पिंपरी-चिंचवड येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयात या क्रमांकाबाबत विचारणा केली. मात्र, या क्रमांकाची कोणतीही गाडी नसल्याचे समोर आले आहे.
दागिना कॉर्नरमध्ये चोरीची दुसरी घटना
दागिना कॉर्नरमध्ये डिसेंबर २०१३ रोजी १२ लाखांचे दागिने चोरट्यांनी लंपास केले होते. या प्रकरणात उत्तर प्रदेशातून आरोपी पकडले आहेत. बुधवारी जवळपास १० तोळ्यांचे सोन्याचे दागिने भरदिवसा लुटून नेल्याची घटना घडली. दुकानाचे मालक वर्मा हे बाहेरगावी गेलेले असल्याने याप्रकरणी गुन्हा दाखल होऊ शकला नव्हता. घटनास्थळाला रात्री ८.३० वाजता उपविभागीय पोलिस अधिकारी मोक्षदा पाटील यांनी भेट दिली.