आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव : बनावट दागिने विक्री करणाऱ्या ‘ठकबाज’ काका-पुतण्याला बेड्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यावल पोलिसांनी ताब्यात घेतलेले राजस्थानचे भामटे - Divya Marathi
यावल पोलिसांनी ताब्यात घेतलेले राजस्थानचे भामटे
यावल- ‘बुरेकाम का बुरा नतीजा...क्यू भाई-चाचा? हा...भतीजा’ या सिनेमातील संवादाचा प्रत्यक्ष परिचय चुकीच्या मार्गाने पैसे कमवण्यासाठी यावलमध्ये आलेल्या राजस्थानच्या काका-पुतण्याला शनिवारी आला. पितळापासून तयार केलेले मात्र हुबेहुब सोन्याचे दागिने आहेत, असे भासवून त्यांची विक्री करण्याच्या बेतात असलेल्या दोघांना यावल पोलिसांनी बेड्या ठोकताच त्यांच्या कारनाम्यांचे ‘पितळ’ उघडे पडले. शनिवारी सायंकाळी सव्वाचार वाजेच्या सुमारास हा रंजक किस्सा घडला. 
 
शनिवारी सायंकाळी जितेंद्रकुमार लालारामजी मोगीया (वय २८) आणि दौलतराम उमारामजी मोगीया (वय ५५, दोन्ही रा.बागरा जि.जालोर, राजस्थान) यांनी शहरातील मेन रोडवर स्टेट बँकेचे ग्राहक केंद्र गाठले.
 
तेथे केंद्राचे संचालक प्रवीण घोडके यांना दोघांनी आम्हास घराचे खोदकाम करताना सोने सापडले असून स्वस्त किमतीत विकायचे आहे. त्यासाठी सोनाराकडे गेले होतो, मात्र त्यांच्याकडून पावती मागितली जाते. आपण ते खरेदी केल्यास अतिशय कमी किंमतीत देऊ, असे सांगितले.
 
घोडके यांना दोघांचा संशय आला तरी त्यांना जाणीव होऊ न देता पोलिसांना माहिती दिली. यानंतर निरीक्षक बळीराम हिरे, सहायक निरीक्षक योगेश तांदळे, हवालदार संजीव चौधरी, गणेश मनुरे, सुशील घुगे, प्रशांत ठाकूर, जाकीर सय्यद, होमगार्ड विजय जावरे यांनी घटनास्थळ गाठून दोघांना ताब्यात घेतले.
 
 यानंतर पोलिसी खाक्या दाखवताच दोघांनी त्यांच्याजवळील सोने खरे नसून पितळापासून तयार केलेले मणी आहेत. हे दागिने खऱ्या सोन्याचे आहेत, असे भासवून धंदा करतो असे सांगितले. चौकशीत पोलिसांनी दोघांकडील तब्बल दोन किलो वजनाचे हुबेहुब सोन्यासारखे दिसणारे मणी ताब्यात घेतले. तपासणी केली असता ते पितळाचे आहेत, असे स्पष्ट झाले. घोडके यांच्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. हवालदार गोरख पाटील तपास करत आहे. 
 
व्यक्तिगत सतर्कता हवीच 
खोटे दागिने खरे आहेत, असे भासवून लोकांची फसवणूक केली जाते. ही फसगत टाळण्यासाठी मोह टाळावा. संशयास्पद वाटल्यास पोलिसांना माहिती द्यावी, असे अावाहन पोलिस निरीक्षक हिरे यांनी केले. 
 
 
बातम्या आणखी आहेत...