आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Duplicate Icard Issue In Bhsaval Rail Way Station

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडे बनावट ओळखपत्र ?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ - मध्य रेल्वेच्या भुसावळ रेल्वे जंक्शनवर अनधिकृतपणे खाद्यपदार्थ विक्रेत्यांचे रॅकेट तयार झाले आहे. आधीच अनधिकृत असलेल्या या विक्रेत्यांकडे बनावट आणि मुदत संपलेले ओळखपत्र देखील आहेत. बालम, सूर्या फूड, केएमए फूड प्लाझा या कंपन्यांशी काही संबंध नसलेल्या व्यक्तींनी स्वत:चे खाद्यपदार्थ विक्रीच्या हेतूने या कंपन्यांच्या नावे ओळखपत्र तयार केल्याची कुणकुण रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना आहे. मात्र, महिन्याकाठी लाखो रुपयांची उलाढाल होत असल्याने मुद्दाम कानाडोळा केला जातो. प्रत्येक फलाटावर सेवा बजावण्याचा दावा करणार्‍या रेल्वे सुरक्षा बलाच्या अस्तित्वाबद्दलही यामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. खुद्द खासदार आनंदराव अडसूळ यांनी तक्रार करूनही उपयोग झालेला नाही.

मध्य रेल्वेच्या भुसावळ जंक्शन स्थानकावर बालन नॅचरल प्रायव्हेट लिमिटेड, सूर्या फूड अँग्रो प्रायव्हेट लिमिटेड, पी.के.शफी सेल किचन, फूड प्लॉझा, आर अँण्ड के असोसिएट यांचे 21 स्टॉल आहेत. यापैकी काहींनी एक वर्षापासून परवाना शुल्क (लायसन्स फी) देखील भरलेली नाही, अशी माहिती वाणिज्य विभागातील जबाबदार अधिकार्‍याने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर दिली. कराराप्रमाणे स्टॉल सुरू होण्यापूर्वी ही रक्कम भरावी लागते. मात्र, अनेकांनी ती भरलीच नसल्याने त्यांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. यावर कडी म्हणजे ज्यांचा रेल्वे स्थानक किंवा या मोठय़ा कंपन्यांशी तीळमात्र संबंध नाही, अशा काही व्यक्ती वेंडरांना बनावट ओळखपत्र तयार करून देत आहेत. तर काहींनी मोठय़ा कंपन्यांच्या नावाची फ्रॅँचायझी घेवून आपल्या घरीच तयार होणारे बेकरी किंवा अन्य खाद्यपदार्थांची स्थानकात अनधिकृत विक्री चालवली आहे. स्थानकावरील स्टॉल चालवणार्‍या वेंडरांकडे (विक्रेते) कराराप्रमाणे अधिकृत व्यक्तीची (लिगल अँथोरीटी) स्वाक्षरी असणे आवश्यक आहे. सध्या मात्र काही विक्रेत्यांकडे वेगवेगळ्या नावाच्या व्यक्तींची स्वाक्षरी असलेले ओळखपत्र आहे. काही विक्रेत्यांकडे मुदत संपलेली ओळखपत्रे आहेत. यामुळे निकृष्ट दर्जाच्या खाद्यपदार्थांची विक्री शक्य असून त्यातून प्रवाशांच्या आरोग्याचा आणि सुरक्षेचाही प्रश्न ऐरणीवर आला आहे. कोणत्या ठेकेदारांना स्टॉल देण्यात आले आहेत? किती कर्मचारी काम करतात? सद्यास्थितीत किती आहेत? याची माहिती असणे आवश्यक आहे. मात्र, कुंपणच शेत खात असल्याने वरिष्ठ अधिकारी सुद्धा हतबल आहेत.
खासदारांच्या पत्रालाही टोपली? भुसावळ जंक्शन स्थानकावर काही खाद्यपदार्थ विक्रेते अनधिकृतपणे ओळखपत्र तयार करतात, याबाबत शिवसेनेचे खासदार आनंदराव आडसूळ यांनी मध्य रेल्वेचे मुंबई येथील सरव्यवस्थापक सुबोधकुमार जैन यांना 7 जुलै रोजी पत्र दिले होते. या पत्रात अनधिकृतपणे स्थानकावर काळाबाजार कसा सुरू आहे, याची विस्तृत माहिती देण्यात आली आहे. अवैधपणे ओळखपत्र तयार करण्यात येत असताना वाणिज्य विभाग गप्प का ? असा सवालही करण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासन खासदारांच्या पत्रानुसार गंभीरपणे चौकशी करणार की त्यालाही केराची टोपली दाखवणार, याकडे जाणकारांचे लक्ष आहे. मात्र, काही कार्यकर्त्यांनी हा मुद्दा लावून धरण्याचा निर्धार केला आहे.